विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारिया संस्थान (देवगड बारिया) - मुंबई इलाख्यांत रेवाकाठांमधील एक संस्थान. याचे क्षेत्रफळ ८१३ चौरस मैल आहे. पूर्वेस व पश्चिमेस पंचमहाल हा ब्रिटिश जिल्हा, उत्तरेस संजेली संस्थान, व दक्षिणेस छोटाउदेपूर संस्थान याची उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतची लांबी ३९ मैल आहे. दक्षिणेकडे व पूर्वेकडे डोंगर आहेत व पश्चिमेकडे सपाट मैदान आहे. यांत जंगल पुष्कळ आहे व हवा सर्द असून रोगट आहे, तापाची साथ नेहमी असते. बारियाचे जहागीरदार चव्हाण रजपूत आहेत, १२४४ च्या सुमारास मुसुलमानांनी यांस दक्षिणेकडे हांकून दिले असावे, व त्यानंतर त्यांनी चंपानेर शहर व किल्ला हस्तगत केला असावा. तेथे त्यांनी स.१४८४ पर्यंत राज्य केले व महमूद बेगडाने त्यांचा पराजय केल्यावर त्यांस तेथून जावे लागले. या वंशाच्या दोन शाखांपैकी एका शाखेने छोटाउदेपूरचे घराणे व दुसरीने बारियाचे घराणे स्थापन केले. स.१८२५ पर्यंत हे संस्थान सेंट्रल इंडिया एजन्सीचा भाग होता, परंतु नंतर ते मुंबईइलाख्यांत घालण्यात आले. या जहागीरदाराला देवगड बारियाचा महारावळ असे म्हणतात, व त्याला ९ तोफांची सलामी मिळते. याला दत्तक घेण्याची परवानगी आहे. सध्याचे महाराज महारावळ रणजितसिंगजी हे आहेत. यांनी महायुध्दांत व १९१९ च्या अफगाणयुध्दांत प्रत्यक्ष भाग घेतला होता. संस्थानात देवगड बारिया राजधानी व ४८३ खेडी असून एकंदर लोकसंख्या (१९२१) १३७२९१. लोकसंख्येपैकी भिल्ल, कोळी व नाइकडा या मुख्य जाती होत. मुख्य पिके गहूं, हरभरा, द्विदलधान्ये, मका. संस्थानात खाणी व उद्योगधंदेहि नाहीत. संस्थानिकाला प्रजेच्या सर्व गुन्ह्यांची चवकशी करण्याचा अधिकार आहे. संस्थानचे उत्पन्न ८ लाखांचे आहे. या संस्थानच्या हद्दीतून माळवा व गुजराथ यांच्यामधील मुख्य रस्त्याचा कांही भाग गेलेला आहे. त्याला बारियापासून ७ मैल लांबीचा रस्ता येऊन मिळतो. १८९२ पासून आंनदगोध्रा रेल्वे रतलामपर्यंत गेली आहे, ही या संस्थानांतून जाते. येथे एक संस्थानचा दवाखाना, मुलांच्या बारा शाळा व एक मुलींची शाळा आहे.