विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बावडेकर रामचंद्रपंत - हा निळो सोनदेवाचा मुलगा. बापाच्या मरणानंतर इ.सं. १६०४ मध्ये शिवाजीने याची पंत अमत्य याच्या जागी नेमणूक केली. इ.स. १६७६ त शिवाजीने रघुनाथ नारायण हणमंते याला अष्टप्रधानमंडळांत घेण्याकरता रामचंद्रपंतास पंतअमात्याच्या जागेवरून काढले. इ.स.१६९० त राजाराम महाराष्ट्रातून जिंजीस गेला तेव्हा त्याने रामचंद्रपंतास हुकमतपणा चा नवीन अधिकार देऊन विशाळगड, रांगणा वगैरे किल्ले त्याच्या स्वाधीन केले व महाराष्ट्रांतील राज्यकारभाराचा कुलअखत्यार त्यास दिला.
रामचंद्रपंताने आपल्याकडे सोपविलेली महाराष्ट्रांतील कामगिरी फारच उत्कृष्ट रीतीने बजाविली. किल्ल्यांच्या बंदोबस्ताच्या कामी रामचंद्रपंताच्या हाताखाली दिलेल्या परशुराम त्रिंबकापासून फार मदत झाली. रामचंद्रपंताने स्वतःचे सैन्य जमवून देशांत थोडीशी शांतता प्रस्थापित केली, व संताजीलाहि सैन्य जमविण्याकरिता पैशाची शक्य तेवढी मदत केली. सातारा हे याने आपले राहण्याचे ठिकाण करून शंकराजी नारायण गांडेकर नावाच्या त्याच्या मुख्य कारकुनाच्या मदतीने तो लष्करी व मुलकी अशा दोन्हींहि कारभारांकडे सारखेच लक्ष पुरवू लागला. इ.स. १६९९ त औरंगझेबाने साता-यास वेढा दिला तेव्हा रामचंद्रपंताने त्या किल्ल्यात धान्यसामुंग्रीचा पुरवठा करून ठेवला नव्हता. या त्याच्या निष्काळजीमुळे रामचंद्रपंताने ही गोष्ट मुद्दाम केली होती अशी त्याच्याविषयी इतरांना शंका आली.
सन १७०५-०६ च्या सुमारास रामचंद्रपंताने पावनगड व पन्हाळा हे दोन किल्ले मोंगलापासून परत घेतल्यामुळे ताराबाईने खूष होऊन रामचंद्रपंताच्या हाती राज्यकारभारासंबंधी बरीच सत्ता दिली. इ.स. १७०७ त शाहूची सुटका होऊन तो महाराष्ट्रांत आला तरी याने ताराबाईचा पक्ष सोडला नाही. इ.स.१७१२ मध्ये ताराबाईचा मुलगा शिवाजी वारल्यावर रामचंद्रपंताने ताराबाईस व तिच्या सुनेस कैदत टाकून संभाजीस गादीवर बसविले व त्या बालवयी राजाच्या नांवाने आपण अप्रतिहतपणे कारभार चालवू लागला. रामचंद्रपंत १७१८ साली वारला. रामचंद्रपंतानंतर त्याचा पुत्र भगवंतराव हा कोल्हापुरच्या राज्यांत अमात्य झाला परंतु याच्यावर संभाजी व शाहू या दोघांचीहि हतराजी असल्यामुळे व पुढे पेशवाई झाल्यावरहि भगवंतरावाचा उत्कर्ष झाला नाही शाहूनंतर सातारचे अमात्यपद त्याला मिळाले होते. तो १७५५ साली पुण्यास मरण पावला. त्याच्या वंशाकडे अद्याप अमात्यपद चालत आहे. यांची वंशावळ म.रि. पानपत. प्रकरण, पृ २९१ वर छापिली आहे. ('आबाजी सोनदेव' व निऴा सोनदेव पहा.)