विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बीरभूम, जि ल्हा.- बंगाल इलाख्यांतील बरद्वान भागांतील एक जिल्हा उ.अ. २३ ३३' ते २४ ३५' व पू. रे. ८७ १०' ते ८८ २' यांमध्यें आहे. क्षेत्रफळ १७५३ चौरस मैल. बीरभ्रूम हा शब्द वीरभूमी व बीरराजा यापासून उत्पन्न झाला असावा. मुख्य गावं सुरी आहे. छोटानागपूराच्या पठाराच्या पूर्व बाजूचा कांहीं भाग या जिल्ह्यांत येतो. मोर व अजय या मुख्य नद्या आहेत. हवा कोरडी व उष्ण आहे. एकंदर पाऊस ५० इंच पडतो. उन्हाळ्यांत हवा फार उष्ण असतें.
इतिहास:- १३ व्या शतकांत येथें एक हिंदु संस्थानिकाचें राज्य होतें. राजधानी राजनगर अथवा नगर. पठाण व उडिया लोकांनीं हें शहर लुटलें. १८ व्या शतकाच्या आरंभीं मुर्शिदाबादच्या जाफरखानानें असादउल्ला पठाण यास या जमिनदारीची सनद दिली होती. त्यावेळीं यांत संताळ परगण्याचा बराच भाग मोडत असें. १७६५ सालीं हा जिल्हा इंग्रजांकडे आला पण १७८७ सालीं इंग्रजांनीं याची व्यवस्था आपल्याकडे घेतली.
या जमीनदारीचे तीन तुकडे करण्यांत आले व ते बांकुरा बीरभूम, संताळ या परगण्यांत सामील केलें. लोकसंख्या (१९२१) ८४७५७०, पैकीं हिंदू ६५७६८४ आहेत. वन्य हिंदूंत संताळांची गणना होतें.
पूर्वेकडील भाग सुपीक आहे. पश्चिमेकडील भाग नापीक व उजाड आहे. मुख्य पीक भाताचें आहे. थोडाबहुत मका, ऊस व हरभरा होतो. अजय नदीकाठीं अरंग येथें कोळसा बराच सांपडला आहे. तसेंच लोहमिश्रित दगड, अभ्रक, ग्रॅनाईट, वालुकामय दगड, चुनखडी हींहि सांपडतात. हातमागावर सुती कापड काढतात. रेशीम कांतण्याचा धंदा या जिल्ह्याच्या पूर्व भागांत चांगला चालतो. लाखेच्या बांगड्या, दौती, लोखंडाचीं व पितळेचीं भांडीं हे जिन्नस तयार होतात. निर्गत माल, रेशीम व तांदूळ व आयात माल, मीठ, कापड, सूत, तंबाखू, राकेल, दगडी कोळसा होय. उत्तरेकडून दक्षिणेकडे ईस्ट इंडियन रेल्वेचा फांटा गेला आहे. याशिवाय याच रेल्वेचा फाटा नलहाटीपासून अझिमगडाकडे गेला आहे. या जिल्ह्यांत कायमधा-याची पद्धत सुरू आहे. साक्षरतेचें प्रमाण ७.७ आहे.