विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुडापेस्ट- हंगेरी देशाची राजधानी. ह्या शहराचे दोन भाग आहेत; त्यांची नांवें बुंडा व पेस्ट होत. हे दोन्हीहि भाग डान्यूब नदीच्या तीरावर एकमेकासमोर वसले आहेत, व एका भागांतून दुस-या भागांत जाण्यास ठिकठिकाणीं सात पूल बांधले आहेत. ह्या शहराचें क्षेत्रफळ ७८ चौरस मैल आहे.
ह्या शहरांच्या बुडा भागांत १३ व्या शतकांत बांधलेलें मेंथीयसचें ख्रिस्ती देवालय आहे. ह्याचसारखे पेस्ट भागांतहि एक जुनें मंदिर गॉथिक पद्धतीनें बांधलेलें आहे. ह्याखेरीज दुस-या इमारती म्हटल्या म्हणजे प्रतिनिधसभागृहें होत. हें शहर हंगेरी देशाचें ज्ञानकेंद्र असून येथें एक विद्यापीठ आहे. हें विद्यापीठ १८३५ त स्थापिलें. ह्याशिवाय या शहरीं कलाकौशल्य शिकविणा-याहि शाळा आहेत. ह्या शाळांतून उत्तम शास्त्रीय शिक्षण देण्यांत येतें.
ह्या शहराची लोकसंख्या (१९२०) ९२८९९६ असून तीपैकीं सुमारें सहा लाख मगियर एक लाख जर्मन व २५००० स्लोवाक आहेत. हें शहर व्यापार व उद्योगधंद्यांकरितां प्रसिद्ध आहे ह्या शहरीं धान्य, कणीक, गुरें घोडे, दारू, लोंकर व कमावलेलें कातडें ह्याचा व्यापार चालतो. येथें खनिजोदकाचे उष्ण झरे आहेत. ह्यांचा उपयोग स्नानाकडे करतात; ह्यांपैकीं मुख्य झ-यांची नावें बु्रकबॅड व कायसंबड अशीं आहेत. हें शहर मराया थेरेसा व दुसरा जोसेफ ह्यांच्या कारकीर्दींत उदयास आलें. परंतु ह्याची पूर्ण वाढ १९ व्या शतकांत झालीं.