विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिस्मत (बिस्मथ) - अणुभारांक २०८.५ हा एक उपधातु आहे. याचे दगड बहुधां चांदी व कोबाल्ट यांच्या दगडांशीं मिश्र झालेले सांपडतात. हे दगड बोहेमिया व सॅक्सनी येथें सांपडतात. बिस्मतगंधकिदाचेहि दगड सापडतात. ते बोहिमिया, सैबिरिया, कॉर्नवाल व फ्रान्स या देशांत सांपडतात.
पहिल्या प्रकारच्या दगडांत हें द्रव्य मूळरूपांत असतें म्हणून ते दगड भट्टीत घालून वितळवितात. म्हणजे या धातूचा रस होऊन ती तळी बसते. दुस-या प्रकारच्या दगडांत बिस्मत हा गंधकाशीं मिश्रित असतो. म्हणून त्या दगडांनां भट्टींत घालून जाळतात. म्हणजे गंधक जळून जातो व धातू शिल्लक राहतो. कधीं कधीं याच भट्टींत कोळसा घालतात. तिसरी एक पध्दत म्हणजे जेव्हां बिस्मत इतर धातूंशीं मिश्र झालेला असतो तेव्हां गंधकाम्ल किंवा जलराज त्या मिश्रणांत ओततात. नंतर त्यांत लोखंडाचे तुकडे घालतात. म्हणजे बिस्मत धातु बाहेर पडतो.
गुणधर्म - बिस्मत हा धातु ठिसूळ असतो. याचे लालसर पांढरे स्फटिक असतात. याचें वि. गु. ९..८ आहे. परंतु द्रव केल्यास वि. गुं. १०.०५ होतें. यावरून हा धातु वितळल्यावर याचें आकारमान कमी होतें. हा २६८.३ अंशावर वितळतो, व १०९०० ते १४५०० अंशापर्यंत त्याची वाफ होते..
खुल्या हवेंत हा लवकर गंजत नाहीं पण हवा ओली असल्यास याच्यावर काळसर रंगाचा गंज चढतो. हा हर, स्तम्भ इत्यादिकांशीं लवकर संयोग पावतो. जलराज, गंधकिताम्ल, नत्राम्ल यांतहि तो विरघळतो व लवणें बनतात. परंतु उज्जहराम्लांत विरघळत नाहीं. याचे गुणधर्म ताल व अंज यांशीं बहुतांशी जमतात.
याचे सिंधु, पारद इत्यादि धातूंशी मेल बनतात. इतर धातूंशीं याचा मेल केला असतां ते मेल कमी उष्णमानावर वितळतात व द्रवरूप केले असतां संकुचित होतात. हा प्राणवायूशीं संयोग चार प्रकारानें होतो. हरिद, स्तम्भिद नत्रिद, गंधकिद व कर्बित इत्यादि सर्व याशीं संयोग होतात.
औषधपयोग - हा जंतुनाशक आहे. परंतु याचा विषारी परिणाम होत नाही. याचें नत्रित पोटांत देतात. तेथें गेल्यावर त्याचें नत्राम्ल बनतें. याच्याइतकें जंतुघ्न औषध पोटांत देण्यास दुसरें नाहीं.