विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाकु - अझरबैजन हे त्याच नांवाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण व अझरबैजनची राजधानी असून हे रशियन दक्षिण रेल्वेला व बाटुम व पोटी यांना आगगाडीने जोडलेले आहे. येथे १६ व्या शतकांत एद्देशीय खानांनी बांधलेल्या राजवाडयांचा अवशेष आहेत. हे बंदर असून येथे रशियाच्या कास्पियन आरमाराचे कारखाने, वखारी वगैरे आहेत. येथे पेट्रोलियम शुध्द करण्याच्या कारखान्याशिवाय, तेलाचे कारखाने, गहुं दऴण्याच्या गिरण्या व तंबाखूचे कारखाने आहेत. पेट्रोलियमच्या व्यापाराचे हे केंद्र आहे. उत्तम बंदर असल्यामुळे बाकु हे इराण व ट्रान्सकास्पियन व्यापारी जिनसांची व रशियाच्या पक्क्या मालाची वखार आहे. हवा कडक असून पावसाचे वार्षिक मान ९४ इंच आहे. येथील लोकसंख्या सुमारे २५०००० आहे. अरब भूगोलवेत्ता मसुदि याने १० व्या शतकांत या शहराचा उल्लेख केला आहे. स. १५०९ पासून हे इराणच्या ताब्यांत होते. रशियन लोकांनी त्यांच्यापासून ते स. १७९३ मध्ये घेतले. परंतु स. १७३५ मध्ये परत दिले. स. १८०६ मध्ये हे रशियन साम्राज्याला जोडण्यांत आले. सार्वजनिक राजकीय अंदाधुंदीमुळे स. १९०४-०५ मध्ये तार्तर व आर्मेनियम लोकांत चांगलेच लढे झाले. व दोनतृतीयांश बालाखानी व बिबि इयबात या तेलांचे कारखाने जाळण्यांत आले. स.१९१७ त अझरबैजन (पहा) स्वतंत्र झाले.