विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुद्धगया- बंगाल इलाख्यांतील, गया जिल्ह्याच्या पोटविभागांतील फल्गु किंवा लिलाजीन या नदीच्या पश्चिम तीरावरील खेडें. या नांवाचा अर्थ बुद्धाची गया किंवा बोधाची ज्ञानाची गया असा आहे. येथील बोधिद्रुमाचें-परमपुज्य अश्वत्थवृक्षाचें ‘महाबोधी’ हेंहि नांव या गांवास देतात. याच वृक्षाखालीं बसून शाक्यमुनी पुष्कळ वर्षांच्या सत्यान्वषणानें 'मारा' वर (नाश करणारा – काम) .विजय मिळवून गौतमबुद्ध झाला. त्याचमुळें त्याच्या सभोंवतीं अनेक लोक ज्ञान मिळविण्याच्या इच्छेनें पुरातन काळापासून येत असतांत. इ. स. पूर्वीं तिस-या शतकांतील अशोक राजानें येथील भव्य बौद्ध मंदिर बांधिलें आहे. इ. सनापूर्वींच्या दुस-या शतकांतील भहुरतस्तूपावर त्यावेळच्या वृक्षाचें व त्याच्या सभोंवारच्या प्रदेशाचें स्पष्ट असें खोदीव चित्र कोरिलें आहे. देवालय अश्वत्थवृक्षाजवळच असून त्यासभोंवतीं अशोकाच्या वेळी बांधिलेला दगडी कोट अद्याप आहे. त्यांतील खांबांवर गौतमबुद्धच्या निरनिराळ्या तऱ्हेच्या मूर्ती आहेत. त्यांपैकीं कांहीं खांब येथील महन्ताच्या मठांत नेले असून त्यांपैकीं एकावर सूर्यनारायणाची मूर्ति आहे. हल्लींचा वृक्ष मूळच्या अश्वत्थवृक्षाची एक शाखा आहे. मुळच्या वृक्षाच्या भाग व मुळ्या जनरल कनिगहॅम यांस अतिशय खोल जमीन खणीत असतां सांपडल्या. वृक्षाखालीं बुद्धाचें अति प्राचीन वज्रासन आहे; मात्र त्यावरील छिन्नविच्छिन्न खोदीव लिखाण तितके प्राचीन नाहीं. इ. स. १८८१ मध्यें बंगालसरकारनें या देवालयाची दुरूस्ती केली. तरी पण देवालय पूर्वीं होतें तसेंच बहुतेक राखण्यांत आलें. देवळांत बोधी वृक्षाखालीं बसलेली अशी बुद्धाची मूर्ति आहे. पण तिची पूजा हिंदू पुजा-याकडूनच होत असतें. हें स्थान बुद्धप्रमाणेंच हिंदूहि पवित्र मानतात. येथें काशीप्रमाणें पिंडश्राद्ध वगैरे विधि करावा लागतो. ('गया' पहा, राजेंद्रलाल मित्र-बुद्धगया; कनिंग हॅम महाबोधी मॅले गया गॅझेनियर)