विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिहारीलाल चौबे (उ.का. १६५०) - एक प्रसिध्द हिंदुस्थानी ग्रंथकार. सातसाइ अथवा सातशें दोह्यांचा संग्रह या ग्रंथामुळें याची फार कीर्ति झाली. या ग्रंथामधील सौंदर्य, रस आणि भाषा चमत्कार हे कोणालाहि साधावयाचे नाहींत असे आहेत. फक्त तुळशीदासालाच ते साधले आहेत. बिहारीच्या काव्यावर अनेकांनीं टीका लिहिलेल्या आहेत. या ग्रंथावरील उत्कृष्ट टीका सुरतमिश्र आगरवाला याची आहे. यामधील आढळून येणारी श्लोकांची रचना आणि क्रम हीं अजिमशहा युवराजासाठी केलेली असल्याकारणानें या ग्रंथाला अझीमशाही ग्रंथ हे नांव आहे. काशीचा राजा चेतसिंग याच्या आश्रयाखालीं पंडित हरिप्रसाद यानीं याचें संस्कृतांत सुंदर पद्ममय भाषांतर केलें आहे. बिहारीलालच्या चरित्राविषयींची माहिती उपलब्ध नाहीं.
टॉसीनें हा कबीराचा समकालीन असावा असें म्हटलें आहे. सातसाईवरील जे टीकाकार आहेत, त्यांची नांवेः (१) चंद्र, (२) गोपालसरण, (३) सुरतीमिसर, (४) कृष्ण, (५) करण, (६) अनवरखान, (७) जुल फालर, (८) युसुफखान, (९) रघुनाथ, (१०) लाल, (११) सरदार, (१२) लल्लूजी लाज, (१३) गंगाधर, व (१४) रामबक्ष.