विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाजी प्रभू देशपांडे - बाजीचा बाप पिलाजी हा हिरडस मावळचा देशकुलकर्णी व कृष्णाजी नाईक बांदल हा देशमुख होता. या दोघांनीं मावळांत जबरदस्ती करून इतर देशमुखांकडून दाइते घेतले. बाजी हा कृष्णाजीचा अगदी जिवलग मित्र होता व दोन्हीहि घराण्याचे एकमेकांशी अगदी जिव्हाळयाचे संबंध होते. बाजी हा नावाजलेला वीर व दांडपट्टा वगैरेंत निष्णात होता. इ.स.१६३५ तील आदिल-मोंगल तहाने मावळप्रांत आदिलशहाकडे गेला तेव्हा कृष्णाजीने दिवाणाशी उघडपणे पुंडावा मांडला. तेव्हा पिलाजी व कृष्णाजी यांचे वांकडे आले व पिलाजीने दिवाणाची बाजू घेतली. आदिलशाही सभेदार व बांदल यांच्या नेहमी झटापटी होऊ लागल्या व शेवटी दादाजी कोंडदेवालाच इ.स.१६४३ च्या सुमारास कृष्णाजीशी लढाई देणे भाग पडले. या लढाईंत दादाजीचा पुरा मोड झाला व दादाजीकडील बाजीचा बाप एिलाजी व भाऊ अंताजी ठार झाले व खास बाजीस ४६ जखमा झाल्या. परंतु दादाजीने बांदलास लवकरच युक्तीने 'चौरंग' केले व देशमुखी वतन अमानत केले. कृष्णाजीमागे त्याची बायको दीपाई हिने देशपांडे घराण्याचा पूर्वांपार घरोबा विशेषतः बाजीचा भाऊपणा जाणून आपला सर्व कारभार बाजीकडेच सोपविला. परंतु इनामती जप्त झाल्याने खर्चवेच भागेना. बाजीने नेहमी दिवाणांत जाऊन बोलणे करावे परंतु त्याचा उपयोग होईना. दादाजीच्या मृत्यूनंतर लगेच बाजीने खास शिवाजीची भेट घेतली व शिवाजीनेहि आपल्या नूतन आरंभलेल्या कार्यास या पुंड देशमुखाची सेना उपयोगांत आणण्याचे मानस धरून इनामतीची मोईन करून देऊन बाजीस व त्याच्या हाताखालील बांदलाच्या १०,००० सैन्यास मिळवून घेऊन आपल्या तैनातीस खास फौज म्हणून ठेविले. इ.स. १६४८ व ४९ त ही सेना शिवाजीबरोबर राहून तिने पुरंदर, कोंडाणा व राजापूर वगैरे किल्ले घेण्यांत मदत केली. परंतु शहाजीच्या मुक्ततेसाठी नंतरच्या ५-६ वर्षांत या सैन्याला स्वस्थ बसावे लागले. या अवधींत बाजीने रोहिडा किल्ला मजबूत केला व जवळपासच्या किल्ल्यांवरहि संधान बांधून ठेविले. कृष्णाजीनंतर बाजी हाच मावळांत जबरदस्त कर्ता माणून समजला गेला व त्या प्रांतांत त्याचे चांगलेच वजन वाढले. इ.स.१६५५ तील जावळीवरील मोहिमेंत व नंतरच्या दीड दोन वर्षांत मावळांतील किल्ले घेण्यांत व डागडुजी करण्यांत बाजीने खस्त मेहनत केली. शिवाजीला राज्यसंस्थापनेंत जेधे व बांदल 'हनुमंत-अंगदाप्रमाणे' मदत करीत होते. इ.स. १६५९ च्या नोव्हेंबरच्या १० व्या तारखेस अफजलखानचा वध झाल्यानंतर पारच्या रानांतील आदिलशाही छावणीचा सफाईने धुव्वा उडविण्याचे कामहि आपल्या बांदलाच्या लोकांनिशी फारच बहारीने केले व नंतर विजापुरापर्यंत शिवाजीला पल्ला गांठण्यास त्याने जिवापाड मेहनत घेतली व बांदलाशी केलेले इनाम कायम ठेवून बांदलाचेच नावं मराठयांच्या इतिहासांत अजरामर केले. इ.स. १६६० त मोंगल, आदिल, शिद्दी, सांवत वगैरेनी शिवाजीला चोहोबाजूंनी कोंडून टाकण्याचा व त्याचे महाराष्ट्रांतून उच्चाटन करण्याचा बेत केला व त्याच्यावर सर्व बाजूनी चढ केली. शिवाजीनेहि बंदोबस्त केला, व आपण पन्हाळयास विजापूरकरांचे सैन्य लढवूं लागला. परंतु मोंगल, शिद्दी व सावंत यांचा सारखा जय होत गेल्याने मराठी सैन्याचा धीर सुटत चालला व शिवाजीला पन्हाळा सोडून खाशाच मदतीस जाणे अगदी निकडीचे झाले. परंतु पन्हाळयाच्या वेढयांतून पार पडणे म्हणजे नशिबाची परीक्षाच होती. शिवाजीची पन्हाळयाहून निर्वेध मुक्तता ही हिंदुस्थानच्या इतिहासांतील अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती. त्यावर हिन्दवी स्वराज्याचा उदय किंवा अस्त याचा निकाल लागावयाचा होता. म्हणूनच विशाळगडाहून (खेळणा) मोठी सेना १२ जुलैच्या सांयकाळी पन्हाळयाकडे रवाना झाली. व शिवाजीहि रात्री दोन तीन माणसांनिशी पन्हाळयाहून निसटला व या सैन्यास येऊन मिळाला. शिवाजीने शत्रूस हूल दाखविण्यासाठी बरेच सैन्य परत विशाळगडी रवाना केले व आपण आपल्या जेधे-बांदलांच्या निवडक ५०० लोकांनिशी रांगण्याकडे मोर्चा वळविला. सुमारे ४०-५० मैलांचा पल्ला गांठतांच आदिलशाही घोडदळ पाठीवर आल्याचे दिसले व शिवाजीच्या या लहानशा तुकडीनेहि जोराने कूच केले. परंतु रांगणा गांठण्यापूर्वी फजलचे घोडदळ आपल्यास गांठील असे वाटतांच शिवाजीच्या संरक्षणाची महत्त्वाच्या जबाबदारीच्या कामगिरीची वेळ जवळ आली असे बाजीस वाटले व अशा त-हेने मराठी राज्याच्या भवितव्यतेची उलटापालट होण्याचा अनिश्चित समय प्राप्त झाला असतांनाहि बाजीने शांत चित्ताने शिवाजीबरोबर आपल्यांतील २५० लोक देऊन आपण २५० निवडक लोकांनिशी घोडखिंड-रांगण्यापासून ६-७ मैलांच्या अंतरावर अडवून शत्रूच्या घोडदळाची धीराने वाट पहात बसला. महाराष्ट्रांत दुसरी बिकट 'थर्मापिली' केली. तीन चार तासपर्यंत हातघाईचे तुंबळ युध्द केले. बाजीचा वडील भाऊ फुलाजी ठार झाला व कित्येक मावळे वीर पडले. शेवटी ब-याच जखमा होऊन बाजीहि पडला. बाजीच्या तरवारीचा पट्टा बंद झाला परंतु तोंडाचा पट्टा चालू राहिला. राहिलेल्या तुटपुंज्या मावळयांनां धीर देऊन खिंड तशीच अडवून धरविली व शेवटी शिवाजी रांगण्यास सुखरूप पोहोचल्याच्या तोफा ऐकतांच बाजीने कर्तव्यमुक्त झाल्याचा दीर्घश्वास शेवटच्याच श्वासांत ता. १३ जुलै १६६० (आषाढ वद्य प्रतिपदा) रोजी सोडला व राहिलेल्या मावळे वीरांनीहि मोठया आनंदाने शत्रूच्या अफाट सैन्याला धीराने व निकराने तोंड देत देत आपल्या वीरसिंहाचे शव रांगण्यावर नेले. (वा. सी. बेंद्रे. शिवजंयती ग्रंथ. प्र.स. म. दिवेकर, म. सा. अं. १, २, ३, विद्यासेवक अं. २.३.५, रा.खं. १५, १६, भा.इ.सं. वृत्त. ४ थे)