विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुद्धिप्रामण्यवाद- मानवी बुद्धि हीच सर्व ज्ञानाचें प्रमाण व उगमस्थान आहे असें मानणारें मत. सर्व बाह्य अधिकारप्रामणाविरूद्ध हें मत आहे. बुद्धिप्रमाण नसलेलीं सर्व मते सोडून दिलीं पाहिजेत असें या मताचें म्हणणें आहे. सर्व बुडलेल्या धर्मांत अंतकाळीं बुद्धिप्रामाण्यवाद प्रबळ झाला आहे. विशिष्ट अर्थांत ''बायबलचें'' ईश्वरप्रणीत तत्त्व अमान्य करणारें असा याचा अर्थ झाला आहे. विचारस्वातंत्र्य व हें मत बहुतेक एक आहे. अर्वाचीन ऐतिहासिक शोध व पुराणवस्तुशोध यांचा या मतास बराच आधार मिळाला आहे. ''उत्पत्ती'' मधील गोष्टी काव्यमय आहेत. असें सिद्ध झालें आहे. पुर्णबुद्धिप्रामाण्यवाद व ख्रिस्ती बुद्धिप्रामाण्यवाद हे भिन्न आहेत. पूर्णबुद्धिप्रामाण्यवाद हा निसर्गातील गोष्टींचें ज्ञान होणें शक्य नाहीं असें म्हणतो. तत्त्वज्ञानविषयक बुद्धिप्रामाण्यवादाप्रामणें इंद्रियदत्त ज्ञानापेक्षां बुद्धिप्राप्तज्ञान वरिष्ठ आहे. या दोहोंचा विरोध स्पष्ट व साधा नाहीं. हीं परस्परावलंबी असतांत. 'विचार' मनांत अनुभवपूर्व असतांत. असें कांट जरी म्हणतों तरी त्यांस अनुभवाची अवश्यकता आहे असें तो प्रतिपादितो. धार्मिक बुद्धिप्रामाण्यवादांत मनुष्याच्या आत्म्यापासून खरा धर्म होतों असें सेम्लर म्हणतो. यानें बायबलच्या अधिकारित्वावर टीका केली तरी ती टीका बाह्यधर्मकार्यांत बिघाड आणणारी नव्हती. बुद्धिप्रमाणनीतीशास्त्र हाच खरा धर्म आहे असें कांट म्हणतो. या विषयावर बरेच वाद झालें. शेवटी राहरनें हें मत सुसंघटित केलें. अर्वाचीन धर्मशास्त्रज्ञ व बायबलचे भाष्यकार यांवर याचा बराच परिणाम झाला.
भारतियांमध्यें बुद्धिप्रामाण्यवादाचें विशेषसें स्तोम आढळून येत नाहीं, तथापि बुद्धिप्रामाण्यवाद हिंदुस्थानांत अजीबात नव्हता असें मात्र नाहीं. आपल्या इकडे चार्वाक पंथ हा बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कर्ता होता स्वर्ग, मोक्ष, आत्म्याचें पारलौकिकत्व इत्यादिसंबंधाच्या सर्व कल्पना झूट आहेत त्या प्रत्यक्ष नाहींत, अतएव बुद्धीला पटणा-या नाहींत, असें चार्चाकाचें मत होतें. ''न सवर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः।'' तसेंच ''यदिगच्छेत्परं लोकं देहादेष विनिर्गतः। कस्माद्भूयो नचायाति बंधुस्नेहसमाकुलः॥ भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥'' इत्यादि वचनांवरून चार्वाक हा स्वतंत्र विचाराचा होता असें दिसून येतें. भारतीयांमध्यें चार्वाक हा आत्यंतिक बुद्धिप्रामाण्यवादी मानला जातो. तथापि मीमांसा, सांख्य न्याय, इत्यादि दर्शनांमध्येंहि प्रामाण्यवादाचें अस्तित्व आढळून येतें. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्याच्या द्वितीयाध्यायाच्या प्रथमपदांत 'तर्काप्रतिष्टातदप्यननुमयेमितिचेदेवमप्यविमोक्षप्रसंग' या सूत्रावरील भाष्यांत देखील बुद्धिप्रामाण्याला थोडें फार महत्त्व दिलेलें आढळून येतें.