विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुंदीन(कॅफीन)- हा पदार्थ चहा, कॉफी व कोको यांमध्यें कमी अधिक प्रमाणांत आढळतो. उकळणा-या चहा किंवा कॉफीमध्यें विद्रुत असलेलें टॅनिन नांवाचें द्रव्य अनाम्लिक शिस-हरिताच्या योगानें सांकारूपानें वेगळें करूंन मिळालेल्या द्रावणामधून जास्त असलेलें शिसें गंधकोज्ज वायूच्या योगानें काढून टाकून तें द्रावण गाळून घेऊन बराच वेळ उकळलें असतां बुंदीनचे बारीक बारीक स्फटिकाकृति कण द्दष्टोत्पत्तीस येतात. एमिल-फिशर यानें द्वि-मिथिल मध्य-मौत्रकापासून संयोगीकरणाच्या योगानें बुंदीन तयार केलें. हे बुंदिनाचे कण थंड पाण्यांत थोडेंसें विरघळतात. बुंदीनचा वितळण्याचा बिंदु २३४ ते २३५ आहे. तें थोडेंसें कडवट असून त्याचे खनिज अम्लाशीं क्षार मिळतात.