विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाजीराव बल्लाळ पेशवे - पेशवे घराण्यांतील हे दुसरे पेशवे, बाळाजी विश्वनाथाचे वडील चिरंजीव असून यांचे दुसरे नाव विसाजी असे होते. यांच्या जन्माचा शक निश्चित नाही. (इ.स. १६८६, १६९५, १६९८, १७०१ वगैरे निरनिराळी वर्षे तज्ज्ञ धरतात). यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. दमाजी थोराताने बाळाजीपंतास अडकवून ठेविले त्यावेळी बाजीरावहि त्यांच्याबरोबर होते (१७१३). लहानपणापासून बाळाजीपंताबरोबर बाजीराव असत, त्यामुळे राज्यकारभार, मुत्सद्दीगिरी व युध्दकला यांचे ज्ञान त्यांना झाले. एकंदर आयुष्यांत त्यांना विश्रांती मिळाली नाही. घोडयावर बसण्यांत व संकटाची पर्वा न करण्यांत ते तरबेज होते. सय्यदाच्या मदतीस बाळाजीपंत दिल्लीस गेले, तेव्हा (१७१८-१९) बाजीराव बरोबर होते. तेथून परत आल्यावर खानदेशांत सय्यदांच्या मदतीस त्यांची रवानगी झाली. दहा बारा वर्षे त्यांची हुषारी शाहुजराजांनी पाहिल्यामुळे बाळाजीपंत वारल्यावर १५ दिवसांनी बाजीराव यांना मसून येथे पेशवाईची वस्त्रे दिली. (ता.१७ एप्रिल १७२०). ती मिळाल्याबरोबर पेशवे हे ताबडतोब दिल्लीच्या कारस्थानासाठी खानदेशांत निघाले. यांना पेशवाई मिळू नये अशी जुन्या मंडळींची खटपट शाहूने चालू दिली नाही. शाहूच्या या निवडणुकीनेच मराठी राज्याचा ताबडतोब भाग्योदय झाला.
पेशव्यांनी खानदेश, औरंगाबाद, बागलाण वगैरे प्रांतांतून मोकासा वसून करून अशीरगड घेतला. पेशवे स्वारीशिकारीवर असतांना साता-यास चिमाजीआप्पा, नानासाहेब व पुरंदरे हे त्यांचे वकील म्हणून रहात व त्यांच्यामार्फत पेशवे आणि छत्रपति यांच्या सल्लामसलती चालत. शिवाय दरवर्षी पेशव्यांस साता-यास जावे लागे. पेशव्यांच्या विरुध्द फत्तेसिंग भोसले, प्रतिनिधी व रघुजी भोसले वगैरे मंडळी सतत २० वर्षें शाहूजवळ कागाळया चालवीत, त्यामुळे पेशव्यांस फार त्रास होई परंतु तो त्यांतून स्वतःच्या पराक्रमामुळेच बाहेर पडे. बाजीरावाची इच्छा मोंगल पातशाही पालथी घालावी, परंतु शाहू त्यास कबूल नसे, त्यामुळे पेशव्याच्या पराक्रमाचे व्हावे तसे चीज झाले नाही. फत्तेसिंग वगैरे मंडळीचे न ऐकता शाहूने १७२८ पासून महत्त्वाची उलाढाल पेशव्यांच्या संमतीवाचून करावयाची नाही असे ठरविले. पेशव्यांच्या प्रत्येक उलाढालींत व राजकीय हालचालींत शिवाजीने स्थापिलेल्या हिंदूपदपादशाहीचा प्रसार सर्व हिंदुस्थानांत करावा ही मूलभूत भावना स्पष्ट होती, परंतु अनेक अडचणींमुळे त्यांची इच्छा शेवटास गेली नाही. व-हाड, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली वगैरे उत्तरेकडील प्रांतांत शिंदे, होळकर, बुंदेले, पवार, गायकवाड, हिंगणे, कोल्हटकर वगैरे अनेक ब्राह्मण व मराठे सरदारांनी आपले जे वर्चस्व स्थापिले त्यांस मूळ उत्तेजन बाजीरावापासूनच मिळाले. बाजीरावाचेच अनुकरण पुढे नानासाहेब, भाऊसाहेब व थोरले माधवराव यांनी केले. सारांश, शिवाजीच्या मागे त्याचा कित्ता गिरविणारा असा बाजीराव होऊन गेला.
पेशव्यांच्या कारकीर्दीचे पहिला ११ वर्षांचा व दुसरा ९ वर्षांचा असे दोन खंड पडतात. बाळाजी विश्वनाथाने आरंभलेला उद्योग (स्वराज्यविस्ताराचा) त्याने पुढे चालविला, परंतु वर सांगितल्याप्रमाणे त्याला त्यांत दरबारी मंडळीचा व खुद्द शाहूचाहि अडथळा होऊं लागला. सय्यदाचा करार निजाम पुरा करीना व मराठयांचा घरांत फितूर घालूं लागला. त्यामुळे प्रथम निजामाची खोड मोडणे पेशव्यांस भाग होते, या कामी त्यांची ११ वर्षे गेली व त्यांत त्यांनी आपली कर्तबगारी दाखवून शाहूचा संपूर्ण विश्वास संपादन केला (१७३१). निजामाबरोबरच कोल्हापूरकर संभाजी, चंद्रसेन जाधव, त्रिंबकराव दाभाडे यांचाहि बंदोबस्त केला. यानंतर पुढील ९ वर्षांत चौथाई व सरदेशमुखीच्या नांवाखाली माळवा व गुजराथ हाताखाली घातला. नादीरशहाची स्वारी व स्वतःचे अल्पायुष्य ह्या दोन गोष्टी नसत्या तर दिल्लीस मराठी तख्त स्थापन झाले असते. पहिल्या कालखंडांत स्वकीय विरोधकांचे कावे, छत्रपतीच्या मनाची धरसोड व निजामाच्या लटपटी यांमुळे पेशव्यांचे हातपाय जखडले गेले होते. ते त्यानी कुशलतेने सोडवून पुढील कालखंडांत आपले खरे धाडस व शौर्य दाखविले आहे.
निजाम बाळापूरच्या लढाईंत जय पावल्याने दक्षिणेत सुभेदार होऊन आला (१७२० आगष्ट), परंतु सय्यदांनां मदत करावयाची ठरल्यामुळे पेशव्यानी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला (आक्टोबर) व नंतर शाहूच्या सल्ल्याने त्यानी सावडर्यास निजामाची भेट घेतली. सय्यदांच्या पाडावाने मराठयांचे हेतू बरेचसे ढांसळले, या वेळीच प्रतिनिधी व पेशवे यांचा कडाक्याचा वाद भरदरबारांत झाला. पेशवे वयाने लहान आणि अननुभवी व प्रतिनिधी मोठा असून त्याच्यावर शाहूची मर्जी जास्त होती. शेवटी पेशव्यांचे म्हणणे शाहूस पटले. सावडर्याच्या भेटीत निजाम व पेशवे यांचे विशेष जमले नाही म्हणून पेशव्यानी त्याच्या मुलुखांत उपद्रव सुरू केला. पेशवे इतके प्रबळ व शूर असतील अशी निजामाची कल्पना नव्हती. भडभुंजा मोंगल, करीमबेग वगैरे मंडळींचा पेशव्यांनी याच वेळी पराभव केलेला आहे. (१७२०-२१), यापुढे ब-हाणपूरच्या सुभेदाराचा, माळव्यांतून आलेल्या दाऊदखानाचाहि त्यानी मोड केला, या लढायांतच मल्हारबा होळकर व राणोजी शिंदे पुढे आले.
साखरखेडल्याच्या लढाईमुळे निजामुल्मुल्क याने औरंगाबादेस स्वतंत्र राज्यस्थापना करून मराठयांच्या उरावर एक कायमची धोंड ठेवून दिली (१७२४). या तीन सालांत (१७२१-२४) पेशव्यांनी पवार, शिंदे व होळकरांच्या करवी माळवा,बागलाण खानदेश हे प्रांत थोडथोडे हस्तगत केले. माळव्यावर तर त्यांच्या तीन स्वा-या झाल्या होत्या. या कामी दिल्लीच्या बादशहाची (निजामाविरुध्द) मराठयांना फूस होती. याच सुमारास पेशव्यानीं त्यांच्या वडिलांनी घालून दिलेली राज्याची (वसुलाची व फौजेची) व्यवस्था कडकपणे अमलांत आणण्याचा प्रयत्न केला. मोहीम ठरविणे व हुकूम देणे ते शाहूने, त्यासाठी कामावर जाणारी फौज निरनिराळया सरदारांच्या हाताखाली व तिचा खर्च भागवावयाचा मुलुखगिरीवर, अशी ही बहुमुखी पध्दत पेशव्यांना जाचक होती. ती पेशव्यांनी मोडून काढली व बचावाची पध्दत सोडून मुसुलमानांशी चढाईचे धोरण स्वीकारले. यामुळे माळव्यांत त्यांनां आपल्या कार्यक्रमाची जागा करावी लागली. पवार, शिंदे, होळकर यांनां माळव्यांत कायमचे नेमून त्यांच्या खर्चास अर्धी मोकासबाब लावून दिली. या वेळी मोंगली पातशाही दुर्बळ असल्याने एकदम चढाई करून तेथे शिवाजीच्या अवशिष्ट राहिलेल्या इच्छेप्रमाणे हिंदुपतपादशाही स्थापन करावी, असल्या प्रकारचा स्फूर्तिदायक बाहेरचा प्रयत्न केल्यास घरची भांडणे आपोआप मिटतील असे पेशव्यांचे म्हणणे होते, तर प्रतिनिधी वगैरे दुस-या पक्षाचे म्हणणे प्रथम घरचे भांडण मिटवावे व मग या कामी हात घालावा. परंतु अखेर पेशव्यांचे म्हणणे शाहूने कबूल केले. डफ म्हणतो की, हा पोकळ वाद नसून कृतीची वेळ होती व त्याप्रमाणे बाजीरावास विचार करणारे डोके व कृति करणारे हात होते. वडिलांजवळ युध्दकला व मुत्सद्दिगिरी या दोन्ही कला तो शिकला होता. रा. राजवाडे म्हणतात की, बाजीराव ही व्यक्ति स्वतंत्र विचारांची व स्वतंत्र आचाराची होती. या वेळी उदाजी पवार, कंठाजी बांडे व पिलाजी गायकवाड यांनी उत्तरेकडे बरीच प्रगति केली होती.
कर्नाटकांत फत्तेसिंग व प्रतिनिधी यांनां शाहूने पाठवून थकलेल्या खंडण्या वगैरे वसूल करविल्या. या मोहिमेत बाजीराव होते, परंतु ते फत्तेसिंगच्या हाताखाली होते. या स्वारीत फत्तेसिंग व प्रतिनिधी यांची नालायकी शाहूस स्पष्ट दिसून आली (१७२५-२६). परंतु यापुढे विरोधी पक्षाच्या त्रासाने पेशव्यानी कर्नाटकांत लक्ष न घालतां उत्तरेकडे घातल्याने निजामाला त्या प्रांतांत पाय पसरण्यास व मराठयांच्या विरुध्द फ्रेंच-इंग्रजांशी मसलती चालविण्यास संधि मिळाली. निजामाने या दोन सालांत (१७२५-२७) चंद्रसेन जाधव, शिद्दी वगैरे मंडळींच्या मदतीने मराठी मुलुखांत धुमाकूळ उडविला, पाटसपर्यंतची ठाणी त्यांनी घेतली. याच सुमारास निजामाने प्रतिनिधीस जहागीर (एक प्रकारची लांच) देऊन आपल्याकडील चौथाईबद्दल कांही प्रांत तोडून देण्याचे त्याच्या तर्फे शाहूकडून कबूल करविले. या तहाबद्दल पेशव्यांना राग आला, कारण तो तह मराठयांच्या उद्योगास विघातक होता. याचा प्रत्यय लागलीच शाहूस आला. निजामाने कोल्हापूरकर संभाजीस शाहूविरुध्द उठवून, तुम्ही आपसांतील तंटा तोडा, मग ख-या मालकास चौथाई देईन असे त्याने शाहूस कळविले. तेव्हां प्रतिनिधीच्या नाकर्तेपणाची खात्री होऊन शाहूने पेशव्यांना निजामावर पाठविले. निजामाकडे शाहूचे फितुरी सरदार व संभाजी हे हजर होते. पेशव्यांनी यावेळी गनिमी काव्यानें लढून अखेर निजामाचा पालखेडास पराभव केला, या वेळच्या पेशव्यांच्या हालचाली व शत्रूस दाखविलेली हूल मोठी आश्चर्यकारक आहे. पिण्यास पाण्याची टंचाई झाल्याने निजामाने मराठयांनां बिनतक्रार चौथाई व त्याच्या खात्रीसाठी बरीचशी लष्करी ठाणी देण्याचा तह केला (१७२८). यावेळी पेशवे व निजाम यांची भेट झाली. निजाम हा औरंगझेबाच्या हाताखाली लढाईचे शिक्षण घेतलेला सेनापति, त्यासहि पेशव्यांनी पराभूत केल्याने त्यांचा लौकिक वाढला. पुढे पेशव्यांनी उदाजी चव्हाणाचा (हा संभाजीतर्फे शाहूच्या राज्यांत बंडाळी करी) बंदोबस्त केला.
बाजीराव हे स्वतः सेनापति होऊन लढाया करू लागल्याने मराठी राज्याचे सेनापति दाभाडे यांचे तेज कमी होत चालले. गुजराथेंत चौथाईवसूलीचे काम प्रथम दाभाडयाचे होते हे पेशव्यांनी आपल्याकडे घेतल्याने त्रिंबकराव दाभाडे नाराज झाला, व तो संभाजी आणि निजामास मिळाला. निजामाने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. हे पेशव्यांचे वितुष्ट शाहूला मोडतां आले नाही. दाभाडे निजामास फितूर झाल्याने त्याचे पारिपत्य करणे भाग पडले. दाभाडे पेशव्यांवर प्रत्यक्ष चालून आला. त्याल बांडे, पवार, संभाजीराजे वगैरे मिळाले. पेशव्यांजवळ दाभाड्याच्या निम्म्याहूनहि कमी फौज होती. पेशव्यांनींहि दाभाडयाची शेवटपर्यंत समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ते साधले नाही. अखेर बडोद्याजवळ डभईस दोघांत युध्द होऊन दाभाडे ठार झाला (१७३१ एप्रिल). मात्र पेशव्यांनी दाभाडयास सामील झालेल्या मराठी सरदारांनां युक्तीने पुन्हां आपल्याकडे वळवून घेतले, त्रिंबकरावाच्या मुलास सेनापति करवून त्याने चालविलेली श्रावणमास दक्षिणा आपल्याकडे घेऊन चालविली. सेनापतीचे शासन पेशव्यांनी केल्याबद्दल त्यांनां कोणी दोष दिला नाही. खुद्द शाहूनेहि झाले हे बरे झाले असे म्हटले, मात्र शाहूने गुजराथच्या व माळव्याच्या हद्दी आणि ऐवजाची वाटणी पेशवे आणि दाभाडे यांच्यांत ठरवून दिली. मात्र सेनापतीला पेशव्यांच्या आज्ञेत ठेविले.
यानंतर पेशव्यांनी निजामाची खोड मोडण्याचे ठरविले, परंतु त्या धूर्ताने त्यांचा राग घालवून त्यांना माळव्यांत स्वारी करण्यास उत्तेजन दिले. पावसाळा लागल्यावर पेशवे साता-यास आले व त्यांनी आपला कांही काळ राज्यव्यवस्थेत घालविला (१७३१-३२).
यानंतर जंजि-याच्या शिद्दयाच्या घरांत गृहकलह लागला, त्याचा फायदा घेऊन शाहूने पेशवे व इतर सरदार यांनां जंजि-यावर पाठविले (मे व आगस्ट १७३३). पेशव्यानी तळे, घोसाळे, बिरवाडी, अवचितगड, निजामपूर वगैरे पुष्कळ ठिकाणे घेतली. आग्र्यांनीहि आरमाराने शिद्दीची ठाणी काबीज केली. प्रतिनिधीने रायगड घेतला. या मोहिमेमुऴे मुंबईच्या इंग्रजांनां धास्ती पडली. त्यांनी हबशांस मदतहि केली. परंतु पुढे पेशवे-प्रतिनिधी यांच्या चुरशीने लढाई थंडावली. लढाईत पेशवे, आंग्रे व प्रतिनिधी हे स्वतंत्र वागत, त्यामुळे जंजिरा घेण्याची आलेली संधि फुकट गेली. यांनतर पेशवे या शिद्दी-प्रकरणांत स.१७३५ पर्यंत कोकणांतच होते. पुढल्या वर्षी ते माळव्यांत गेले व ते तिकडेच वर्षभर (१७३७) होते.
मध्यंतरी आंग्रे (संभाजी व मानाजी) बंधूंत भांडाभांडी सुरू झाली, ती पेशव्यांनी साधारण मिटवली. त्यामुळे संभाजी हा पेशव्यांच्या विरुध्दपक्षास मिळाला. पेशवे वरील गृहकलहांत भर घालीत होते, पण त्यामुळे मराठयांचे आरमारी बळ कमी दर्जाचे होऊन इंग्रज प्रबळ झाले. आंग्र्यांचा डोईजडपणा पेशव्यांना नडे त्यामुळे त्यांनां दुर्बळ करण्याचा प्रयत्न नानासाहेबांपर्यंतच्या पेशव्यांनी केला. मात्र त्यामुळे परकीय लोक घरांत शिरले, त्यांचा बंदोबस्त त्यांना करतां आला नाही.
यांनतर वसईची मोहीम झाली, तीस कारण धार्मिक छळ होय. या कामी मालाडचा देसाई अंताजी याने पेशव्यांनां फार मदत केली. चिमाणाजीआप्पास या कामी मुख्य नेमले होते. ही मोहीम स.१७३७ त सुरू होऊन १७३९ च्या जूनमध्ये संपली. या सुमारास इंग्रजांनी शाहू व पेशवे यांच्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण तो फुकट गेला व गॉर्डनने स्वच्छ सांगितले की शाहूवर पेशव्यांचा दाब विशेष आहे.
पेशव्यांनी माळवा व बुंदेलखंडांत कसा उद्योग आरंभला ते वर थोडे आलेच आहे. पेशवे प्रथम १७२२-२४ त २-३ वेळ तिकडे गेले होते, माळव्याचा मोंगली नायब सुभेदार राजा गिरिधर हा होता. आणि त्याच्यावर सवाई जयसिंग हा सुभेदार होता, परंतु गिरिधर हा जयसिंगाच्या विरुध्द वागे म्हणून जयसिंगाने नंदलाल मंडलोई याच्या मार्फत मराठयांनां माळव्यांत आणले. चिमणाजीआप्पाने सारंगपूरच्या लढाईत दयाबहाद्दरास ठार केले (१७२८) व माळवा प्रात हस्तगत केला. त्यानंतर खुद्द पेशव्यांनी तेथे जाऊन तेथल्या वसुलाची व कारभाराची व्यवस्था लाविली. (सरकार ३१, शिंदे ३०, होळकर ३० व पवार ९). याच सुमारास (१७२९ फेब्रुवारी) पेशवे छत्रसालच्या मदतीस गेले व त्यानी महंमद बंगषचा पराभव केला. त्याबद्दल छत्रसालाने झाशी प्रांत (२॥ लक्षांचा) पेशव्यांस दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साहि त्यांस दिला (१७३३). यावेळी मराठे व माळवा, बुंदेलखंड, रजपुताना येथील रजपूत एक होऊन धर्माच्या नांवाने त्यांनी मुसुलमानांविरुध्द हत्यार उचलले होते. यावेळी पुन्हा पेशव्यांनी हिंदुपदपातशाही स्थापण्याच्या कल्पनेला उचलून धरले होते, यावेळी जर शाहूने व इतर मराठे सरदारांनी योग्य पाठबळ दिले असते तर पेशव्यांनी दिल्ली सहज काबीज केली असती. पंरतु ती संधि सातारा राजधानींतील अनास्थेमुऴे सर्वस्वी फुकट गेली व पुढे मराठयांविरुध्द मोठे कारस्थान उभारले गेले. पुढे मराठयांना उत्तरेंत स्वा-या करतांना या बुंदेलखंडातील प्रांताची व बुंदेले रजपुतांची फार मदत झाली. एकदा (१७३७) सादतखान, महंमद बंगष वगैरे सरदारांनी पुष्कळ फौज घेऊन पेशव्यांवर स्वारी केली, पण तींत त्यांच्याच पराभव झाला.
छत्रसालचे प्रकरण संपल्यावर पेशवे दक्षिणेंत शिद्दीच्या स्वारीसाठी परत आले. जयसिंगाने मराठयांनां माळव्याची सुभेदारी देण्याची फार खटपट केली व ती शेवटी बादशहाने कबूल केली (१७३४) परंतु लगेच बादशहाने व इतर मुसुलमान सरदारांनी होळकरावर एक सैन्य पाठविले (१७३५), यावेळी पेशवे यांना पैशाची फार अडचण पडली होती. त्यानां नेहमीच कर्ज होई, त्याबद्दलची त्यांची पत्रे त्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी यांना लिहिलेली वाचण्यासारखी आहेत. खुद्द ब्रह्मेद्रं स्वामीहि आपल्या कर्जाचा पेशव्यांना तगादा लावीत. पेशव्यांच्या १७३४-३६ या सालांतील हालचाली समजत नाहीत. वास्तविक पेशव्यांचे सरदार कोटयावधि रुपये लूट मिळवीत. कांहींनी तर आपल्या घोडयांना सोन्याचे नाल बसविले होते. परंतु त्यांच्या धन्याला मात्र २० लाख कर्जासाठी वीष 'खाऊन मरावे' असें म्हणण्याचा प्रसंग येई.
कर्जासाठी पेशव्यानी दिल्लीच्या बादशहाकडे चौथसर देशमुखीचा लकडा लावला, परंतु दिल्लीदरबार ते कबूल करीना व उलट निजामास मिळून त्याने मराठयांविरुध्द जंगी चढाई केली. या स्वारीत उत्तरेकडील सर्व मुसुलमान सुभेदार, नबाब वगैरे हजर होते (१७३६). ही मोहीम १७३८ पर्यंत चालली व तींत शेवटी पेशव्यांनी आठरे येथे बादशहाचा पराभव करून स्वारीखर्च १३ लाख व माळवा प्रांत संपादन केला. आणि दिल्लीची पातशाही हाताखाली घातली. हाच उपक्रम पुढील पेशव्यांनीहि चालविला. नंतर पेशवे परत फिरल्यावर त्यांच्यावर निजाम चालून आला. त्या दोघांची लढाई भोपाळजवळ होऊन तींत पराभव झाल्याने निजाम शरण आला. त्यामुळे नर्मदा-चंबळा दुआब मराठयांनां मिळाला. नंतर पेशवे पुण्यास परतले. (१७३८ जुलै).
यानंतर नादीरशहाने दिल्लीवर स्वारी केली. त्याला निजामानेंच बोलावून आणले होते. मराठयांची इच्छा बादशहास मदत करण्याची होती व त्याप्रमाणे वसई जवळ जवळ फत्ते झाल्यावर पेशवे उत्तरेस निघाले, पण नादीरशहा अगोदरच निघून गेला होता. बादशहाने पेशव्यांस पूर्वीचे करार कबूल केल्यावरून ते परत साता-यास आले (१७३९ जुलै). याहि वेळी मोंगल पातशाहीविरुध्द सर्व रजपूत व मराठे एक झाले होते, परंतु शाहूकडून चांगलेसे पाठबळ न मिळाल्याने हे कारस्थान फुकट गेले. मात्र पेशव्यानी उत्तरेकडील आपल्या नवीन मुलुखांत आपला अंमल कायम केला.
इकडे निजामा (नासीरजंग) ने ठरलेली जहागीर देण्याची टाळाटाळ चालविल्याने पेशव्यानी त्याच्यावर मोर्चा फिरविला (१७३९, डिंसेबर) व त्याचा औरंगाबादेजवळ पराभव करून, पूर्वीची व आणीक नवीन जहागीर मिळविली होती. (१७४०, फेब्रुवारी) त्यानंतर पेशवे उत्तरेकडे वळले. तिकडे जात असतां नर्मदाकाठी खरगोण जिल्ह्यांतील रावेरखेडी येथे ताप येऊन (व तापांतच नर्मदेत पोहल्यामुळे) बाजीराव याचा अंत झाला (२५ एप्रिल १७४०).
बाजीराव यांना ४ पुत्र होते, पैकी पुढे दोन जिवंत राहिले. त्यांची पत्नि काशीबाई या १७५८ त वारल्या. बाजीराव हे तापट तर चिमाजीआप्पा शांत होता. त्यामुळे या दोघांच्या एकीमुळे कोणत्याहि कार्याचा सहसा बिघाड होत नसे. आप्पावर पेशव्यांची फार भिस्त असे व तोहि तसाच शूर व मुत्सद्दी होता. प्रत्यक्ष शाहू व पेशव्यांची कुटुंबातील मंडळी आप्पाच्याच मार्फत पेशव्यांकडून कामे करून घेत. कौटुंबिक सर्व कार्यप्रसंग आप्पाच पहात. काशीबाई शांत व गरीब असल्यानेंच पेशव्यांवर मस्तानीचा पगडा बसला असावा. शिवाय पेशव्यांचा स्वभाव उद्दाम व शिपाईबाण्याचा असे, मनमिळाऊ नव्हता. मस्तानीशी जास्त संघटन झाल्याने राज्यकारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष्य होऊं लागले, त्यामुळे नानासाहेब व कुटुंबांतील मंडळींनी त्याचा बंदोबस्त चालविला. बापलेंकांचे या बाबतीत पटत नसे. मस्तानीची पहिली खरी हकीकत आढळत नाही. छत्रसालाकडून ती पेशव्यांना मिळाली असे म्हणतात. ती फार सुंदर असल्याने पेशवे तिच्या नादी लागले. तिच्यासाठी त्यानी शनिवारवाडयांत मस्तांनीमहाल बांधला. तिचे गायननर्तन गणपतिउत्सवांत होई. ती बहुधां पेशव्यांच्या दरेक स्वारीबरोबर असे. यासाठी शाहुराजे यांनीहि त्यांची पुष्कळ निर्भर्त्सना केली. पण उलट पेशव्यांचा नाद जास्त वाढला, त्यामुळे आप्पा, नाना, व राधाबाई यांनी मसलती करून एकदां त्यांचा फार निषेध केल्याने ते रुसून पाटसास गेले. इकडे आप्पांनी मस्तानीस नजरकैदेत ठेविले, परंतु ती तेथून पळून पाटसास गेली. तेव्हां पेशव्यानीच तिला पुण्यास परत पाठविली (१७३९). अखेर पेशवे नासीरजंगावरील स्वारीत असता नानांनी तिला पुन्हा कैद केले (१७४० जाने). तिला बाजीरावापासून समशेरबहाद्दर नावांचा मुलगा झाला. त्याच्या मुंजीचा हट्ट पेशव्यानी केल्याची एक गोष्ट आढळते. बाजीराव वारल्यावर मस्तानी सती गेली असे म्हणतात. तिला पाबळ, केंदूर वगैरे गांवे जहागीर होती. समशेरबहाद्दरचा वंश हल्ली बांदे येथील नबाब म्हणून प्रख्यात आहेत. बाजीरावानी पुण्यात शनिवारवाडा बांधण्यास प्रारंभ करून (जानेवारी १७३०) एक वर्षांत (१७३१) तो पूरा केला, त्यास १६११० रुपये खर्च आला. (पेशवाईचा बखर, शाहूचे चरित्र व रोजनिशी, राजवाडे खंड १, २, ३, ४, ६, का. इ. सं.पत्रे यादी, शकावली, भा.इ.मं. इतिवृत्त १८३७, फॉरेस्ट, ब्रह्येंद्रचरित्रः भारतवर्ष-शकावली, इ.सं.ऐ.टि.भा.२)