विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाळापुर, तालुका – व-हाड, अकोला जिल्हा. क्षेत्रफळ ५६९ चौरस मैल. या तालुक्यांत १९३ खालसा आणि नऊ जहागिरीची गांवें आहेत. तालुक्यांतील जमीन काळी व सुपीक आहे. बागाईत मुळीच नाही असें म्हटलें तरी चालेल.
गांव - हें बाळापुर तालुक्याचें मुख्य ठिकाण असून मान नदी आणि म्हाईनदी यांच्या संगमावर असून पारस रेल्वस्टेशनच्या नैॠत्येस ६ मैलांवर आहे. संगमाजवळ एक बाळा देवीचें देऊळ आहे, त्यावरून गांवास बाळापुर हें नांव पडलें आहे. एने-ई-अकबरीमध्यें व-हाडच्या सुभ्यामध्यें बाळापुर हा अतिशय श्रीमंत परगणा आहे असा उल्लेख आहे. इलिचपूरनंतर मोंगलांच्या अमलाखालीं हेंच मुख्य लष्करी ठिकाण होतें. बाळापुरचा हल्लीचा किल्ला १७५७ साली इलिचपूरचा पहिला नबाब इस्माइलखान यानें पुरा केला, असा शिलालेख बाहेरील दरवाजावर आहे. येथें ब-याच प्राचीन मशिदी पहावयास सांपडतात. लोकसंख्या दहा हजार असून निम्मे लोक मुसुलमान आहेत. सत्रंज्या, पागोटी व इतर कापड याबद्दल अद्याप बाळापूर प्रसिध्द आहे.