विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाबर (१४८३ - १५३०) - पहिला मोंगल बादशहा, हा बापाकडून तैमूरलंग तुर्काचा व आईकडून चेंगीजखान मोगलाचा वंशज होता. समर्कंद येथे अहमंद मीर्झा राज्य करीत होता, तो मरण पावला व बाबराचा दुसरा चुलता महंमूद मीर्झा यास ते राज्य मिळाले पण तोहि स.१४९५ त मरण पावल्यावर अनेक आसामी समर्कंदावर चालून गेले त्यांत बाबरहि गेला नोव्हेबर स.१४९७ त समर्कंद त्याच्या हातांत आले. तैमूरच्या राजधानीत त्यास राज्यभिषेक झाला, आणि त्या ठिकाणी आपला नीट बंदोबस्त करण्याच्या उद्योगास तो लागला. सन १५१९त बाबराने हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. ह्या वेळी चिनाब नदीपर्यंत जाऊन बाबर काबुलास परत गेला. त्याच वर्षी त्याने हिंदुस्थानावर दुसरी स्वारी केली. परंतु पुनरपि पहिल्याप्रमाणे त्यास परत जावे लागलें.
पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी स्वतंत्र कारभार करू लागला होता, त्याने दिल्लीच्या सुलतानाविरुध्द लढण्यास सन १५२४त बाबराची मदत मागितली, बाबरास हेंच पाहिजे होते. तो तात्काळ हिंदुस्थानांत आला व इब्राहीमखानाच्या फौजेबरोबर लढून त्याने पंजाबप्रांत घेतला. पुढे बाबराने जसजशी संधि सांपडेल तसतशा स्वा-या करून बहुतेक हिंदुस्थान काबीज केले.
रजपुतांच्या सर्व राज्यांत ह्या वेळेस मेवाडचे राज्य फार बलिष्ट होते. चितोडवर राणा संग राज्य करीत होता चितोडच्या घराण्यांत आजपर्यंत जे नामाकिंत राजे होऊन गेले, त्यांत संगराण्याची गणना आहे बाबरसारख्या बलिष्ट माणसास आपल्या देशांत राहूं देऊ नये म्हणून संगराण्याने युध्दाची तयारी केली. बाबरहि सैन्यानिशी तयारीतच होता. दोन्ही सैन्यांची शिक्री येथे गांठ पडली, व अखेर संगराण्याचा पराभव झाला (१६ मार्च, सन १५२८).
हिंदुस्थानांत आल्यापासून बाबरास वरचेवर ताप येऊ लागला, आणि त्याची प्रकृति हळू हळू क्षीण होत चालली, व शेवटी ता. २६ डिंसेबर स.१५३० रोजी तो मरण पावला. बाबर हा हिंदुस्थान व आशिया ह्यांस जोडणा-या सांखळीतील मध्यवर्ती दुवा होय. बारा वर्षांचा असता बाप वारला तेव्हापासून मरेपर्यंत बाबराने एकंदर छत्तीस वर्षे राज्य केले. मध्यतंरी अनेक प्रसंगी त्याचे राज्य गेले होते. त्याची हिंदुस्थानांतील कारकीर्द थोडी आहे. बाबर विद्वान व रसिक असून त्याने आपले आत्मचरित्र इत्थंभूत लिहून ठेविले आहे. ते अत्यंत रसभरित व वाचण्यालायक आहे. (बील, मुसुरिया, एलफिन्स्टन, इलियट डॉसन)