विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाबिलोनिया - तैग्रीस व युफ्रेटीस ह्या दोन नद्यांच्या मधील प्रदेश भौगोलिक व ऐतिहासिक द्दष्टया एकच देश होय. प्राचीन ग्रंथकार ह्याला असीरिया म्हणत. पण वास्तविक याला बाबिलोनिया असेंच म्हणणे सोईचे होते. पुढे कांही काळानंतर बाबिलोनिया हे नांव रूढ झाले. या प्रदेशाचे उत्तर व दक्षिण म्हणजे डोंगराळ व दलदलीचा प्रदेश असे दोन भाग होतात. असुरखेरीज निनेव्हे, कॅला व अरबेला ही शहरें तैग्रीस नदीच्या पश्चिम तीरावर होती.
असीरिया हे नांव असुर शहरावरून पडले आहे. हे शहर तैग्रीस नदीच्या उजव्या तीरावर असून याला सध्या काले शेरगट नांव आहे. या शहरी बरेच दिवस राजधानी होती. नंतर कॅला (निमरुड), निनेव्हे (नेबीयुनुस व कुयुंजीक) आणि दुर-सारजिना ह्या शहरी राजधानी गेली. तैग्रीसच्या पश्चिम तीरावर असलेल्या मेसापोटेमियन मैदानाला विसद्दश असे सुपीक खाल्डियन मैदान आहे. याच मैदानांत जुन्या राजधानीचे उर हे शहर होते. बाबिलोन व सिपरा ही दोन शहरे नदीच्या अरबस्तान खाल्डिया या दोन बाजूंवर होती. अराख्तू अथवा 'बाबिलोनची नदी' दक्षिणेस व नेजेफ हा गोडया पाण्याचा समुद्र नैर्ॠत्येस आहेत. या समुद्राच्या खालच्या बाजूस प्रसिध्द खाल्डियन दलदलीचा प्रदेश आहे.
युफ्रेटीसच्या पूर्वेस व सिपराच्या दक्षिणेस फिस व निप्पुर शहरे होती. ह्या ठिकाणी एलल्लिचे मंदिर होते. शातेलाच्या पूर्वेस लगाश होते. बाबिलोनियन मैदानाला एदिन नावं होते. दक्षिण बाबिलोनियाला कॅगी सुमेर हे नावं होते. पुढे सुमेर नांव सर्व देशाला लावण्यांत आले. अक्कड नावं उत्तर बाबिलोनियाला असे. साम्राज्य या नांवाखाली 'सुमेर आणि अक्कड' म्हणजे सर्व बाबिलोनियाचा समावेश होई.
ज्या ठिकाणी सर्व देशभर शहरे होती त्या ठिकाणी आता उंच टेकाडे आहेत. तेव्हा लोकवस्ती फार दाट होती. बाबिलोनिया देशांत पाटबंधारे व शिल्पकला प्रथम उदयास आल्या. येथील तीन कालावे फार प्रसिध्द असून त्यांची नावेः-झषझलात, कुथा व आरमाल्का अथवा राजाचा कालवा.
इ ति हा स सा हि त्य - बोट्टा व लेगर्ड यांनी निनेव्हे येथे खणून नवीन शोध लाविले. शिवाय पाचरीसारखी लिपी वाचण्यांत ते वाकबगार झाले लेयर्डने असुर बनिपालचे ग्रंथसंग्रहालय शोधून काढल्यामुळे असीरियाचा व बाबिलोनियाचा प्राचीन इतिहास व सामाजिक स्थिति यांची कल्पना विद्वान लोकांस आली. बाबिलोनियांत खणण्याचे काम प्रथम ह्याच संशोधकाने केले. याशिवाय सुसा येथे सुध्दां दुस-या लोकांनी खणण्याचे काम सुरू केले. ब्रिटिश म्यूझियमतर्फे होर्मझ रझम याने स १८७७-७९ च्या सुमारास निनेव्हे व त्याच्या आसमंतातभागी काम सुरू केले. यावेळेस व नंतर बरेच नवीन शोध लागले.
फ्रेंच वकील दसार्झेक याने टेलो येथे खणण्यास सुरवात केली. यावेळेस सेमिटिकयुगापूर्वीचे काही अवशेष सांपडले. यानंतरच्या टेलो येथील शोधांत ख्रि.पूर्व ४००० पर्यंतच्या इतिहासाची सामुग्री मिळून शिवाय ३०००० इष्टिकालेख सांपडले. त्याचप्रमाणे कांही जर्मन व अमेरिकन संशोधकांनी यत्न केले. तुर्की सरकाराने देखील या बाबतीत दिरंगाई केली नाही. कान्स्टांटिनोपल येथील पदार्थसंग्रहालयांत बरेच लेख आहेत.
यांशिवाय 'असीरिया व बाबिलोनियाचा समकालीन इतिहास' आणि डॉ. पिचेसला सांपडलेले 'बाबिलोनियाचा वृत्तांत' ही दोन पुस्तके प्रसिध्द आहेत. पहिल्या पुस्तकांत त्या दोन देशांतील सलोख्याचे अथवा शत्रुत्वाच्या संबंधाचे टांचण आहे व दुस-यांत बाबिलोनियाचा इतिहास आहे.
बाबिलोनियाचा इतिहास, बाबिलोनी संस्कृति, बाबिलोनियांतील सामाजिक स्थिति आणि बाबिलोनियांतील मुख्य शहरे, इत्यादिकांकरिता ज्ञानकोश प्रस्तावनाखंड, विभाग ३, उत्तरार्थ असुरी-बाबिलोनी संस्कृति हे प्रकरण पहा.
ई श्व र वि ष य क क ल्प ना. - बाबिलोनियाच्या धार्मिक इतिहासाचे, उपलब्ध माहितीवरून जर पर्यालोचन केले तर युफ्रेटीज खो-यांतील लोकांचा इतिहास व या धर्माचा इतिहास यांत बरेच साम्य दिसून येते. ज्या गोष्टींच्या ऐतिहासिक सत्याबद्दल कांहीच पत्ता लागत नाही असल्या गोष्टी सोडून दिल्या तरी 'खमुरब्बी' याच्या पूर्वीच्या काळांतला इतिहास व नंतरच्या काळांतला इतिहास असे या इतिहासाचे दोन भाग पडतात. खमुरब्बी याने ख्रि.पू.२२५० च्या सुमारास ज्या वेळी युफ्रेटीस खो-यांतील संस्थाने एकत्र आणली, त्या वेळेपासून त्या लोकांच्या राजकीय व धार्मिक इतिहासांतील एका नव्या युगास प्रारंभ झाला. या पूर्वीच्या काळांत निरनिराळया ठिकाणी धर्मपंथ होते व त्यांतील देवतांमध्ये कोणीतरी मुख्य देवता कल्पिली जात होती. या मुख्य देवतेचा मान तो विशिष्ट धर्मपंथ जेथपर्यंत चालत असेल तेथपर्यंतच तेवढया प्रदेशांत राही. देवतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न मुख्य मुख्य धार्मिक व राजकीय ठाण्यांच्या ठिकाणी झाला, परंतु खमुरब्बी याने माडुक देवतेला सर्वच देवांत श्रेष्ठ बनविण्याचा जो प्रयत्न केला त्याचे परिणाम वरच्यासारख्या प्रयत्नांपेक्षा पुष्कळ काळ टिकले.
मार्डुक या देवांची पत्नी सर्पनिट् नांवाची होती. व या जोडप्याच्या प्रभावळीत सर्व इआ, डंकिन वगैरे जुन्या जुन्या मुख्य देवता असत. पूर्वीच्या काळांतील देवतांची मालिका या वेळेच्या काळाला मिळती करून घेण्याच्या उद्योगांत त्या त्या विशिष्ट देवतांचे मुख्य मुख्य गुण मार्डुक देवतेच्या अंगी लावले जावे ही गोष्ट अगदी साहजिक आहे. अशामुळे मार्डुक ही जी पूर्वी आदित्य देवता होती ती विदयुतदेवता बनली, कारण बेल्, इआ, शंष, नर्गल, अदद वगैरे देवतांचे गुण हिच्या अंगी लाविले.
सर्व देवतांना उद्देशून जी काही स्तोत्रे लिहिली गेली होती, त्यांची मार्डुक देवतेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने पुनर्रचना करण्यांत आली. या उद्योगांत देवतांच्या अंगचे गुण लापल्यासारखे होऊन ते या माडुर्क देवतेच्या अंगी लावले गेले. यापैकी, दोन देवतांचे अस्तित्व कायम राखण्यांत आले होते. ह्या दोन देवता म्हणजे अनु व इष्टर या होत. अनु ही आकाशाची देवता (वायुदेवता?) होय, व इष्टर ही पृथ्वीची देवता होय.
देवतांचे शिस्तवार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न खमुरबीच्या काळानंतर जरी झाला तरी इष्टर देवतेच्या स्वतंत्र अस्तित्वास त्याने धक्का पोचला नाही ही गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. असीरियांतील मुख्य देवता जी असुर तिच्याशी या इष्टर देवतेचा संबंध जोडलेला आहे, तसाच तो मार्डुक याच्याशीहि आहे. अनु, बेल व इआ या देवतात्रयीने विश्वाचे ३ विभाग दर्शविले जात होते, तर शंष, इष्टर व पाप(सिव) या देवतात्रयीने चंद्र, सूर्य व चैतन्यशक्ति ही दर्शविली जात होती.
'बालिलोनियन' इतिहासाचा यानंतरचा जो भाग आहे, त्यामध्ये सर्वांभूती एक देव पहाण्याच्या कल्पनेचा विकास जरी हळू हळू होत होता तरी मार्डुक देवता व तिच्या भोवतीच्या देवांची प्रभावळ ही कायमच राहिली. असीरिया देशांत असाच प्रकार झाला, परंतु, देवतासमूहाचे प्रमुखत्व मार्डुककडे न जाता, असुर या देवाकडे गेले हा यांत मोठा फरक होय.
बाबिलोनियन लोकांनी असीरियन लोकांना त्रास देण्यास सुरवात केली तेव्हा, मात्र मार्डुक व असुर हे एकमेकांचे वैरी बनले. मार्डुकबद्दल असुर ही देवता मुख्य मानिली गेली एवढी एकच गोष्ट कायती असीरियन लोकांत विशेष होय. बाकी किरकोळ फरक वजा घालता, बाबिलोनिया व असीरिया यांच्या देवता एकच आहेत.
ख्रि.पू.३५०० पासून ख्रि.पू. ३०० पर्यंतच्या एवढया काळांत असीरिया व बाबिलोनिया या दोन्ही देशांतील धर्मशास्त्रांत नक्षत्रांना देवतात्व प्राप्त होऊन शेवटी मार्डुक म्हणजे गुरु-ज्यूपिटर, इष्ट म्हणजे शुक्र, नर्गल म्हणजे मंगळ, नीबो म्हणजे बुध व निनिब म्हणजे शनि असे म्हणण्यायपर्यंत मजल आली. आणि यामुळे आकाशस्थ ग्रहांची वगैरे माहिती होणे ही गोष्ट अत्यावश्यक होऊन बसल्यामुळे त्यांतून ज्योतिषशास्त्र निर्माण झाले. 'खाल्डियन विद्या' हा शब्द ज्योतिषाचा पर्यायशब्द होऊन बसला आहे.
धार्मिक विधी व ज्योतिष यांची अशा त-हेने सांगड पडल्यामुळे यांतून फलज्योतिष उत्पन्न झाले. असीरियाचा राजा असुरबनिपाल याच्या संग्रहात या प्रकारच्या ज्योतिषप्रधान धर्मासंबधाच्या गोष्टीत शकुननिदर्शक गोष्टीचा संग्रह ब-याच मोठया प्रमाणांत सांपडतो ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे.
ज्या धर्मग्रंथांवर या ज्योतिषविषयक मतांचा फारसा पगडा बसला नाही अशा ग्रंथांची एक निराळीच मलिका बनून तीत सर्व देवतांचे एकीकरण होऊन मार्डुक व त्याची पत्नी व असुर आणि त्याची पत्नी इष्टर या दोन जोडयांच्या पूजा अनुक्रमे दक्षिण व उत्तर भागांत चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला यांत दिसतो.
या धर्मातील तात्त्विक विचारांच्या उत्क्रांतीकडे पहिले तर देवतांच्या अंगचे गुण व मनुष्याने करावयाची कर्तव्ये यांचा बराचसा संबंध जोडलेला दिसतो. मार्डुक ही देवता दया आणि प्रेमळपणा यांची मूर्ति असे म्हटले आहे. (मार्डुक यांची मार्डीकं, मार्डीके, मार्डीकेभिः अशी तीन रुपे ॠग्वेदांत. १.७९. ९,७ ८२,८; ९१, २;४. ८, १२; ८,७, ३० या ठिकाणी सांपडतात. त्यांचा अर्थ सर्व ठिकाणी सायणाचार्यांनी 'सुख' असा घेतलेला आहे ही गोष्ट 'मार्डुक' देवतेचा दया व प्रेमळपणा हा मुख्य गुण बाबिलोनियन धर्मात मानिला आहे असे म्हणतांना लक्षांत ठेवावयास पाहिजे. तिआमत व मार्डुक यांचे युध्द म्हणजे इंद्रवृत्राचेंच युध्द होय असे लो.टिळक यानी 'खाल्डियन व इंडियन वेद' या विषयावरच्या लेखांत म्हटले आहे.).
मृत्यूनंतर मुनष्याचे काय होते या संबंधांत त्यांच्या कल्पना अशा आहेत. अप्सु नावाचा एक समुद्र या पृथ्वीला वेष्टून राहिला आहे, व त्याच्याच जवळ एक मोठी अंधारी गुहा असून तीत या मृत माणसांनां ठेवण्यांत येते व तेथे त्यांचे आयुष्य कष्टमय स्थितीत जाते. कधी कधी, एखाद्या वशिल्याच्या माणसाला या सामान्य चक्रातून सुटतां येते व एका सुखकारक अशा बेटावर त्याला ठेवितात. या धर्ममतांचा-कल्पनांचा परिणाम सेमेटिक लोकांवर विशेषच झाला व यांच्या ज्योतिषप्रधान धर्मविषयक कल्पनांची छाप ग्रीक, रोमन वगैरे जुनाट राष्ट्रांवर बरीच बसली होती. या मतांची छाया 'न्यू टेस्टॅमेंट' पर्यंतहि दिसते.