विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बायलर (तापक) - याचा मूळ अर्थ तापवून वाफ करणारा असा आहे. विशेषेकरून पाण्याची वाफ करण्यासाठीच याचा उपयोग फार होत असतो. व त्याच अर्थासाठी बायलर शब्द फार रूढ आहे. म्हणून हाच अर्थ यापुढे आपण धरू.
बायलर पहिल्याने साध्या लोखंडाच्या पत्र्याचे करीत असत. त्यावेळेस त्यामध्ये होणा-या वाफेचा जोरहि फार थोडा म्हणजे दर चौरस इंचाला पांच ते दहा रत्तल असा असे. पुढे वाफेच्या प्रसरणशक्तीचा उपयोग करून घेण्याची युक्ति निघाल्यापासून बायलरमध्ये होणा-या वाफेचा जोरहि वाढत चालला. हल्ली साधारणपणे हा जोर दर चौरस इंचाला १७५ ते २५० पौंड असतो. यापेक्षा जास्त जोराच्या बायलरचे वर्णन पुढे दिले आहे. हा जोर (दाब) वाढत चालल्यामुळे बायलर करण्याचे सामानहि मजबूत करण्याची जरूरी भासूं लागली. लोखंड हे साधारणपणे नरम आहे. तसेंच त्यामध्ये दाबाने आकार बदलला असता काही वेळाने पुन्हा आपला मूळ आकार धारण करण्याची शक्ति कमी आहे. यामुळे लोखंड बायलर करणे मागे पडून पोलादाच्या पत्र्याचे बायलरपुढे आले. हल्ली सर्व बायलर पोलादाचे केलेले असतात.
बायलरच्या जाती, त्यांचा आकार व त-हा यांमुळे पुष्कळ झालेल्या आहेत. कांही बायलर उभे असतात तर कांही आडवे असतात. उभे बायलर लहान शक्तीचे असतात व ते कंट्राक्टर किंवा ज्यांना शक्ति थोडी हवी असून वाफेची जरूरच असते, तेच लोक वापरतात. विशेषतः आडवेच बायलर वापरण्याचा प्रघात फार आहे. त्यांचेहि पुष्कळ प्रकार आहेत. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे कार्निश बायलर. यामध्ये पाच-सहा फूट व्यासाच्या एका मोठया बंबांत दुसरा एक दोनअडीच फूट व्यासाचा बारीक बंब बसविलेला असतो. या बारक्या बंबात (फ्ल्यू) जळण जळत असते. दुसरा प्रकार लॅंकेशायर, यामध्ये एकाच्या ऐवजी दोन बंब आंत असतात. तिसरा टयूबूलर, म्हणजे नळयांचा बायलर. यांचेहि दोन प्रकार आहेत. एकामध्ये नळयांतून जळलेले गरम वायू जात असतात व दुस-या प्रकारामध्ये नळयांतून पाणी जात असते. गरम वायू त्यांच्या बाहेरच्या बाजूला असतात. लोकोमोटिव्ह म्हणजे आगगाडीच्या एंजिनाचे बायलर व मरीन म्हणजे बोटीत घालण्याचे बायलर असेहि आणखी बायलरचे दोन प्रकार आहेत. या सर्वांचे जास्त खुलासेवार वर्णन पुढे दिले आहे.
अगदी पहिले जुन्यांत जुने बायलर असत, ते म्हणजे सर्व बाजूंनी बंद असे लोखंडी बंब असत. यामध्ये त्या बंबाच्या खाली चुला बनवून ते तापवीत असत. जेव्हा बायलरमध्ये कमी जोराची वाफ उत्पन्न करावयाची असे, त्या वेळेस हे बायलर बरे काम देत असत. पण वाफेचा दाब वाढत चालल्यापासून असल्या जातीचे बायलर मागे पडले शिवाय या जातीच्या बायलरमध्ये वाफ करण्यास कोळसाहि जास्त लागत असे, म्हणून बायलरच्या आंत कोळसा जाळण्याची पध्दत निघाली. याच पध्दतीने पहिल्याने कार्निश बायलर निघाले, यांमध्ये एका मोठया बंद बंबामध्ये लहान व्यासाचा, दोन्ही बाजूंनी उघडा बंब बसविलेला असतो. या बंबामध्ये कोळसा जाळतात. या बंबाच्या सर्व बाजूंनी पाणी असल्यामुळे जळणा-या कोळशापासून जास्त वाफ उत्पन्न होते. पण हळू हळू हेहि बायलर लहान पडावयास लागले, त्यामुळे मोठया व्यासाचे व लांब असे बायलर करूं लागले. व्यास वाढल्यामुऴे मधला उघडा बंबहि मोठया व्यासाचा करावा लागला. अशा बंबाच्या बायलरमध्ये चुला साफ करतांना काही वेळ चुल्यांत फारचा थोडा विस्तव असे व काही वेळ पुष्कळ असे. यामुऴे बायलरमध्ये वाफ सारखी न राहता एकदा पुष्कळ व एकदा कमी अशी रहात असे, व म्हणूनच एंजिनची गतीहि बदलत असे. यावर उपाय म्हणून एकच फार मोठा बंब न घालता दोन बंबाचा उपयोग करण्यांत येऊं लागला. या जातीच्या बायलरना लँकेशायर बायलर असे म्हणतात. या जातीच्या बायलरमध्ये एक बंब चालू ठेवून दुसरा साफ करता येतो. यामुळे बायलरमध्ये वाफ उत्पन्न करण्याच्या शक्तींत फारसा फरक होत नाही व वाफेचा दाबहि म्हणण्यासारखा बदलत नाही. बायलरमध्ये जळणहि सारखे जळते. या जातीचे बायलर कार्निशपेक्षा पुष्कळ मोठाले करता येतात. पहिल्याने कोळशाचा भाव फार स्वस्त असे, मजुरीहि स्वस्त असे. यामुळे थोडा कोळसा जळून पुष्कळ वाफ व्हावी, याची फारशी जरूर भासत नसे. पुढे कोळशाची किंमतहि वाढली व बायलरहि मोठे करावयाची जरूरी भासू लागली. म्हणून नळयांचे बायलर निघाले. बायलरमध्ये वाफ करण्याकरिता जितका जास्त तापलेला भाग आणि पाणी यांचा संयोग येईल तितका बायलर जास्त चांगला. कोणत्याहि लहान मोठया वर्तुळांचा परीघ त्यांच्या व्यासाच्या प्रमाणांत असतो. म्हणून एका मोठया बंबाच्या ऐवजी लहान लहान पुष्कळ बंब बसविले तर पाण्याशी संयोग येणारा नळयांचा पृष्ठभाग मोठया बंबाच्या नळीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. कार्निश बायलरपेक्षा लँकेशायर बायलर याच द्दष्टीने जास्त चांगले, कारण उष्णता देणारा पृष्ठभाग जास्त मिळतो. हेच जास्त जास्त पुढे वाढवीत गेल्यामुळे टयूबूलर बायलर उत्पन्न झाले. टयूबूलर बायलरच्या दोन जाती आहेत, एका जातीमध्ये या नळयांतून जळलेले व गरम वायू जात असतात, यांच्या बाहेरून पाणी असते व या जातींमध्ये पाण्याला फारशी गति नसते. दुस-या जातींमध्ये नळयांमधून पाणी जात असते. व जळलेले गरम वायू बाहेरून जात असतात, यांमध्ये पाण्याला फार गति असते. पहिल्या जातीच्या बायलरना फायरटयूब व दुस-यांना वाटरटयूब बायलर असें म्हणतात. मरीन बायलर लोकोमोटिव्ह (आगगाडीचे बायलर), पोर्टेबल (गाडीवर बसविलेले), लहान बायलर हे सर्व याच जातीचे असतात. पण मोठेमोठे विजेचे कारखाने, केव्हा केव्हा गिरण्या किंवा इतर ज्या ठिकाणी पुष्कऴ वाफ उत्पन्न करावी लागत असेल अशा ठिकाणी वाटरटयूब बायलर वापरतात. फायरटयूब बायलरचा बाहेरचा बंब पुष्कळ वेळा किंवा बहुतेक सर्व वेळ वाटोळच असतो. पण वाटरटयूब बायलरना बंब बहुतकरून नसतोच. ते चौकोनी पत्रे एका ठिकाणी जोडून केलेले असतात. हे पत्रे बायलर बसविण्याच्या जागेवर नेऊन बसविता येत असल्यामुळे बायलर नेण्याआणण्यास चांगला सुटसुटीत असतो.
येवढया वर्णनावरून टयूबूलर बायलर चांगले व लँकेशायर अगदी टाकाऊ असे नाही. दोहोंमध्येहि फायदे-तोटे आहेतच. विशेषतः पाणी जेथे चांगले नाही, बायलर वारंवार साफ करावा लागतो अशा जागी टयूबूलर बायलरपेक्षा लँकेशायर बायलरच चांगले. यांत आंत जाउच्न साफसफाई करतां येते. नवीन निघालेल्या बायलरमध्ये सांधे व रिव्हेट फारच कमी असल्यामुऴे त्या ठिकाणी गंजणे, धातू खाऊन जाणे इत्यादि प्रकारहि फार थोडे होतात. बायलर अगदी साधा असतो. याच्याउलट वाटरटयूब बायलरमध्ये कोणताहि भाग बिघडला असता दुस-या कोणत्याहि भागाला कधीहि त्रास न देतां नवा काढून बसविता येतो व बायलर अगदी को-यासारखा बनतो, बायलरचे वजन कमी असते, बायलरमध्ये वाफ जलदी व कमी कोळशाने तयार होते, बायलरमध्ये पाणी कमी पुरते, बायलर फुटण्याची भीति अगदी कमी असते, व फुटल्यास अपघात होण्याचीहि भीति अतिशय कमी असते.
लोकोपोटिव्ह म्हणजे आगगाडीच्या एंजिनचे बायलर हे सर्व फायरटयूब जातीचे असतात. यांची नळया असणारी जागा वाटोळया बंबाची असते. आणि कोळसा जळणारी जागा चौकोनी असते व बायलर गाडीवर बसविण्याचे असल्यामुळे जास्त लांबट व अरुंद पण सुटसुटीत असतात. याच्या उलट मरीन म्हणजे बोटीत बसविण्याचे बायलर असतात. हेहि फायरटयूब जातीचेच असतात. पण लांबीपेक्षा याची रुंदीच जास्त असते. यांना कोणी स्कॉच बायलर असेंहि म्हणतात. या जातीच्या मोठमोठया बायलरमध्ये चारचारहि चुले (आग मारण्याच्य जागा) असतात, त्यांपैकी काही सरळ नळयांचे असतात, व काही वाकडया नळयांचेहि असतात. फ्लाश म्हणून एक बायलर असतो त्यांत एक नळीचे वेटाळेंच असते. यामध्ये एका तोंडाने पाणी येते, व दुस-या तोंडाने वाफ बाहेर निघते. काही लहान जातीच्या बायलरमध्ये एकांत एक अशा दोन नळया असतात. जमिनीवर वापरण्याच्या चांगल्या बायलरमध्ये बेंबकाक, विलकाक्स, स्टर्लींग, हाईन वगैरे बायलर प्रसिध्द आहेत. व बोटीवर घालण्याचया बायलरमध्ये थार्निक्ट व यारो हे बायलर जास्त प्रसिध्द आहेत. या जातीचे बायलर विशेषेकरून सर्व जातीच्या आरमारी बोटींत जास्त व क्वचित मोठमोठया उत्तम व चालीच्या उतारूंच्या बोटीत वापरतात. प्रत्येक बायलरमध्ये किती दाबाची वाफ उत्पन्न करावयाची हे त्याच्या पत्र्याची जाडी, लांबी, रुंदी वगैरेंवर ठरविलेले असते. त्यापेक्षा जास्त वाफ झाल्यास बायलरला अपाय होऊं नये म्हणून आपोआप उघडणारा एक पडदा (व्हाल्व) लाविलेला असतो याला संरक्षक पडदा (सेफ्टी व्हाल्व्ह) असे म्हणतात. हा जोरदार स्प्रिंगानी किंवा वजनाने दाबून धरलेला असतो. बायलरमध्ये जाण्यासाठी एक मोठे माणूस आंत जाईल ऐवढे भोक असते त्याला 'मेंन होल' असे म्हणतात. तसेंच खालच्या बाजूला लहानसे भोंक असते, त्याला मडहोल असे म्हणतात. याशिवाय प्रत्येक बायलरला आंत पाणी घाण्यासाठी एक व आंत झालेली वाफ बाहेर काढण्यासाठी एक अशी दोन भोके असतात. यांवर व्हाल्व बसविलेले असतात. बायलरमध्ये चालू असताना ठराविक उंचीपर्यंत पाणी ठेवलेच पाहिजे. याखाली पाण्याची पातळी जास्त गेल्यास बायलरचे फ्ल्यू किंवा टयूब फुटण्याचा फार संभव असतो. म्हणून पाणी खाली गेल्यास ते कळावे म्हणून एक शिटी किंवा व्हाल्व ठेवलेला असतो. याला हाय व लोवाटर लेव्हल असे म्हणतात. बहुतेक सर्व बायलरना या गोष्टी असतातच. सेफ्टी व्हाल्व व ड्रेनकाक (बायलरमधील पाणी काढण्याचा काक) हे सर्व बायलरनां असलेच पाहिजेत.
बायलरमध्ये उत्पन्न होणा-या वाफेचा दाब दर चौरस इंचास किती असावा हे बायलर करतांना त्यांत जे सामान वापरले असेल त्यावंर ठरविलेले असते. फार लहान बायलर ६० पासून १०० पौंड दाबाचे असतात. अलीकडे सर्वसाधारणपणे मोठे बायलर १५०।२०० पौंडपर्यंत दाबाचे वापरावयास लागले आहेत. पुष्कळ ठिकाणी ३०० पासून ३५० पौड दाबाचेहि असतात. हे बहुतेक वीज उत्पन्न करण्याच्या कारखान्यांत आहेत. कांही अतिशय मोठया वीज उत्पन्न करण्याच्या कारखान्यांत ५०० पौंड दाबाची वाफ उत्पन्न करण्याचे बायलर चालू आहेत. हे सर्व वाटरटयूब जातीचे आहेत. दोन चार मोठाल्या पावरस्टेशनमध्ये १२५० पौंड दाबाचे बायलर घालण्याचा विचार चालू आहे. आणि एका ठिकाणी तर ३००० पौंड दाबाच्या वाफेचा बायलर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की एवढया दाबाची वाफ उत्पन्न होण्याच्या वेळी पाणी मुळीच उकळत नसते व पाण्यापासून एकदम वाफच उत्पन्न होते. (लेखक वा.ह. मनोहर).