विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांसडा संस्थान - मुंबई इलाख्यांत, सुरत एजन्सी मधील एक संस्थान. क्षेत्रफळ २१५ चौरस मैल आहे. प्रदेश जंगली व मधूनमधून डोंगराळ आहे. पावसाचे सरासरी वार्षिक मान ८० इंच आहे. सर्व वर्षभर हवा रोगट असते. बांसडा व बडोदे या संस्थानांच्या हद्दीवर उणाई येथे ऊन पाण्याचा झरा आहे. येथील रजपूत संस्थानिक सोळंकी वंशातील आहे. बांसडाजवळच्या एका तटाचे अवशेष, देवालये व कालवे यांवरूनच हे संस्थान पूर्वी भरभराटीत असावे असे वाटते. मराठयांनी हे संस्थान आपल्या ताब्यांत आणून त्यावर खंडणी बसविली. वसईच्या तहाने खंडणी वसून करण्याचा हक्क मराठयांकडून इंग्रजांकडे आला. येथील संस्थानिकाला महारावळ म्हणतात, व त्याला ९ तोफांची सलामी मिळते. येथील राजाला दत्तक घेण्याची परवानगी आहे.
संस्थानची लोकसंख्या (१९२१) ४०१२५ होती. बहुतेक लोक कोक्णा, चोध्रा, धोंडिया, गमता वगैरे रानटी टोळयांपैकी आहेत, व त्यांचा धर्म हिंदु असून ते अपभ्रष्ट गुजराथी भाषा बोलतात.
भात, नागली, कोद्रा व कडधान्ये ही येथील मुख्य पिके आहेत. थोडा कापूस व गहूहि होऊ लागला आहे. सुताची फीत, चटया, पंखे गालिचे वगैरे जिन्नस या संस्थानांत तयार होतात. १९२३ साली संस्थानांत २ भाताच्या व तेलाच्या खासगी गिरण्या होत्या. संस्थानांतील मोठया गुन्ह्याची चवकशी करण्याचा अधिकार राजाला आहे. राजाजवळ कायम सैन्य नाही. पण तो काही घोडेस्वार व अरब लोक पदरी बाळगतो.
१९०३-०४ सालामध्ये संस्थानचे एकंदर उत्पन्न ३॥ लक्ष होते. सन १८७३ त राजाने ब्रिटिश सरकारकडून वार्षिक ८६९८ रु. घेण्याचे कबूल करून संस्थानांतून जाणायेणा-या मालावरील जकात बंद केली संस्थानांत रानटी टोळीतील मुलांनां शिक्षण मोफत मिळते. मुख्य ठिकाण बांसडा असून येथे म्युनिसिपालिटी आहे.