विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाळाजी कुंजर - पंढरपुराजवळ वांगापूर म्हणून एक गांव आहे तेथील पाटलाचा हा औरस पुत्र होता. हा जातीनें मराठा असून प्रथमत:तो नाना पुरंद-याच्या पथकांत एक शिलेदार होता. सन १७९६ सालच्या मार्च महिन्याच्या आरंभी दुस-या बाजीरावास शिवनेरीहून पुण्यास आणलें त्यावेळी ह्यानें बाजीरावाचें लक्ष युक्तिप्रयुक्तीनें आपल्याकडे वेधून घेतलें. पुढें कुंजर हा बाजीरावाच्या गळयांतील ताईत होऊन बसला. वसईच्या तहानंतर बाजीरावानें याला शिंद्याची मर्जी संपादन करण्याकरितां पाठविलें. शिंद्याच्या दरबारींहि याचें बरेंच प्रस्थ होतें. हा स १८१७ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास पंढरपुरास वारला.