विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांडा, जिल्हा - संयुक्तप्रांतात अलाहाबाद विभागांतील जिल्हा. क्षे.फ. ३०६० चौ.मैल. दक्षिण व पश्चिमेकडील विंध्य पर्वतापासून उत्तरेस यमुना नदीच्या खो-यापर्यंत हा जिल्हा उतरता होत गेला आहे. या जिल्ह्यांतून यमुना, केन, बाघेन आणि पैशुनी या नद्या वाहतात. नैर्ॠत्येकडील टेंकडयांवर संरक्षित जंगले आहेत व जिल्ह्याच्या इतर भागांत पुष्कळ झाडे आहेत. संरक्षित जंगलात, वाघ, चित्ते, कोल्हे, अस्वल वगैरे श्वापदे आहेत. हवा रोगट आहे. वार्षिक पावसाचे मान सरासरी ४० इंच आहे.
या जिल्ह्याचा इतिहास म्हणजेच बुंदेलखंडाचा इतिहास होय. या जिल्ह्यांतील महत्त्वाचे अवशेष कालिंजरच्या किल्ल्यांत आहेत; कालिंजर गांवात थोडयाशा मुसुलमानी इमारती आहेत. मराठयांनी आपली स्मृतिचिन्हे बांडा व कारवी येथे ठेविली आहेत. १९२१ साली या जिल्ह्याची लोकसंख्या ६१३११४ होती. शेकंडा ९४ हिंदु व बाकीचे बहुतेक मुसुलमान आहेत. येथे पूर्वहिंदी भाषा चालते. शेकडा ७० लोक शेतकीवर आपले पोट भरतात. या जिल्ह्यातील मार नावाची काळी जमीन कसदार व सुपीक असून ती नांगरण्यास फार हलकी असते. उद्योगधंदे फार थोडे असून महत्त्वाचे नाहीत. हरभरा, ज्वारी, गहूं वगैरे जिन्नस बाहेर रवाना होतात व तांदूळ, साखर, तंबाखू आणि धातूचे जिन्नस बाहेरून येतात. बांडा, कारवी आणि राजापूर ही व्यापाराची मोठी ठाणी आहेत. एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा ३ लोकांना लिहितावाचता येते.
गां व - बांडा जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे केन नदीजवळ असून ग्रेट इंडियन रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या (१९११) २१३६१. एकोणिसाव्या शतकांत नबाब समशेरबहादुर येथे येऊन राहीपर्यंत हे केवळ खेडे होते पण हे जिल्ह्याचे ठाणे झाल्यामुळे व येथे कापसाचा बराच मोठा व्यापार चालत असल्यामुळे याचे महत्त्व वाढले. येथील नबाब बंडाच्या वेळी इंग्रजांच्या विरुध्द असल्यामुळे १८५८ साली त्याला गादीवरून दूर करण्यांत आले. शिवाय राजापूर व कारवी ही गांवे व्यापाराच्या द्दष्टीने बरीच पुढे सरसावली; त्यामुळे हल्ली हे गावं खालावले आहे हे गांव अगदी अव्यवस्थित रीतीने बसलेले आहे. येथे पुष्कळ देवालये व मशिदी आहेत. येथून जवळच एक मैलावर भुरागड नांवाच्या किल्ल्याचे अवशेष आहेत. येथे गोमेद रत्नाच्या वस्तू व हातांत घेण्याच्या काठया होतात.