विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुंदी, सं स्था न.– राजपुतान्याच्या. आग्नेयीकडील एक संस्थान. क्षेत्रफळ २२२० चौरस मैल. उत्तरेस जयपूर व टोंक; पश्चिमेस उदेपूर आणि दक्षिण व पूर्व भागास कोटा. संस्थानी प्रदेश डोंगराळ आहे. पूर्वीं ह्या प्रदेशांत हिंस्त्र पशु फार सांपडतात असत. पाऊस सुमारें ४२ इंच पडतो. हवामान साधारणपणें प्रकृतीला मानवेल असेंच आहे.
बुंदीचा राजा चव्हाण रजपुतांचा मुख्य आहे. ह्या लोकांनीं वस्ती केलेंल्या भागास हारावती नांव पडलेलें आहे; ८ व्या शतकाच्या सुरवातीस चव्हाण हे सांबर नांवाच्या एका गांवातून आले आणि अजमीरला कांहीं वर्षेंपर्यंत राज्य केल्यानंतर त्यांनीं दिल्लीचें तख्त मिळविलें. महंमद घोरीच्या हातून स. ११९२ त पृथ्वीराज चव्हाण मारला गेल्यानंतर चव्हाणांनीं नाडोल येथें राज्य केलें. स. १३४२ च्या सुमारास देवराजानें बुंदी शहर घेतलें. तेव्हांपासून त्याचा वंश येथें राज्य करीत आहे. १४५७ सालीं मांडूच्या सुलतानानें बुंदी काबीज केलें, त्यांत राव बैरीसाल व त्याचे पुष्कळ मानकरी लोक मारिले गेलें. रावच्या मुलाला त्यांनीं पकडून नेलें आणि त्यास मुसुलमानी दिक्षा दिली. पुढें हाडा रजपुतांनीं मांडु संस्थानावर स्वा-या केल्या. १५५४ सालीं जेव्हां रावसुरजन गादीवर आला तेव्हां बुंदी संस्थानास नवीन स्वरूप आलें. यानें राणधम्मोरचा किल्ला आपल्या ताब्यांत घेतला. पण पुढें अकबरानें तो काबीज केला. ह्यानंतर बुंदीचे राजे मुसुलमानी अंमलाखालीं गेलें. बंदीच्या राजास बनारस वगैरे ५३ जिल्ह्यांची जहागिरी मिळाली व रावराजा हीव त्यांची पदवी कायम झालीं.
१७ व्या शतकांच्या सुमारास हारावती व कोटा हीं दोन वेगळीं वेगळीं संस्थानें झालीं. बुंदीचा राजा रतनसिंग ह्यानें आपल्या मुलास जाहगीर म्हणून कोटा व इतर प्रांत तोडून दिला. राजपुत्र खुर्रमनें जेव्हां आपल्या पित्याच्या म्हणजे जहांगीरच्या विरूद्ध बंड केलें होतें तेव्हां राजा रतनसिंग ह्यानें जहांगीर ह्यास मदत दिली होती व त्याबद्दल जहांगीरानें त्याच्याकडे ब-हाणपूरची व्यवस्था सोंपविली होती. त्यांनतर बुंदीच्या गादीवर राजा छत्रसाल आला हा फार शूर होता. औरंगझेबाच्या विरूद्ध दारास मदत करण्यांत हा १६४८ सालीं मारला गेला. पुढें औरंगझेब बादशहानें ह्याच्या वंशजास औरंगाबादची जहागीर दिली.
औरंगझेबाच्या मुलास म्हणजे बहादुरशहास गादी मिळवून देण्यांत बुंदेल्याच्या बुचसिंग नामक राजाची बरीच मदत झालीं होती त्याबद्दल त्याला ‘महारावराजे’ ही पदवी मिळाली. पुढें बुधसिंग यास राज्याबाहेर हांकलून दिलें होतें. पण त्याचा मुलगा उमेदसिंग ह्यानें मल्हारराव होळकराच्या मदतीनें पुन्हां गादी परत मिळविली. नंतर अजितसिंग गादीवर आला व उदेपूरचा राणा याच्या हातून चुकीनें शिकारीच्या वेळीं मारला गेल्यामूळें ह्या दोन घराण्यांचें हाडवैर आलें. १८०४ सालीं होळकरांचा ब्रिटिशांनीं जो पराभव केला. त्यांत बुंदीच्या राजानें ब्रिटिशांस मदत केलेंली असल्यामुळें मराठे सरदारांचा यांच्यावर मोठा रोष होता. सन १८१७ पर्यंत बुंदीच्या राजास मराठ्यांपासून व पेंढा-यांपासून मोठा त्रास पोहोंचला. १८१८ सालीं हें संस्थान ब्रिटिश अंमलाखालीं आलें. १८६२ सालीं दत्तक घेण्याची सनद येथील राजास मिळाली. सध्यां महाराव राजा सर रघुबीरसिंग बहादुर हे गादीवर आहेत.
संस्थानची लोकसंख्या (१९२१) १८७०६. नैनवा व बुंदी हीं दोन मोठीं शहरें असून एकंदर १२ तहशिली आहेत. हिंदूंची संख्या शेंकडा ९१ आहेत. जयपूरी भाषेचीच हारावती नांवाची एक पोटभाषा येथें प्रचारांत आहे. मीनार जातीचे लोक ह्या संस्थानांत फार आहेत. हे लोक स्वभावानें धाडशी असून लुटारूचा धंदा करतात. उत्तरभागांत जमीन बहुतेक खडकाळ असून दक्षिण भाग सुपीक आहे. जमिनीला पाणी बहुतेक विहिरीचें दिलें जाते. मूग, ज्वारी, मका वगैरे पिकें करतात. हिवाळ्याच्या दिवसांत गहुं, जव, हरभरा, अफू हीं पिकें होतात. जंगली प्रदेश बराच आहे. वायव्येकडील भागांत लोखंडाच्या खाणी होत्या. त्यांतून पुष्कळ लोखंड निघत असें. चुनखडीहि ब-याच ठिकाणीं सांपडते. धंद्याच्या द्दष्टीनें संस्थान फारसें महत्त्वाचें नाहीं.
निर्गत माल कापूस, चामडें, गोंद, लोंकर, तूप, अफू, तेल काढण्याकरितां बीं वगैरे असून आयात माल साखर, तांदूळ, मीठ, खनिज पदार्थ. ह्या संस्थानांमध्यें रेल्वे नाहीं. एकंदर उत्पन्न १० लाखांचें आहे. संस्थानाला नाणीं पाडण्याचा अधिकार आहे.
बहुतेक जहागीरदार राजाचे दूरचे किंवा जवळचे नातेवाईक आहेत. कांहीं जहागीरदारांनां सारा द्यावा लागत नाहीं. धर्मार्थ म्हणून ब्राह्मणाला किंवा गोरगरिबांनां दिलेल्या जमिनीला खैरात जमिनी असें म्हणतात. वारस जर पुरूष नसला तर जमीन पुन्हां संस्थान आपल्या ताब्यांत घेतें. लोक अशिक्षित आहेत. शेंकडा २.५ लोकांनां लिहितां वाचतां येतें.
श ह र.- बुंदी संस्थानाची राजधानी. ही अजमीरहून सुमारें १०० मैल आग्नेय दिशेकडे आहे. मीना ज्ञातीचा बुंद नांवाचा एक सरदार होता. त्यावरून शहरात हें नांव पडलेलें आहे. शहराची लोकसंख्या सुमारें २० हजार आहे. हें शहर फार प्रेक्षणीय आहे. चारी बाजूंस जंगली प्रदेश असून शहराच्या भोंवतीं. मोठा कोट आहे. राजवाडा भव्य असून तो एका उंच जागेवर बांधलेला आहे. इतिहासकार टॉड हा बुंदी येथील राजवाड्याची फार तारीफ करतो. येथें तारागड नांवाचा एक किल्ला व सूरज नांवाची एक छत्री असून फुलसागर नांवाचा राजाचा उन्हाळ्यात राहण्याचा एक वाडा आहे. नैॠत्येस नवाबाग आहे. ईशान्येस जेठसार नांवाचें एक भव्य तळें आहे. तेथेंहि एक शुकमहाल नांवाचा वाडा आहे. जवळच सारबाग आहे. येथें बुंदी येथील सरदारांचे और्ध्वदेहिक संस्कार करतात.