विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहुसुखवाद - आधिभौतिक सुखवादांतील एक श्रेष्ठ पंथ, याला जनहितवाद अगर 'पुष्कळांचे पुष्कळ सुख अगर हित', असे म्हणतात. ज्या योगाने पुष्कळ लोकांना पुष्कळ सुख होईल तीच गोष्ट आपण नीतिष्टया ग्राह्य समजली पाहिजे असा याचा अर्थ होय. बेंथाम, मिल्ल वगैरे पंडित या पंथाचे पुरस्कर्ते आहेत. 'पुष्कळांचे पुष्कळ सुख' या मिल्लप्रभृति विद्वानांच्या नीतितत्त्वावर अनेक आक्षेप घेण्यांत आले आहेत. पुष्कळ लोकांना अमुक एखादी गोष्ट केल्याने सुख होईल असे वाटले तर ती गोष्ट वाईट असून देखील तिला नीतिद्र्युष्टया चांगल्याचे स्वरूप प्राप्त होण्याची आपत्ति येईल. त्यामुळे संख्येवरून नीतीचा योग्य निर्णय होऊ शकत नाही असा एक आक्षेप याच्यावर घेण्यात आला आहे. दुसरा आक्षेप असा आहे की, जरी हा जनहितवाद नीतिद्दष्टया बरोबर आहे असे धरले तरी हे सुख अगर हित कशांत आहे व ते ठरवावयाचे कसे याचा निकाल वरील सूत्राने लागत नाही. त्याचप्रमाणे या जनहितवादावर तिसरा आक्षेप म्हणजे यामध्ये कर्त्याच्या बुध्दीला वाव देण्यात आला नाही हा होय.