विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहामनी ऊर्फ ब्राह्मणी राज्य (१३४७ - १५२६) - या घराण्यांत एकंदर १८ राजे झाले. त्यांतील पहिला सुलतान हसनगंगू उर्फ अल्लाउद्दीनशहा (१३४७ - १३५८). हा दिल्ली येथे गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या पदरी गुलाम होता. या गंगु ब्राह्मणावर महंमद तुघ्लखाची मेहरबानी होती. (एका बखरीत मिरजेच्या गंगरसंपत देशपांडयाचा हसन हा चाकर होता असे म्हटले आहे) हसन हा अत्यंत इमानी असल्यामुळे, त्याच्या धन्याने महंमदापाशी त्याची तारीफ केली. सुलतानाने हसन यास सरदारी देऊन दक्षिणेच्या सुभेदाराच्या मदतीस पाठविले, परंतु दक्षिणच्या सुभेदारानें हसनच्या साहाय्याने महंमदाविरुध्द बंड करून व दौलताबादचा किल्ला घेऊन नासिरुद्दीन नामक मनुष्याला दौलताबादचा सुलतान बनविले. महंमद तुघलखाने स्वतः दौलताबादेस वेढा दिला, पण उत्तरेकडे दुसरे बंड झाल्याने तो निघून गेला. याच वेळी हसन यास जफरखान असा किताब मिळाला. पुढे जाफरखानाने महमंद तुघ्लखाने पाठविलेल्या सैन्याचा वरंगळच्या राजाच्या मदतीने पराभव करुन बेदर व कंधार हे किल्ले काबीज केले. काही दिवसांनी नासिरुद्दीन याने आपले सुलतानपद स्वखुषीने जाफरखानास दिले (आगस्ट १३४७). जाफरखानाने अल्लाउद्दीन हसन असे नाव धारण करून आपल्या नावांची नाणी पाडिली व कलबुर्गा ही आपली राजधानी केली. तो हुषार व धोरणी होता. तो हिंदुधर्मद्वेष्टा नव्हता. तरी पण धर्माच्या बाबतीत कांही कपट करून त्याने दक्षिणेंतील हिंदु राजांना आपल्या पक्षास वळविले, देशमुख-देशपाडयांना इनामे दिली, अनेक मराठे, कानडी, नवीन तेलंगी जहागीरदार निर्माण केले. हसनचे राज्य हळू हळू विस्तृत झाले. आपल्या पूर्वीच्या धन्यास (गंगू ब्राह्मणास) न विसरता त्याने त्याला आपल्या दरबारी इतमामाने (फडवणीस म्हणून) ठेविले व त्याच्या स्मरणार्थ आपल्या नावास त्याने गंगू-ई-बहामनी असा किताब जोडिला. अल्लाउद्दीन हसनने मोठया न्यायाने राज्य केले. तो स. १३५८ त मरण पावला त्यावेळी या विस्तार जवळ जवळ महाराष्ट्रभर झाला. या राज्याची प्रजा मुख्यतः हिंदु होती. हसन हा खुशामतीने व कपटाने मोठया पदास चढला.
म हं म द श हा (१३५८ - १३७५) - अल्लाउद्दिनचा पुत्र महंमद हा असून तो त्याच्यानंतर गादीवर बसला. विजयनगर व तैलगंण येथील राजे एकत्र होऊन त्यांनी महंमदशी लढाई सुरू केली, परंतु त्यांना यश आले नाही. (१३६६). बहामनी व विजयानगर यांच्या सरहद्दीवरील मुद्गलच्या किल्ल्यासाठी बहामनी शहांनी अनेक वेळा विजयानरच्या राजांवर स्वा-या केल्या, परंतु त्यांत त्यांना कायमचे यश कधीच आले नाही.
महंमदने आपला वेळ राज्यांतील बंडे मोडण्यांत घालविला. चोर, रामोशी वगैरे दुष्ट लोकांचा बंदोबस्त करून त्याने आपल्या राज्याची नीट व्यवस्था केली. याने आपल्या राज्याच्या चार तर्फा (सुभे) कलबुर्गा, दौलतबाद, तेलिंगण व व-हाड या नांवाच्या करून त्यांवर चार सुभेदार नेमिले. तो आपल्या प्रजेची दाद घेण्यात फार दक्ष असे. त्याच्यानंतर झालेले सुलतान विशेष महत्त्वाचे नाहीत. त्यांच्या कारकीर्दीत हिंदु व मुसुलमान यांच्यामध्ये सतत युध्दे चालू होती.
मु जा हि द् श हा (१३७५ – १३७८) - हा महंमदचा मुलगा असून शूर व धीट होता. हा गादीवर येतांच विजयानगरच्या राजाबरोबर युध्द सुरू झाले. याने अपार संपत्ति व पुष्कळ मुलूख मिळविला. पुढे त्याचा चुलता दाऊदखान याने त्याला ठार मारिले (१३७८). दाऊदने राज्य मिळविण्याची खटपट चालविली. परंतु मुजाहिद्ची बहीण, रूपवर आघा हिने त्याचा खून करविला.
महंमूदशहा (१३७५ – १३९७) - आघाने अल्लाउद्दीनचा कनिष्ठ पुत्र महंमूद यास तख्तावर बसविले. महंमूद दयाळु, सद्गुणी व विद्वान होता. त्याने विद्येस बरेंच उत्तेजन दिले. त्याची कारकीर्द शांततेची झाली. त्याला दक्षिणचा ऍरिस्टॉटल असे म्हणत. याच्या वेळी दुर्गादेवीचा दुष्काळ पडला असें म्हणतात. त्याच्यानंतर त्याचे घियासुद्दीन व शमसुद्दीन हे दोन पुत्र गादीवर बसले, परंतु दरबा-यांनी त्यांना सहा महिन्यांच्या आंत पदच्युत करून, दाऊदखानाचा पुत्र ताजुद्दीन फिरोजशहा यास तख्तावर बसविले.
फिरोजशहा (१३९७ – १४२२). - याच्या वेळी बहामनी राज्याच्या वैभवाचा कळस झाला. हा उदार होता. यानें आपले राज्य वाढवून मुसुलमानी धर्माचा बराच प्रसार केला. हा फार दारूबाज होता. यानेहि विद्येस उत्तेजन दिले. भीमेच्या कांठी याने एक शहर वसवून त्याचे नावं फिरोजादाद ठेविले व दौलताबादेजवळ एक वेधशाळा बांधिली (१४०७). ख्रिस्ती धर्मशास्त्र वाचण्याचा त्याला मोठा नाद होता. त्याने विजयानगर व केरळ येथील राजांशी लढाया केल्या(१३९९). याच सुमारास तैमूरने हिंदुस्थानावर स्वारी केली, तेव्हां फिरोजने आपला वकील त्याच्याकडे पाठवून त्याचे सार्वभौमत्व कबूल केले. इ.स. १४१७ त शहाने तैलगंणावर हल्ला केला, परंतु त्यावेळी हिंदूंनी मुसुलमानांचा मोड करून सूड उगविला. या पराभवामुळे हा भ्रमिष्ट झाला. याने आपल्यादेखत आपला भाऊ अहंमद यास तख्तावर बसविले. पुढे लवकर हा मरण पावला.
अ हं म द शहा व ली (१४२२ – १४३५) - अहंमद हा विद्वान असून साधूंस फार मान देई. म्हणून त्यास वली (साधु) हे नांव मिळाले. त्याने मलिक तुजारच्या साहाय्याने फौजेत सुधारणा केल्या. याच्या कारकीर्दीत दादो नरसो काळे या ब्राह्मण प्रधानाने उत्तम जमाबंदी केली. महंमदने स. १४२४ त वरंगळच्या राजावर स्वारी करून त्यास ठार मारिले, व तेथील बायकापोरांस बाटवून मुसुलमान केले आणि हिंदु लोकांची देवळे पाडून तेथे मशिदी बांधल्या. पूर्वीची हिंदु राजधानी बेदर, येथे एक किल्ला बांधून व शहराचे नावं अहंमदाबाद बेदर असे ठेवून तेथे त्यानें आपली राजधानी केली. याचे साग्र चरित्र ज्ञा. को.वि.७, पृ ५०६-८ मध्ये दिले आहे. त्याच्यामागे त्याचा मुलगा अल्लाउद्दीन शहा (दुसरा १४३५-५७) हा गादीवर आला. त्याच सुमारास विजयानगराच्या राजाने मुसुलमानांचा पाडाव करण्याचा विचार ठरवून अनेक मुसुलमानांस आपल्या नोकरीस ठेविले. त्यांच्यासाठी त्याने एक मशीद बांधिली. नंतर मोठी फौज ठेवून त्याने लढाईची तयारी केली. अल्लाउद्दिनास ही बातमी कळतांच त्याने चढाई केली. तीन मोठया लढाया होऊन कायमचा निकाल असा कांहीच लागला नाही.
तसेंच मलिक तुजार यांने रायगडकडे स्वारी केली असता तिकडील शिरके सरदार व इतर मराठे जहागीरदार यांनी त्याला व त्याच्या ७ हजार मुसुलमान फौजेला कापून काढले. (१४५३) अल्लाउद्दिनाने अनेक धर्मकत्ये केली. तो दर शुक्रवारी स्वतः खुत्बा पढून लोकासं धर्मोपदेश करी. त्याने मद्यप्राशनाची बंदी केली. तथापि हिंदु लोकांस त्याने बराच त्रास दिला. त्याने अनेक बंडे मोडली. महंमद गावान प्रथमतः या वेळी प्रसिध्दीस आला. अल्लाउद्दीन १४५७ साली मरण पावला. तो धूर्त व विद्येचा भोक्ता होता. याच्याच कारकीर्दीत नरसिंहसरस्वती हे उदयास आले. गुरुचरित्रांतील बेदरच्या शहाच्या पायाचा फोड बरा केल्याची गोष्ट याच्याच बद्दलची आहे असे रा. चिं.वि. वैद्य म्हणतात.
हु मा यू न श हा जा ली म व नि जा म श हा (१४५७ – ६३) - अल्लाउद्दीनचा पुत्र हुमायून गादीवर आल्यावर त्यानें महंमद गावान यास वजीर नेमिले. सिंकदरखान नामक सरदार व स्वतःचा भाऊ हसन यांनी केलेली बंडे हुमायूनने मोडली. हा फार क्रूर होता. त्यामुळे त्याला जालीम असे म्हणत. त्याच्या हुज-यांनी त्याचा १४६१ साली खून केला. या नंतर त्याचा आठ वर्षाचा पुत्र निजाम हा गादीवर आला, त्याची आई महंमद गावानच्या सल्ल्याने कारभार पाही. निजाम हा १४६३ साली मरण पावला. ज्या दिवशी त्याचे लग्न झाले त्याच दिवशी तो मरण पावला. याच्या कारकीर्दीत माळव्याच्या सुलतानाने बेदरवर स्वारी करून ते जाळून व लुटून फस्त केले होते.
म हं म द श हा दु स रा (१४६३ – ८२) - निजामशहाचा भाऊ महंमद हा गादीवर आला. त्यावेळी तो नऊ वर्षांचा होता. त्याला उत्तम शिक्षण मिळाल्यामुळे पुढे तो विद्वान झाला. यावेळीहि गावान हाच मुख्य कारभारी होता. त्याने (१४६९) विशाळगडच्या शंकररायाचा पराभव करून तो किल्ला व विजयानगरच्या ताब्यांतील गोवे शहर घेतले. अशा त-हेने कोकणपट्टी बहामनी राज्याच्या ताब्यांत आली. या विजयामुळे गावान प्रसिध्द झाला. शहाने त्याचा बहुमान केला. पुढे (१४७१ – ७७) ओढया, कर्नाटक व तैलंगण प्रांतांवर स्वारी करून शहाने बराच मुलूख जिंकला, प्रत्येक स्वारीत गावानच्या शहाणपणामुळे शहास यश आले. त्यामुळे गावानचे वजन फार वाढले हे इतर सरदारांस सहन न होऊन, ते त्याचा द्वेष करू लागले. गांवान याने राज्यकारभारात चांगल्या सुधारणा केल्या, जमिनीची मोजणी करून कायमचा शेतसारा ठरविला. महत्त्वाकांक्षी लोकांनी निझामुल्मुल्क बहिरीच्या हाताखाली गावानचा नाश करण्यासाठी एक गुप्त कट केला व त्याच्यावर राजद्रोहाचा खोटा आरोप आणून शहाकडून त्याचा खून करविला (१४८१). गावनचा जन्म १४०३ साली झाला. त्याने एका गाईचे संरक्षण केल्यावरून त्याला गावान हे टोपण नांव मिळाले. त्याच्या पूर्वजांना इराणांत वजिरीचे काम होते. महंमद याने व्यापाराच्या उद्देशाने स्वदेश सोडून हिंदुस्थान गांठले. त्याने इकडील विद्वान लोकांची ओळख करून घेतली. तो बेदरास आला असता अल्लाउद्दिनानें त्याची हुशारी पाहून त्यास आपल्या दरबारांत सरदारी दिली. त्या वेळेपासून हळू हळू तो मोठया पदास चढला. तो सुनीपंथी असून उदार, विद्वानांचा पोशिंदा, गणिती, कवि, परोपकारी, उत्तम सेनापति, साध्या रहाणीचा, मनमिळाऊ व निःपक्षपाती होता. बेदर येथे त्याने एक पाठशाळा स्थापिली होती. आपण निर्दोषी आहोत अशी महंमदशहाची खात्री करण्याचा त्याने पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्याचा उपयोग न होता शहाने त्यास ठार मारिले, परंतु पुढे खरी हकीकत समजल्यावर शहास पश्चाताप होऊन व झुरून तो मरण पावला. गावानच्या वेळी त्याच्या तोडीचा एकहि मुसुलमान दक्षिण हिंदुस्थानामध्ये नव्हता असें म्हणतात. त्याने दोन बालराजांचे उत्तम प्रकारे संगोपन केले.
म हं मू द श हा, (दुसरा १४८२ -१५१८). - नंतर महंमदाचा पुत्र महंमूद हा गादीवर बसला. ह्यांच्या कारकीर्दीत राज्यांतील दक्षिणी (सुनी) व परदेशी (शिया) या दोन पक्षाचे तंटे विकोपास जाऊन त्यांतच बहामनी राज्याची अखेर झाली. हे तंटे शहास मोडता न आल्यामुळे राजधानीत २० दिवस सारखा रक्तपात चालू राहिला. शहा तर चैनबाजीत निमग्न रहात असे. त्याचा अधिकार कोणी जुमानीनासे झाले, निरनिराळे सुभेदार स्वतंत्र झाले. याप्रमाणे त्याचे सर्व आयुष्य हालअपेष्टेंत गेले.
अ हं म द दु स रा (१४१८ – २०) व शेवटचे राजे - नंतर त्याचा पुत्र अहंमद यानें १५२० पर्यंत राज्य केले. पुढे त्याचा भाऊ अल्लाउद्दीन तिसरा हा गादीवर बसला, परंतु वजीर अहंमद बेरीद याने त्यास पदच्युत करून त्याचा वडील भाऊ वली-उल्ला यास तख्तावर बसविले (१५२१), परंतु थोडयाच दिवसांनी त्यास विषप्रयोग करून बेरीदने अहंमदचा मुलगा कलीम-उल्ला याला गादीवर बसविले व बलीच्या बेगमेशी निका लाविला. तिच्यावर आषक होऊनच त्याने वलीचा खून केला होता. कलीम या नामधारी शहाने १५२६ पर्यंत राज्य केले. हा शेवटपर्यंत नगरच्या बु-हाण निजामशहाकडेच राहात होता. याच्यानंतर बहामनी वंशाचे राज्य लयास गेले.
बहामनी राज्याची पुढील पांच राज्ये झाली - (१) विजापूरचे आदिलशही (यांचा संस्थापक युसूफ आदिलखान हा गावानचा दत्तक पुत्र होता) (२) गोवळ – कोंडयाचे कुत्बशाही, (३) व-हाडचे इमादशाही, (४) अहमदनगरचे निजामशाही व (५) अहंमदाबाद बेदरचे बेरीदशाही. विजयानगरच्या राज्याशिवाय संपत्तीचे व ऐश्वर्याने बहामनी राज्याच्या तोडीचे दुसरे एकहि राज्य त्यावेळी दक्षिणेंत अस्तित्वांत नव्हते. लहान लहान हिंदु राज्ये जिंकून बहामनी राज्य वाढले होते. दिल्लीच्या बादशहास बहामनी शहांनी दाद दिली नाही. गावानच्या वेळेपर्यंत या राज्याच्या चार तर्फा किंवा सुभे होते. गावानने त्याच्या विजापूर, दौलताबाद, असनाबाद, जुन्नर, राजमहेंद्री, वरंगळ, गाविलगड व माहूर अशा एकंदर आठ तर्फा केल्या. तर्फांवरचे अधिकारी एक प्रकारचे स्वतंत्र राजेच असत. त्यांना रोकड वेतने नसून जहागिरी तोडून दिलेल्या असत. बहामनी राजे राज्यविस्तार करीत पण राज्यांत व्यवस्था ठेवण्याकडे दुर्लक्ष्य करीत त्यामुळे ते दुर्बल झाल्याबरोबर हे तर्फदार किंवा सुभेदार बलिष्ठ झाले हे राज्य यापूर्वीच मोडले असते परंतु गावानच्या सुव्यवस्थेमुळे तर्फदारांचे कांही चालत नसे, त्यामुळे ते त्याचा द्वेष करू लागले. गावान मरण पावल्यावर हे तर्फदार स्वतंत्र झाले व बहामनी राज्याचे तुकडे झाले.
बहामनी राजे साधारणतः प्रजाहितदक्ष होते, ते हिंदूंस मोठाल्या जागा देत नसत. तथापि हिंदू लोकांस आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास विशेष अडचण पडत नसे. यावेळी इतर देशांशी हिंदुस्थानचा व्यापार वाढून प्रवास करणे सुलभ झाले. या शहांनी विद्येस व विद्वान लोकांस चांगला आश्रय दिला. त्यांनी बांधिलेल्या कित्येक इमारती प्रेक्षणीय आहेत. परदेशी हबशी, तुर्की, इराणी वगैरे असंख्य लोक या राज्यांत नेहमी येत व त्यांना राजाश्रय व इनामें मिळत. सांप्रतच्या दक्षिणेंतील मोठमोठया मुसुलमान घराण्याचीं उत्पत्ति यावेळची आहे. यामुळे हे हिंदूंचे महत्व कमी कमी होत गेले.
दक्षिण हिंदुस्थानांत मुसुलमानी सत्तेची स्थापना झाली, तिची हकीकत वाचली म्हणजे हिंदु व मुसुलमान यांजमधील विरोध स्पष्ट कळून येतो. मुसुलमानांची सत्ता पंजाब व दिल्ली या प्रांताच्या पुढे पसरली नव्हती, तोपर्यंत त्यांच्यात निश्चयी व कडव्या मुसुलमानांची मध्यअशियाखंडांतून भरती होऊन त्यांच्या अंगचे प्रखर तेज जागृत रहात होते, हिंदु धर्माशी त्यांचा फारसा संबंध आला नव्हता. दक्षिणेत त्यांचा प्रदेश होऊ लागला, तेव्हापासून त्यांच्या धर्माचे व राज्यकारभाराचे स्वरुप बदलत चालले अपरिचित देश व भिन्न भाषा यांत त्यांचे दळणवळण सुरू झाल्यामुळे उत्तरेकडील मुसुलमानांचे व त्यांचे मूळचे नाते तुटत चालले. हिंदूंचे आचारविचार त्यांस ग्राह्य करावे लागले. हिंदूंच्या संस्थांचा परिणाम त्यांच्यावर होऊ लागला. त्यामुळे त्यांनां दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यांत राहणे त्यास दुःसह वाटून त्यांतून आपली मुक्तता करून घेण्यास ते उत्सुक झाले.
अशा प्रकारची बंडे दक्षिणेत झाली असे नाही. बंगाल्याकडे गेलेल्या मुसुलमानांनी हिंदूंच्या मसलतीने स्वतंत्र राज्य स्थापण्याचे प्रयत्न केले. परंतु बंगाल्यात हिंदु लोकांनी बंडखोरांस मदत दिली नाही. दक्षिणचे हिंदु पाणीदार होते. त्यांस स्वातंत्र्याची अभिरुचि विशेष होती. बंगालचे हिंदु मुसुलमानांस वचकून असत.
दक्षिणेतील बंडाचे अंतस्थ कारण - शिया व सुनी यांजधील विरोध हेच ह्या बंडाचे अंतस्थ कारण होय. हिंदुस्थानांत ह्या मतभेदास चमत्कारिक स्वरूप प्राप्त झाले. सुनी पंथाचा हिंदुधर्माशी अत्यंत विरोध आहे. शिया पंथाचा कल हिंदु धर्माशी कांही अंशी मिळता आहे. एवढा भेद लक्षांत ठेविला म्हणजे ह्या वेळच्या मुसुलमानी इतिहासाचें स्वरूप विशेष स्पष्ट होते. या पंथाचा भरणा बहामनी राज्यांत विशेष होता. ह्या पक्षाचे (शिया व सुनी) तंटे त्या राज्यांत सतत चालू असत. ह्या तंटयाची हकीकत म्हणजेच बहामनी राज्याचा इतिहास समजला जातो.
ह्या राज्याचा विस्तार मुख्यतः सर्व महाराष्ट्रास व्यापून होता. त्याच्या उत्तरेस नर्मदा नदी, पश्चिमेस सह्याद्रि पर्वत, दक्षिणेस कृष्णा नदी आणि पूर्वेस तैलगंणचे राज्य व गोंडवनचे जंगल अशा त्याच्या चतुःसीमा होत्या. ह्या राज्यास आरंभी समुद्रकिनारा नव्हता. सरहद्दीवर माळव्यांत व खानदेशांत नवीनच मुसुलमानी राज्ये स्थापन झाली होती. ह्यामुळे हिंदु चालीरीतीचे विशेष वजन ह्या राज्यांत होते. कृष्णेच्या दक्षिणेस तुंगभद्रा नदीच्या कांठी विजयानगर येथे वरंगळच्या राजघराण्यांतील एका पुरुषाने ब्राह्मणी राज्यस्थापनेच्या सुमारासच नवीन हिंदु राज्याची स्थापना केली. हेंच राज्य पुढे बलाढय होऊन त्याचे बहामनी राज्याशी वैर जुंपले.
हिंदु लोकांची ग्रामसंस्था ह्या राज्यांत दिवसेंदिवस द्दढ होत चालली होती. अथानेसियस निकितिन ह्या नांवाचा रशियांतील एक आर्मेनियन व्यापारी बेदर शहरास आला होता (१४७०). त्याने तेथली कांही हकीकत लिहून ठेवली आहे. दर दोन मैलांच्या अंतराने हल्लीच्याप्रमाणेच त्यावेळेस गांवे वसलेली असत. रस्त्यांवर चांगला बंदोबस्त असून प्रवास करणारांस भीति नसे. बेदरची हवा फार चांगली असून ते शहर सुरेख होते. बहामनी राजांनी बांधलेले डोंगरी व भुईकोट (नरनाळा व गाविलगडसारखे) किल्ले हेच त्यांचें चिरकाल राहणारे स्मारक आहे. मोठमोठया गांवांतून मशिदी असून त्यांस सरकारांतून नेमणुका करून दिलेल्या असत. प्रत्येक मशिदीत एक मुल्ला नेमलेला असे. तोच शाळाशिक्षणकाचेंहि काम पाही. मोठमोठया शहरांतून पाठशाळा असून त्यांना मोठाल्या नेमणुका करून दिलेल्या असत. तैलंगण प्रांतांत बहामनी राजांनी बांधलेले पुष्कळ तलाव हल्ली शाबूद आहेत. (फेरिस्ता, ग्रँटडफ, माबेल डफ, टेलर, कर्नल किंग – हिस्टरी ऑफ दि बहामनी किंग्ज , मोडक-बहामनी राज्याचा इतिहास, इलियट, सिवेल- डिनॅस्टीज ऑफ दि डेक्कन, बुहार्न-ई-मआसीर, तझकरतउल्मुलुक, सिराजउलकुलब)