विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बालासिनोर, संस्थान. – मुंबई इलाखा. रेवाकाठां पोलिटिकल एजन्सीपैकी एक संस्थान. क्षेत्रफळ १८९ चौरस मैल. माही नदीशिवाय दुस-या महत्त्वाच्या नद्या या संस्थानांत नाहीत. येथील राजघराण्याचा मूळ पुरुष शीरखान बारी हा मोंगलाच्या पदरी होता (१६६४). त्याच्यापासून पांचवा पुरुष सलाबतखान याने जुनागडचे राज्य मिळविले. त्याच्या मरणानंतर राज्याचे दोन विभाग होऊन धाकटया मुलाला जुनागड मिळाले व बालासिनोर मोठयाकडे राहिले. मराठयांची सत्ता कायम असता हे संस्थान पेशवे व गायकवाड यांनां खंडणी देत असे. हल्ली हे इंग्रजांच्या ताब्यांतील एक देशी. संस्थान आहे. येथील नबाब हा दुस-या वर्गाचा संस्थानिक असून एजंटाच्या परवानगीशिवाय कोणत्याहि गुन्ह्याची चवकशी करून न्याय देण्याचा अधिकार आहे.
या संस्थानची लोकसंख्या (१९२१) ४४०३० होती. जमिनीवरील कराचे उत्पन्न ७२००० रु. आहे.