विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाजरी - पांच ते सहा फूट उंचीचे व बहुधां आफ्रिकेतून आलेले तृणधान्य. हिंदुस्थानांत बाजरीची लागवड ज्वारीपेक्षा कांही कमी प्रमाणावर परंतु ज्वारी होणा-या सर्व प्रदेशांत (उत्तर, पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानांत) केली जाते. १९२२-२३ साली हिंदुस्थानात १३९२३६६९ एकर जमीन बाजरीच्या लागवडीकरिता उपयोगांत आली होती. निरनिराळया प्रांतांतील लागवडीचे क्षेत्रफळ व लागवडीचेी विशेष माहिती थोडक्यांत येणेप्रमाणेः-
बं गा ल - येथे हे पीक महत्त्वाचे नाही. पेरणी जुलैअखेर व एकराला ६ ते १० पौंड बी या प्रमाणांत करतात. कापणी आक्टोबर-नोव्हेबंर महिन्यांत करतात. एकरी पीक ३०० ते ५०० पौंड येते. गांवांतील केरकच-याचा कधी कधी खताप्रमाणे उपयोग करतात. पिकाला पाणी देण्याची गरज पडत नाही.
संयुक्त प्रांत - हे खरीप पीक असून ज्वारीच्या अंमळ मागून पेरतात व अगोदर कापतात. शेतांत नुसते हेच धान्य क्वचितच पेरले जाते. बहुधा ज्वारीबरोबर जी पिके लावतात त्याच पिकांत हेहि लावतात. याला जमीन हलकी व निकस चालते, व ज्वारीला जेवढा पाऊस लागतो त्यापेंक्षा कमी याला पुरतो. याला खत अथवा पाटाचे पाणी देण्याची जरूर नसते एकरी २ १/२ शेर या दराने बी पेरतात. नोव्हेंबरच्या सुमारास पीक तयार होते.
रा ज पु ता ना व म ध्य हिं दु स्था न. - एतद्देशीय संस्थानांपैकी अलवार, भरतपूर, ग्वाल्हेर, मारवाड, जयपूर, म्हैसूर वगैरे संस्थानांत या पिकांची लागवड बरीच होते. जून किंवा जुलैमध्ये फक्त कोरडया जमिनींतच हे पीक पेरतात. एकराला सरासरीने १.७३ हंड्रेडवेट पीक येते.
पं जा ब व वा य व्य स र ह द्दी चे प्रां त. - पंजाबच्या पुष्कळ जिल्ह्यांत बाजरीची लागवड बरीच होते, व रावळपिंडीच्या दक्षिणेकडील उंचवटयाच्या प्रदेशात बाजरी हेंच मुख्य खरीप पीक आहे. डेरागाझीखानमधील गव्हानंतरचे हेंच मुख्य पीक होय.
मुं ब ई व सिं ध - अहमदनगर, नाशीक, पुणे, खानदेश, सातारा, विजापूर व खेडा या जिल्ह्यांत बाजरीचे पीक सर्वांत जास्त होते.
हे पीक केवळ पावसाच्या पाण्यावर होत असून, हवा साधारण कोरडी, पावसाच्या जोराच्या सरी व मधून मधून चांगले ऊन मिळाल्यास ते चांगले येते. हे पीक खानदेशांतील कांही भाग सोडल्यास, नेहमी मिश्र असते म्हणजे दुस-या एखाद्या धान्याबरोबर पेरले जाते, व अशा रीतीने एकाच शेतांत लागोपाठ बाजरीचे हे पीक करता येते. परंतु पुष्कळ वेळा, मध्यंतरी दुसरी पिके लावण्याचा प्रघात आहे. कोईमतूर, सालेम, कडाप्पा, दक्षिण अर्काट, गुंतूर, त्रिचिनापल्ली, उत्तर अर्काट, मदुरा वगैरे जिल्ह्यांत लागवड बरीच होते.
अ न्न व चा रा. - मुख्यतः खालच्या वर्गांतील लोक या धान्याचा उपयोग करतात व हिंदुस्थानच्या कित्येक भागांतील ते मुख्य खाद्य धान्य आहे. बाजरीची भाकरी भातापेक्षा अधिक पौष्टिक असते. लेथर याने प्रसिध्द केलेल्या पृथक्करणावरून बाजरीत असलेल्या द्रव्यांचे शे. प्रमाण पुढीलप्रमाणे आहेः-
पाणी शे.८.७७, तेल शें. ५.३३, श्वेतकल्कपदार्थ शें.९.५२, द्राव्य कर्बोज्जिते ७३.५२, काष्ठमय तंतू शें.०.७८, द्राव्य खनिज पदार्थ शें.१.७३, वाळू व सीलिका शे. ०.३५, एकंदर नत्र शें. १.६१ व श्वेतकल्कयुक्त नत्र १.५१.
पंजाबात कधी कधी गुरांनां चारा मिळावा म्हणूनच बाजरी पेरतात, व पीक चांगले आल्यास हिरवेंच गुरांनां खावयास घालतात. धान्य तयार झाल्यावर तें काढून घेऊन उरलेले गवत गुरांना चारा म्हणून हिंदुस्थानच्या बहुतेक भागांत उपयोगांत आणतात.