विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बाजबहादुर - हा माळव्याचा शेवटचा बादशहा होता. याने मांडवगड येथे इ.स. १५५४ पासून स. १५६४ पर्यंत राज्य केले. हा फार विलासी, मृगयाकृशल आणि संगीतलोलूप होता. एके दिवशी नर्मदेच्या कांठी शिकारीस गेला असतां ह्याने रूपमतीस गातांना ऐकिले. तिचे गानमाधुर्य व लावण्य पाहून आपली राणी होण्याविषयी त्याने आपली इच्छा तिजजवळ प्रदर्शित केली. तिने सांगितले की मी रजपूत असल्याने तुझ्याशी लग्न लावणे शक्य नाही. परंतु तूं जर नर्मदा नदीस मांडवगडावर नेऊन, तेथून तिचा प्रवाह वाहत जाईल असे करशील तर मी तुझी राणी होईन. प्रवाहापासून मांडवगड १२०० फूट उंच होता, तथापि शहाने राज्यांतील सर्व संपत्ति व साधने लावून मांडवगड फोडून नर्मदाप्रवाह वर आणला व तेथे एक रेवाकुंड बांधले. रूपमतीशी शहाने या कुंडाजवळच विवाह केला. हे कुंड अद्यापि अस्तित्वांत आहे व याच्याजवळ बाजबहादुराचा राजवाडा व रूपमतीचा महाल ही विपन्न स्थितीमध्ये अद्यापि आहेत. या लग्नानंतर शहाने राज्यकारभारांत दुर्लक्ष करून आपला काळ शृंगारसुखामध्ये घालविला. ह्यामुळे मोंगलांनी १५६४ साली हे राज्य जिंकून घेतले व बाजबाहादुरचा खजिना व जनानखाना शत्रूच्या हाती जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा शहाने आपल्या राण्याचा वध करविला. हा हिंदुधर्मद्वेष्टा नव्हता. बहादुर व रूपमती यांच्यावर माळव्यांत पुष्कळ काव्ये केलेली आढळतात. ही दोघेहि कवी होती. यांचे काव्य इंग्रजीत छापून निघाले आहे. (इ.सं.म. जुन्या ऐ. गोष्टी, भाग २, पृ २१-२४)