विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाबूजी नाईक जोशी - बारामतीकर जोशी हे मूळचे कोकणांत केळशी गावचे रहाणारे, त्यांच्यापैकी केशव नाईक नावाचा एक पुरुष काशीस जाऊन सावकारी करू लागला. हा बहुधा शिवाजीचा समकालीन असावा. केशव नाईकास सदाशिव, कृष्ण व अंतोबा असे तीन पुत्र होते. पैकी कृष्णाजी नाईक शाहूबरोबर दक्षिणेंत आला. साता-यास येऊन राज्य मिळेपर्यंत शाहूस पैसा लागला तो नाईकांनी पुरविला, म्हणून शाहूचा त्यांजवर लोभ जडून त्याने नायकांस उदयास आणण्याची खटपट केली. सदाशिव नाईकहि सावकारीत हुशार म्हणून गणला जात असे. त्याच्या पेढया सर्व मोठमोठया ठिकाणी देशभर होत्या. कृष्णाजी नाईकास शनिवार पेठेची चौधरी अमलदारी होती. कृष्णाजीचा मुलगा विश्वनाथ साता-यास सावकारी करी आणि दुसरा मुलगा नारायणराव नागपूरच्या भोसल्यांकडे दिवाणगिरीवर असून लढाईंत मृत्यू पावला. नारायणरावाचा मुलगा कृष्णराव उत्तरपेशवाईंत प्रसिध्द असून साता-यास नाईकाचा वाडा आहे. तो या कृष्णरावाने स. १६८५ त बांधिला. तो पेशव्यांकडून टिप्पूजवळ वकील होता. पेशवाई बुडाल्यावर तो महाराजांचा खासगी कारभारी होऊन सन १८२५ च्या सुमारास मृत्यू पावला. याचे वंशज साता-यास आहेत.
सदाशिव नाईक हा बारामतीकरांचा मूळपुरुष समजला जातो. तो व त्याचे मुलगे सावकारीचा धंदा करीत असतां बाळाजी विश्वनाथाने आपली मुलगी भिऊबाई आबाजी नाईकास दिली, त्यामुळे नाईकांस विशेष पांठिबा मिळून त्यांना राज्याची कामे करण्यास संधि मिळाली. सदाशिवाचा द्वितीय पुत्र प्रस्तुत बाबूजी नाईक होय.
नाईक व पेशव्यांचे काही दिवस वितुष्ट होते. स.१७४३ त बारामतीस जहागीर मिळवून तेथे वाडा बांधून नाईक राहूं लागले. स.१७५३ त नाईकांनी पेशव्यांशी समेट केला. माधवराव पेशव्यांस त्याचे साहाय्य चांगले होते. स. १७६२ त नाईकाने चंद्रसेनाचा पुत्र रामचंद्र माधव यांस निजामाकडून फोडून पेशव्याच्या बाजूस आणिले. माधवरावाच्या मरणसमयी बाबूजी नाईक त्यांच्याजवळ थेउरास होता. रघुनाथरावाची मुलगी दुर्गाबाई ही बाबूजीचा मुलगा पांडुरंगराव यास दिलेली असून हे लग्न ता. ७/२/१७७३ रोजी झाले परशुरामभाऊ पटवर्धनाची मुलगी बाबूजीच्या चवथ्या मुलास दिली असून, तो मुलगा लग्नाच्या पंधराव्या दिवशी वारला. याचविधवा मुलीसंबंधाने पुनर्विवाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता. नारायणरावाच्या खुनानंतर बाबूजी नाईक हा रघुनाथरावाच्या विरुध्द होता.
भट घराण्यांत पेशवेगिरी गेल्यापासून सुमारे सत्तर वर्षे मराठेशाहीच्या कारभारांत वावरत असलेला असा बाबूजी नाईक हा एकच पुरुष दिसतो. तो रसिक व गुणज्ञ होता. मोरोपंत कवीचा उद्योग प्रगट होण्यास बाबूजीचा आश्रय कारण झाला. बाबूजी नाईक स.१७८० च्या सुमारास व त्याचा मुलगा पांडुरंगराव १७९४ साली वारला. पश्चात या घराण्याची वाताहत झाली. (म.रि.वि.३)