विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन (१८१५-१८९८)-एक जर्मन मुत्सद्दी व जर्मन साम्राज्याचा पहिला चॅन्सेलर. याचा जन्म शॉन होसेन येथें झाला. गॉटिजन, बर्लिन व ग्रीफस्वाल्ड येथें त्यानें कायद्याचा अभ्यास केला. १८४७ साली प्रशियन लांडटगमध्यें तो निवडून आला. १८५१ साली फ्रांकफोर्ट येथील जर्मन डायेटचा तो सभासद निवडला गेला. या डायेटमध्यें तो असतां त्यानें प्रशियाच्या नेतृत्वाखालीं जर्मन साम्राज्याची स्थापना व्हावी, असें आपलें मत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. १८५९ सालीं, तो प्रशियाचा प्रधान झाला व १८६२ सालीं त्याची पॅरिसच्या वकिलातीवर नेमणूक झाली. तथापि त्याच वर्षी त्याला प्रशियन परराष्ट्रमंत्र्याची जागा मिळाली. या जागेवर असतां त्यानें कित्येकदां सुलतानशाही गाजविण्यास कमी केलें नाही. फ्रॅंकोप्रशियन युध्द, प्रशियानें केलेला आस्ट्रियाचा पराभव या सर्व गोष्टींचा त्यानें जर्मन संस्थानांचें एकीकरण करण्याच्या कामी उपयोग करून १८७१ साली व्हर्सेलिस येथें त्यानें विल्यम राजाला जर्मन बादशहा बनविलें. या साम्राज्याचा बिस्मार्क हा प्रधान झाला व त्याला प्रिन्स ही पदवी मिळाली. फ्रान्सला अल्सेसलॉरेन हे प्रांत व एक अब्ज डॉलर खंडणी जर्मनीला द्यावयास त्यानें भाग पाडलें; व या पैशाच्या साहाय्यानें, फ्रान्सच्या विरूध्द युरोपीय राष्ट्रांशीं दोस्तीचे तह त्यानें घडवून आणले. सैन्य व आरमार यांची त्यानें उत्कृष्ट सुधारणा केली. संरक्षक जकातीच्या तत्त्वाचा त्यानें पुरस्कार केला. या त्याच्या कृत्याला लिबरल व अल्ट्रामाँटेन्स या दोन्हीं पक्षांनीं विरोध केला. तथापि त्यांचें कांही चाललें नाहीं. १८७२ सालीं त्यानें जेसुइट लोकांनां जर्मनींतून हांकलून लावलें; समाजसत्तावाद्यांविरूध्द कायदे केले व 'पॅटर्नल सोशालिझम' (म्हणजे सरकार हें मजुरांचे खरें कैवारी आहे, असें मत) या मताचा त्यानें पुरस्कार केला. १८९० सालीं त्याचें व तिस-या विल्यम बादशहाचें न पटल्यामुळें त्यानें आपल्या प्रधानकीचा राजीनामा दिला. १८९८ मध्यें तो मरण पावला.