विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बीट- ही विलायतेकडून आलेली एक भाजी आहे. बिटाचें बीं पालकाच्या बियासारखें असतें व त्याच्याच वर्गापैकीं बीट ही एक जात आहे. पालकाचीं पानें हिरवीं असतांत. बीटाचीं काळीं, जांभळीं अथवा जांभळ्या शिरा व देंठ असलेलीं हिरवीं पानें असतांत. बिटाच्या पानांची कोवळेंपणीं पालकाप्रमाणें भाजी होतें. बिटाचा मुख्य उपयोगी भाग त्याचीं मुळें होत. याच्या अनेक जाती आहेत. त्या विलायतेंत करतात. जर्मनींत ज्या बिटापासून साखर तयार करतात त्याचीं मुळें पांढरीं असून तीं हात हात लांब वाढतात. जनावरांच्या खुराकाकरितां विलायतेंत बीट करतात, त्यास ''मॅगल वर्झेल'' हें नावं आहे. तो तांबडा अगर पिंवळा असतो. बिटाची लागवड कोबी, कालीफ्लावर, वांगी, टोमाटो विलायती गवत वगैरे महान जातींच्या पिकांत मिश्र करतात.