विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बायरन, जॉर्ज गॉर्डन (१७८८-१८२४) - एक सुप्रसिध्द आंग्ल कवि. याचे शिक्षण हॅरो व केंब्रिज येथील विश्वविद्यालयांत झाले. या ठिकाणी शिकत असतां त्याने १८०७ साली 'अवर्स ऑफ आयड्लनेस' हे काव्य लिहिले. याच्यावरील एडिंबरो रिव्ह्यूच्या झणझणित टीकेला उत्तर म्हणून 'इंग्लिश बार्ड्स व स्कॉच रिव्ह्यूअर्स' हे काव्य त्याने प्रसिध्द केले. १८०९ साली तो युरोपमध्ये प्रवासाला गेला. या प्रवासांत त्याने 'चाईल्ड हॅरोल्ड' या त्याच्या अतिप्रसिध्द काव्याचे दोन सर्ग लिहिले. त्यामुळे त्याची फार प्रसिध्दी झाली. याचे ऍना इसाबेला बँटे हिच्याशी लग्न झाले, व या विवाहापासून ऑगस्टा इडा या नांवाची त्याला मुलगी झाली. पुढे त्याचे बायकोशी पटेनासे होऊन व त्याच्या स्वैरवर्तनामुळे सर्व इंग्लिश समाज त्याच्यावर ताशेरा झाडूं लागल्यामुळे त्याने वैतागाने इंग्लंडला रामराम ठोकला व बेल्जम, जिनिव्हा, स्वित्झर्लंड, व्हेनिस इत्यादि ठिकाणी मनसोक्त प्रवास केला. स्वित्झर्लंड येथे असतानां त्याने 'चाईल्ड हॅरॉल्ड' चा तिसरा खंड, व व्हेनिस येथे चवथा खंड लिहिला. १८१८-२० या काळाच्या दरम्यान डॉन जुआन या काव्याचे चार भाग त्याने प्रसिध्द केले. १८२२ साली या काव्याची त्याने समाप्ति केली. १८२३ साली ग्रीसला जाऊन त्याने ग्रीसच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला मनोभावे मदत केली. १८२४ साली तो मरण पावला. शेक्सपियरच्या खालोखाल बायरनची कवि या नात्याने प्रसिध्दी आहे. यूरोपमध्ये तर काही काळपर्यंत शेक्यपीयरपेक्षांहि याला श्रेष्ठ मानीत असत. त्याच्या काव्यांत मनोविकाराचे प्राधान्य दिसून येते. त्याची भाषा अत्यंत जोरदार असून वर्णनशैलीहि वाखाणण्यासारखी होती. वरील काव्याशिवाय कॉर्सेर, लारा, मॅनफ्रेड, केन, दि डीफार्म्ड ट्रॅन्सफॉर्म्ड, मॅरीनो फालेरो, लिबरल, व्हिजन ऑफ जजमेंट इत्यादि त्याची काव्यें व नाटके प्रसिध्द आहेत.