विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बालाघाट, जिल्हा – मध्यप्रांत. नागपूर विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ३१३२ चौरस मैल आहे. हा जिल्हा बहुतेक पाहाडी आहे. यांतील मुख्य नद्या वैनगंगा व हिच्या शाखा वागनदी, नहरा, उस्काल, मसमार माहाकारा इत्यादि. तशाच नर्मदेच्या शाखाहि या जिल्ह्यांतून वाहतात. त्यांची नावें वंजर, हालन व जमुनिया ही आहेत. यांत विस्तीर्ण जंगल आहे. सागवान फार कमी आहे. पण सालई विपुल आहे. या ठिकाणी कटंगवास उत्तम प्रकारचा मिळतो. या जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल, तरस आणि सर्प ही विपुल आहेत.
लोखंड पुष्कळ मिळते. सोने कोठे कोठे देव, सोन, सोनबेरा व नहरा या नद्यांत सांपडते त्याचप्रमाणे गेरु, सुर्मा व अभ्रक हेहि सांपडतात. म्यागनीज व बॉक्साइट ह्या धातू हल्ली या जिल्ह्यांत सांपडू लागल्या आहेत. कापड विणणे, पितळेची भांडी करणे, कांचेच्या बांगडया करणे इत्यादि व्यापार येथे चालू आहेत. या जिल्ह्यांत हल्ली रेल्वे झाली असून ती गोदिंयापासून जबलपुरास जाते. भाताचे उत्पन्न विशेष आहे. पण गहूं, वगैरे इतर धान्येहि होतात. येथील लोकांमध्ये गोंड व त्यांचे पोटभेद यांचीच संख्या जास्त आहे. शेतक-यांमध्ये लोधी आणि पवार यांची संख्या जास्त आहे. पण पवार हे चांगले शेतकरी आहेत. व्यापार करणारे लोक म्हटले म्हणजे तेली व कलार हेच मुख्यत्वेकरून आहेत. हे आपल्या धंद्याशिवाय दुसरेहि धंदे करतात. कारागीर लोक फार थोडेच आढळतात.
या जिल्ह्यांची हवा नागपूर प्रदेशाप्रमाणेच आहे. परंतु हिवतापादि रोगाची सांथ येथे मोठया प्रमाणात असते व ती आगस्टपासून तो डिंसेबरपर्यंत तर विशेषच असते. येथे पर्जन्यवृष्टि इतर जिल्ह्यांपेंक्षा अधिक (६२ इंच) असते.
ऐतिहासिकदृष्टया येथे विशेष कांही नाही. या घाटावरील भाग मराठयांनी जिंकीपर्यंत गढामंडला राजांच्या स्वाधीन होता, व खलवा भाग छत्तिसगडच्या हैहयवंशी राजाचा असावा अथवा देवगडच्या गोंड मांडलिक राजाचा असावा. हैहय राज्य हे नागपूरच्या भोसल्यानीं एक शतकापूर्वी राज्यांत मिळविले होते. व देवगडचे राज्य त्याच्यापूर्वीच घेतले होते. घाटावरील प्रदेश जसा हल्ली भरभराटीत आहे तसा केव्हांच कोणाच्या पाहण्यात नव्हता, व ६० वर्षांपूर्वी तर तो अगदीच ओसाड होता. पुढे त्याच सुमारास लक्ष्मण नाईकाने परसवाडयाच्या घाटावर पहिले गाव वसविले. त्याच्या व त्याने आणलेल्या लोकांच्या अचाट उद्योगाने परमवाडा व त्याच भोवतालची ३० गावे ही हल्ली उत्तम स्थितीत आहेत.
या ठिकाणी पूर्वी बौध्द कालीन घडीव व कोरीव दगडांची बांधलेली सुंदर मंदिरे अत्यंत पुरातन संस्कृतीचे चिन्ह म्हणून सांपडतात. विशेष शोध केल्यास ह्या संस्कृतीचा शोध लागून ती हैहयवंशी राजाच्या वेळची असावीत असे आढळून येण्याचा संभव आहे. या राजांनी मारगुड व लांजी (हल्लीचे मंडला व बालाघाट) येथे राज्य केले.
पूर्वकालीन ज्ञानार्जनाच्या साधनांपैकी बैहर तहशिलीमध्ये गोटयांनी बांधलेली तळी व मोडकळीस आलेली मंदिरे ही आहेत. ह्यांपैकी कांही हेमाडपंती आहेत. लांजीतील किल्ला गोंड राजांनी अठराव्या शतकाच्या आरंभी बांधलेला आहे. या ठिकाणी असलेली लांजकी देवी हिला पूर्वी नरबळी दिला जात असे. येथून एक मैलावर कोटश्वराचे देवालय आहे. या ठिकाणी वार्षिक यात्रा भरते. मऊ येथे तळयाच्या मध्यभागी एक दगडी चबुत्र्यावर नागाची मूर्ति असून एक खांब रोवलेला आहे.
या जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ साली ५११६३४. होती. हल्ली या जिल्ह्यांत दोन तहशिली आहेत. बालाघाट व बैहर ह्या बुटा व परसवाडा यांच्याजागी झाल्या आहेत. १९०४ साली या जिल्ह्यांतून ११ गावे मंडला जिल्ह्यास जोडली गेली. शे. ४४ लोक छत्तिसगडी भाषा बोलतात.
त ह शी ल. - क्षेत्रफळ १३८८ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) २८६६३१. या तहशिलीत बालाघाट शहर व खेडी ६०३ आहेत. वैनगंगेच्या दोन्ही कांठानी उत्तम भातजमीन आहे. यांत पांच संबध जमीनदा-या व तिहींचे काही भाग आहेत. या जमीनदारीचे एकंदर क्षेत्रफळ ४३९ चौरस मैल असून त्यापैकी २६७ चौरस मैल तर जंगलच आहे.
गां व - या जिल्ह्याचे व तहशिलीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७४००. या गावाचे मूळचे नाव बु-हा असे होते. नवीन सातपुडा रेल्वे फांटयावर हे स्टेशन आहे. येथे १८७७ साली म्युनिसिपालिटी झाली. या ठिकाणी कारखाने नाहीत, थोडासा व्यापार मात्र चालतो.