विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांकुरा, जिल्हा - बंगाल प्रांतात, बरद्वान विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ २६२१ चौरस मैल. उत्तरेकडे व पूर्वेकडे प्रदेश तुटक व खडकाळ असून त्यांत मधून मधून टेंकडया आहेत. दामोदर व द्वारकेश्वर किंवा धवलकिशोर ह्या दोन नद्या या जिल्ह्यांतून वाहतात. उन्हाळयामध्ये, दिवसां उष्णमान १०२० पर्यंत जाते. वार्षिक पावसाचे मान सरासरी ५६ इंच आहे.
इतिहास - ऐतिहासिक कालापूर्वी बांकुरा हा कर्णसुवर्णाच्या राज्यांतील व नंतर बंगालच्या रा-ह विभागाचा एक भाग होता. आठव्या शतकाच्या आरंभी विष्णुपूर येथे एक हिंदु घराणे स्थापन झाले. त्यांतील राजांनी पश्चिम पठांरांतील जंगली टोळयांपासून बंगालच्या सरहद्दीचे संरक्षण केले. मुसुलमानी अमदानीत विष्णुपूरचे राजे मुसुलमान नबाबाचे कधी स्नेही, कधी बैरी, तर कधी मांडलिक असत. स. १७१५ त जाफरखानाच्या कारकीर्दीत येथील राजांनां केवळ जमीनदार म्हणूं लागले. सन १७६० मध्ये बरद्वान जिल्ह्याबरोबर हा जिल्हा ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला. त्यानंतर मराठयांच्या स्वा-या व १७७० सालचा दुष्काळ यामुळे या जिल्ह्याची स्थिति फारच खालावत गेली. इसवी सन १८३५ त बांकुरा हा निराळा जिल्हा कर यांत आला.
जिल्ह्याची लोकसंख्या सन १९२१ मध्ये १०१९९४१ होती. लोकसंख्येपैकी बहुतेक लोक हिंदु व थोडे मुसुलमान आहेत. पुरुषांपैकी शे.१८.३ व एकंदर लोकसंख्येपैकी शें. ९.३ लोकांनां लिहितावाचता येते. विष्णुपूरच्या पूर्वेकडील जमीन नदीतील गाळ सांचून झाली असल्याने सुपीक आहे, परंतु इतर ठिकाणी सखल जमिनी सकस व सुपीक आहेत, परंतु उंचवटयाच्या जमिनी त्यामानाने नापीक आहेत. येथील मुख्य पीक भात हे होय. रेशमी व सुती कापड, पितळेची व काशाची भांडी व लाख करणे हे तेथील मुख्य धंदे आहेत. आयात माल तंबाखू, मीठ, मसाले, सुपारी, कापूस, कापसाचे सूत व कापड व निर्गत माल तांदूळ पितळेची व काशाची भांडी, रेशमी कापड आणि कातडी. ईस्ट इंडियन रेल्वेचा फांटा, ईशान्य मर्यादेवरून गेलेला आहे. बंगाल नागपूर रेल्वेचा मिदनापूर-जेरिया फांटा या जिल्ह्यांतून जातो.
गां व - हे गांव धवलकिशोर नदीच्या उत्तर तीरावर आहे. लोकसंख्या सुमारे वीस हजार. येथील बहुतेक वस्ती हिंदूची आहे. बांकुराय नांवाच्या एका प्राचीन रहिवाश्याच्या नावांवरून या गावाचे नांव पडले असे म्हणतात. येथील हवा कोरडी व निरोगी आहे. कलकत्त्याहून वायव्येकडे जाणारा रस्ता या गावांवरून जातो. या गांवांतून बंगाल, नागपूर रेल्वेची मिदनापूर-जेरिया शाखा जाते. व थेट हौ-यापर्यंत जाणारा फांटा तयार झाला आहे. येथे 'टसर' रेशमाचे कारखाने असून इतर व्यापार बराच चालतो.