विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बासोडा (नबाबबसोडा, किंवा हैदरगड बासोडा) - हे मध्य हिंदुस्थानांतील एक संस्थान माळव्यामध्ये आहे. यावर भोपाळ येथील एजंटची देखरेख असते, क्षेत्रफळ सरासरी ४० चौरस मैल आहे व १९११ साली लोकसंख्या ४६३० होती. या संस्थानचे नाव बासोडा शहरावरून पडले आहे व हें शहर १७ व्या शतकांत ओर्छाचा राजा बीरसिंगदेव यांने वसविले. ग्वाल्हेर संस्थानमध्ये याच नावांचे एक शहर आहे, त्यापासून हे निराळे ओळखता येण्याकरिता यास हैदरगड बासोडा व ग्वाल्हेरमधील बासोडयास महंमदगड बासोडा म्हणतात, परंतु हे बहुधा नबाब बासोडा या नावानेच ओळखले जाते.
बासोडयाचे नबाब हे अठराव्या शतकांतील बराकसाई फिरोज खेलच्या महंमद दिलरखान नांवाच्या अफगाणाने स्थापिलेल्या कोरवाई कुळाचे वंशज आहेत. दिलरखानच्या मृत्यूनंतर संस्थान त्याच्या दोन मुलांत विभागले गेले व कोरवाई थोरल्याकडे गेले, हासन-उल्लाखान नांवांचा धाकटा मुलगा प्रथम राखा व बहादूरगड (हल्ली ग्वाल्हेर संस्थानातील इसारगड) येथे स्थायिक झाला, परंतु मराठयांनी त्यास हाकून दिल्यामुळे १७५३ साली बासोडा येथे त्याने आपली राजधानी नेली. १८१७ साली हे संस्थान शिंद्याच्या ताब्यांत गेले, परंतु इंग्रजाच्या मध्यस्तीने स.१८२२ त पुन्हां स्वतंत्र झाले. जरी हे संस्थान ग्वाल्हेर संस्थानचे ताबेदार आहे तरी खंडणी वगैरे काही देत नाही. संस्थानांत एकंदर २७ खेडी आहेत. जमीन सुपीक असून पिके चांगली होतात. संस्थानिकाला फर्स्टक्लास म्याजिस्ट्रेटचे फौजदारी अधिकार आहेत, व मोठया गुन्ह्यांचा निवाडा पोलिटिकल एजंट करतो. संस्थानचे उत्पन्न १९००० रु आहे. मुख्य शहर बासोडा (१९०१ साली लोकसंख्या १८५०) असून तेथे एक ब्रिटिश पोष्ट ऑफिस, तुरूंग, शाळा व दवाखाना आहे.