विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहामा बेटे - बहामा (लुकायॉस) हा ब्रिटिश वेस्ट इंडीजपैकी एक द्वीपसमूह आहे. ह्यांत २९ मोठी बेटे व ६६१ लहान बेटे आहेत. हा समूह पश्चिम रेखांश ८००५०' ते ७२०५०' आणि उत्तर अक्षांश २२०२५' ते २६०४०' यांवर आहे. क्षेत्रफळ ४४०४ चौरस मैल आणि लोकसंख्या (१९२१) ५३०३१. लोकसंख्यापैकी १२००० श्वेतवर्णी लोक असून बाकीचे इतर आहेत. या द्वीपसमूहांत पुढील मुख्य बेटे आहेतः - लहान व मोठे अबॅको, मोठे बहामा, एल्युथेरा, कॅट, वॅटलिंग (अथवा ग्वानाहानी) रुमके, न्यूप्रॉव्हिडन्स, एक्झ्युमा, लांग, ऍड्रॉस, क्रुकेड, मयाग्वाना आणि इनाग्वा, यांपैकी न्यूप्रॉव्हिडन्स बेटांत नॅसाऊ हे राजधानीचे शहर आहे.
ही प्रवाळाची बेटे आहेत. येथील खडक गारेसारखा कठिण आहे परंतु खालचे थर त्या मानाने मृदु असून त्यांनां वाटेल तो आकार देता येतो. या बेटांत विहिरींपासून पाण्याचा पुरवठा होतो. नसाऊ येथे संयुक्त संस्थाने व कॅनडा यांतून पुष्कळ लोक हिवाळयांत येतात. या शहरांत मुख्य मुख्य सार्वजनिक इमारती व काही जुने किल्ले आहेत. न्यूयॉर्क व फ्लोरिडाशी आगबोटीने या शहराचा व्यवहार चालतो.
बहामाची हवा चांगली आहे. येथील उष्णमान ६६० ते ८८० असते. येथे काळी, तांबडी व पांढरी अशा तीन प्रकारची जमिनी आहे. ऍड्रास व अबॅको बेटांत इमारती लांकूड उत्पन्न होते. बहामांत पुष्कळ जातीची फळे होतात. येथे कापसाची लागवड होत असे. पाळीव जनावरे यूरोपांतून आणली आहेत व काही पक्ष्यांच्या जातीहि येथे सांपडतात.
राज्यकारभार व व्यापार - येथे ब्रिटिश गव्हर्नर असून त्याच्या मदतीस म्हणून सरकारी व निमसरकारी अशा ९ सभासदांचे एक कार्यकारी मंडळ असते. याशिवाय राजनियुक्त अशा ९ सभासदाचें कायदेमंडळ आहे. २९ सभासदांची दुसरी एक असेंब्ली सभा आहे. २१ वर्षांवरील गो-या अथवा काळया मनुष्यास मत देण्याचा अधिकार असतो. फक्त तो १२ महिन्यांपेक्षा अधिक दिवसांचा (येथील) रहिवाशी अथवा ५ पौंडापेक्षा अधिक किंमतीची जमीन त्याच्या मालकीची असावी लागते. १९२३ साली आयात २१२०१३६ पौडांची व निर्गत १८३४०५१ पौडांची होती. प्राथमिक शिक्षण ६-१४ वयापर्यंत सक्तीचे आहे. याशिवाय दुय्यम शिक्षणसंस्था व एक कॉलेज आहे.
इ ति हा स - कोलंबसला प्रथम सॅन साल्व्हाडोर बेट दृष्टीस पडले. हे बेट म्हणजे वॅटलिंग व मॅरिग्वाना यांच्यामधले सॅमाना (ऍट वुडके) होय. बहामा बेटांतील लोकांना गुलाम म्हणून स्पॅनिश लोकांनी नेले. १६४६ साली ब्रिटिशांनी एल्युथेरा बेटांत वसाहत केली. १६८० व १७०३ साली स्पॅनिश व फ्रेंच लोकांनी ब्रिटिशांवर हल्ला केला. १७१८ साली खरी ब्रिटिश वसाहत झाली. अमेरिकन यादवीत येथे पुष्कळ श्रीमंत व सुखवस्तु वसाहतवाले आले. १८४८ साली टर्कस व कैकास ही बेटे बहामामधून विभक्त केल्यामुळे बहामाचा तोटा झाला. त्याचप्रमाणे सन १८३४ मधल्या गुलामांच्या कायद्यामुळे देखील तोटा झाला असावा.