विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिआस - पंजाबांतील पांच नद्यांपैकी एक.हिलाच विपाष असें प्राचीन नांव आहे. ही कुळूंतील रोहतंगपासच्या दक्षिणेस उगम पावते; नंतर मंडीसंस्थानांतून वाहत जाऊन कांग्रा जिल्ह्यांत जाते. मंडी या शहरी नदीवर चांगला झुलता पूल आहे, व कांग्रा जिल्ह्यांत डेरागोपांपूर येथें हिवाळयांत बोटींचा पूल ठेवलेला असतो. होशियारपूर व कांग्रा या जिल्ह्यांमधील बिआस ही हद्द आहे. होशियारपूर व गुरूदासपूर जिल्ह्यांमध्यें बिआसवर पूल नाहींत. ही कांही मैल जालंदर जिल्ह्याजवळून जाऊन अमृतसर व कपुरथळा संस्थानामध्यें शिरते. शेवटी ही नदी (कपुरथऴा संस्थानच्या नैॠत्य सीमेजवळ) सतलज नदीस जाऊन मिळते. या नदीची एकंदर लांबी २९० मैल आहे; व पंजाबांत लांबीच्या दृष्टीनें ही ६ वी नदी आहे. हिला येऊन मिळणा-या मुख्य नद्या चक्का व बेन या होत.