विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिल्हण (सुमारें १०३०-११००) - काश्मीरप्रांतांतील एक कवि. जुन्या प्रवरपूर राजधानीनजीक खोनमुख गांवी याचा जन्म झाला. बापाचें नांव ज्येष्ठकलश व आईचें नागादेवी. वेद, व्याकरण व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन संपल्यावर स. १०६५ सालच्या सुमारास काश्मीर सोडून तो ठिकठिकाणच्या राजांच्या दरबारी गेला. व शेवटी पश्चिम चालुक्य सहावा विक्रमादित्य, याच्या दरबारी तो मुख्य पंडित झाला. विक्रमादित्याच्या सन्मानार्थ त्यानें स. १०८५ च्या सुमारास विक्रमांकदेवचरितनांवाचा मोठा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत त्यानें विक्रमादित्यानें चोळ लोकांवर केलेल्या स्वा-यांचें वर्णन केलें आहे. याशिवाय त्यानें चौरीसुररतपंचाशिका हें खंडकाव्य व कर्णसुंदरी नाटिका हे दोन ग्रंथ लिहिले आहेत.