विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाप्पा रावळ - बाप्पा हा चितोडच्या मोरी राजाचा मांडलिक होता. रावळ म्हणजे लहानसा राजा, उदेपूरच्या उत्तरेस नागदा (पूर्वीचे नाग-हद) नामक जे लहानसे गांव आहे, तेथे बाप्पा राबळ राज्य करीत असे; व अरवली पर्वताच्या द-याखो-यांवर व तेथे राहणा-या भिल्ल वगैरे लोकांवर त्याचा अम्मल असे. मूळच्या वलभी राजघराण्याची एक शाखा प्राचीन काळी ईदर येथे प्रस्थापित झाली व तिच्या कित्येक उपशाखा पसरल्या. त्यांपैकी बाप्परावळाची उपशाखा होय. बाप्परावळ हा अत्यंत स्वधर्माभिमानी होता व त्यास गोहिंसक अरबांचा अत्यंत संताप येत असे. त्याने द-याखो-यांत राहणा-या भिल्ल लोकांस आपलेसे केले व त्यांच्या साहाय्याने त्याने प्रथम अरबांचे हल्ले परतविले. या विजयाने बाप्पारावळ अत्यंत विख्यात झाला आणि होता होता त्यास चितोडचे सार्वभौम पद प्राप्त झाले. याविषयी ब-याच अख्यायिका आहेत. मोरी घराणे लुप्त होऊन गुहिलोट घराणे चितोडास स्थापन झाले व आजतागायत ते अव्याहात चालू आहे. या गुहिलोट घराण्याची स्थापना, राजपुतान्यांत बाप्पाने केली. त्याच घराण्याच्या पुढे अनेक विध शाखा झाल्या व त्या घराण्यांतील लोकांची संख्या आजमितीस एक लक्षाहून अधिक आहे. बाप्पारावळ हा दीर्घायुषी होता. त्याने अनेक भार्या वरिल्या होत्या व त्यास संततीहि बरीच झाली. तो इतका दीर्घकाल जगला की, राज्यकारभारास कंटाळून त्याने युवराजाच्या स्वाधीन सर्व अधिकार केले व आपण शिवोपासक यति झाला. दंतकथादिकांचा विचार करता बाप्पारावळाची कारकीर्द सन ७१३ पासून ७७३ पर्येंत केव्हा तरी सुरू झाली असे म्हणण्यास हरकत नाही. (म.भा.भा.२)