विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बानर्जी सर सुरेंद्रनाथ (१८४८ - १९२५) - एक राजकीय पुढारी. सुरेंद्राचा जन्म बंगाल्यातील एका सुप्रसिध्द कुलीन ब्राह्मणकुऴांत झाला. सुरेंद्रनाथ हे स. १८६८ त बी.ए. झाले. त्यांची हुशारी पाहून सिव्हिल सर्व्हिससाठी इंग्लंडास पाठविण्यांत आले. ते वयाच्या २२ व्या वर्षी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाले.
हिंदुस्थानांत आल्यावर सिल्हेट येथे मॅजिस्ट्रेटच्या हुद्दयावर त्यांची नेमणूक झाली. तेथे आंग्लोइंडियन अधिका-यांनी त्यांच्याविरुध्द एक कुलंगडे उपस्थित केले व त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यांत आले. या बडतर्फीमुळेच बॅरिस्टरच्या वर्गातहि त्यांचा प्रवेश झाला नाही. व अखेरीस दोनदा इंग्लंडला जाऊन आल्यावर त्यानी एका शाळेंत मास्तरची नोकरी पत्करली.
शिक्षकाचा धंदा पत्करल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सभा स्थापन केल्या व विद्यार्थ्यांपुढे देशभक्तिपर व्याख्याने देण्यांस सुरवात केली. राजकीय कामाकरिता इंडियन असोसिएशन स्थापन करून सिव्हिल सर्व्हिसमध्ये हिंदी लोकांचा शिरकाव होण्याबद्दल त्यांनी चळवळ करण्यास व्याख्यानाचे दौरे काढले. दुस-या काँग्रेसपासून सन १९१७ च्या कलकत्त्याच्या काँग्रेसपर्यंत सुरेंद्रनाथ नियमाने प्रत्येक कॉंग्रेसला हजर रहात.
१८७५ ते १९१३ पर्येत ३८ वर्षे त्यानी शिक्षकाचे काम केले. विद्यार्थ्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा व योग्य मर्यादेत राजकारणांत भाग घ्यावा असेहि त्यांचे ठाम मत असल्यानें शिक्षणाबरोबरच देशभक्तीचे व राजकीय तत्वज्ञानाचे धडे ते विद्यार्थ्यांस देत असत. १८७९ साली त्यांनी बंगाली' पत्र विकत घेतले व तेव्हापासून १९१९ सालपर्यंत ते बंगालीचे संपादक होते. १८७६ ते ९९ पर्यंत ते कलकत्ता कॉर्पोरेशनचे सभासद होते व १८९३ मध्ये कौन्सिलांत लोकनियुक्त प्रतिनिधी पाठविण्याचे हक्क मिऴाल्यावर ते या कॉर्पोरेशनतर्फेच बंगालकायदेकौन्सिलांत निवडून आले. १८९३ ते १९०१ पर्यंत ते बंगासकायदेकौन्सिलचे सभासद होते. १९०५ साली बंगालच्या फाळणीनंतर ती रद्द होईपर्यंत कौन्सिलांत जावयाचे नाही हा मर्यादित असहकारितेचा निश्चय यानी कायम राखला. १९११ त वंगभंग रद्द झाल्यावर २ वर्षांनी झालेल्या निवडणुकीस वरिष्ठ कायदेकौन्सिलासाठी ते उभे राहिले व निवडून आले. १९२६ सालपर्यंत ते या कायदेकौन्सिलचे सभासद होते. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अमंलात आल्यावर ते बंगाल कौन्सिलचे सभासद होऊन स्थानिक स्वराज्यमंत्री नेमले गेले व त्यांनी कलकत्त्याच्या कॉपोरेशनची संकुचित घटना बदलून तिला व्यापक व लोकसत्ताक स्वरूप दिले.
१८९० साली ह्यूम, फेरोजशहा मेथा, मुधोळकर वगैरेच्या काँग्रसने पाठविलेल्या डेप्युटेशनबरोबर, १८९७ साली गोखले मुधोळकरांबरोबर वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी, १९०९ साली साम्राज्यांतील वृत्तपत्रांच्या परिषदेसाठी व १९१९ साली प्रागतिकाच्या डेप्युटेशनबरोबर असे चार वेळा ते इंग्लडांत गेले व चारहि वेळा त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी त्यांनी उत्तम प्रकारे बजाविली. १९१८ साली प्रागतिकांनी काँग्रेस सोडून भरविलेल्या पहिल्या फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या आयुष्यांतील विस्तृत आठवणीचे एक पुस्तक प्रसिध्द केले आहे. १८७५ सालापासून तो १९२५ पर्यंत ५० वर्षे शिक्षक, वृत्तपत्रकार, वक्ते, कौन्सिलर आणि कॉर्पोरेटर इत्यादी अनेक अधिष्ठानांवरून अव्याहत व निरलसपणे सुरेंद्रानी राष्ट्राची अनेकांगी सेवा केली आहे.