विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाजी पासलकर - हा पुणे जिल्ह्यांतील मुसेखो-याचा देशमुख. मावळांतील देशमुखांचे वतनी तंटे मोडण्यात हा प्रमुख असे. त्याने अनेकांचे वतनी व इतर तंटे तोडल्याचे उल्लेख आहेत. फलटणचा वणगोजी नाईक निंबाळकर मावळांतील ह्या देशमुखाची मर्जी संभाळून असे. एखाद्या देशमुखाचा खून वगैरे होऊन त्याची बायकामुले देशोधडीस लागल्यास बाजी पासलकर त्यांस आश्रय देई. देशमुखांस कर्जाबद्दल किंवा चांगल्या वर्तणुकीबद्दल जामीन राहून त्यांच्या तो उपयोगी पडत असे. अशा इभ्रतीचा बाजी पासलकर हा मावळा देशमुख शिवाजीस आढळतांच त्यास त्याने हाताशी धरिले. बाजीचे पूर्ण नाव बाजी वलद बापूजी यशवंतराव पासलकर असे होते. 'यशवंतराव' हा किताब होय. ज्या प्रमुख मंडळींचे शिवाजीस चांगले पाठबळ होते, त्यांपैकी बाजी हा एक होय. शिवाजीचे विजापूरकरांशी युध्द सुरू असतां शिवाजीने एके समयी (१६६०) बाजी पासलकर यास वाडीच्या सावंताचा बंदोबस्त करावयास सांगितले होते. तेथे त्याने बराच पराक्रम व्यक्त केला. त्याचे नाव स.१६४० ते १७१७ पर्यंत आढळते. त्यानंतर तुळाजी व रामाजी यांची नांवे येतात. हे बहुधां त्याचे पुत्र असावेत. (मराठी रिसायत, भाग १)