विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बार्बाडोज - बार्बाडोज हे ब्रिटिश वेस्टइंडीजपैकी एक बेट असून सेंट व्हिन्सेंटच्या पूर्वेस ७८ मैलांवर आहे. हे उत्तर अक्षांश १३०४ व पश्चिम रेखांश ४९०३७' यांवर असून क्षेत्रफळ १६६ चौरस मैल आहे. ह्या बेटाच्या समुद्रकिना-याभोवती पोवळयाचे खडक आहेत. नैर्ॠत्य किना-यावर कार्लाइलबे नावांचे नैसर्गिक असे लहान बंदर आहे. येथील हवा चांगली आहे. दरवर्षी पाऊस सुमारे ६० इंच पडतो. साखर व कापूस यांची लागवड मोठया प्रमाणावर होते. याशिवाय दारू, रासायनिक द्रव्ये, बर्फ व तंबाखू यांचे कारखाने आहेत. या बेटासाठी आगबोटी थांबतात व इंग्लंड, संयुक्त संस्थाने, कॅनडा व इतर वेस्टइंडीजबेटे यांच्याशी व्यवहार चालतो.
येथे १३४ प्राथमिक शाळा, ६ दुय्यम शाळा, ३ हायस्कुले व एक कॉलेज असून ६ वृत्तपत्रे चालतात. ह्या बेटांत प्रातिनिधीक संस्था आहेत. परंतु जबाबदारीची राज्यपध्दति नाही. बादशहास कायदा रद्द करण्याचा हक्क असून, साम्राज्यसरकार खजिनदार खेरीजकरून इतर अधिका-यांची नेमणूक करते. बेटासाठी एक गव्हर्नर असतो. शिवाय कार्यकारी कौन्सिल, ९ सरकानियुक्त सभासदाचे कायदेकौन्सिल व प्रतिनिधीमंडळ अशा संस्था आहेत. वेस्टइंडीजच्या साम्राज्य शेतकीखात्याचे मुख्य ठिकाण बार्बाडोज आहे. लोकसंख्येत नीग्रो लोकांचे जास्त प्रमाण आहे. एकंदर लोकसंख्या (१९२१) १५६३१२. ब्रिजटाऊन (१३४८६) हे राजधानीचे शहर आहे.
ह्या बेटांत प्रथम पोतुगीज लोक आले. १६२५ साली ब्रिटिशांनी प्रथम वसाहत केली. १८ व्या शतकांतील यूरोपीय युध्दे, अमेरिकेचे स्वातंत्र्य युध्द वगैरे युध्दांत बार्बाडोज बेटाला बराच त्रास झाला. ह्या बेटावर वादळे फार होतात.