विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाभ्रा - ओरिसामधील एक मांडलिक संस्थान. हे संस्थान महानदीचे खोरे व छोटा नागपूर यांच्यामध्ये आहे. याचा पूर्व भाग डोंगराळ व जंगली आणि पश्चिम व उत्तर भाग खुला आणि सुपीक आहे. क्षेत्रफळ १९८८ चौरस मैल. देवगड हे राजधानीचे ठिकाण आहे. ब्राह्मणी ही एकच महत्त्वाची नदी या संस्थानांतून वहाते. बान्नाचा पहिला राजा पाटणा संस्थानच्या राजघराण्यांतून चोरून आणला होता अशी दंतकथा आहे. हल्ली या संस्थानवर देखरेख करण्याकरता पोलिटिकल एजंट नेमिलेला आहे. इ.स. १९११ मध्ये संस्थानची लोकसंख्या १३८०१६ होती. उडिया, चासा, किसान, गाहरा व गांडा या येथील मुख्य जाती आहेत. कांही गोंड भूये लोकहि आहेत. शें. ७७ लोक उडिया भाषा बोलतात.
तांदूळ, नीळ, एरंडी ही येथील मुख्य पिके आहेत. सरकारी जंगलांचे क्षेत्रफळ १७३४ चौरस मैल असून त्यांत साल नांवाची झाडे होतात. लाख, रेशीम, कात, हिरडे हे पदार्थ येथील जंगलात होतात. या संस्थानच्या ईशान्य कोप-यांतून-बंगाल नागपूर रेल्वेचा फांटा गेलेला असून बाम्रा रोड व गारपो ही दोन स्टेशने या संस्थानांत आहेत.
१९०४ साली या संस्थानाचे एकंदर उत्पन्न १५४००० रु. होते. हे संस्थान ब्रिटिश सरकारला १५०० रुपये खंडणीदाखल देते. संस्थानच्या लोकसंख्येपैकी शे. ४ लोकांना लिहितावाचता येते.