विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहादुरशहा (१५२६ - १५३६) - गुजराथचा एक सुलतान. सिंकदरशहाचा खून झाल्यावर बहादुरशहा हा अहंमदाबादचा सुलतान झाला. तो उदार व दयाळु होता. गुजराथेत मोठा दुष्काळ पडला असतां, त्याने जिकडे तिकडे अन्नसत्रे व सदावर्ते घातली. दीव, जुनागड, खंबायत वगैरे ठिकाणी त्यानें आपला अंमल कायम केला. त्याने अहमदनगर लुटले, आणि माळव्यांत जाऊन तेथचा सुलतान महंमद खिलजी व त्याचे सहा मुलगे ह्यांस पकडून अहमदाबादेस आणिले (१५२९).
रायसेन किल्ला व उज्जनी वगैरे ठिकाणे बहादुरशहाने सर केली. पुढे चितोडगडवर फौज पाठवून तेथच्या राजाचाहि त्याने पाडाव केला. याप्रमाणे बहादुरशहा प्रबळ होत चालला. तितक्यांत दिल्लीचा हुमायुन याने गुजराथेवर स्वारी केली. खोरासनच्या एका राजपुत्रास हुमायूनकडे परत पाठविण्याचे बहादुरशहाने नाकबूल केल्यामुळे, हुमायूननें गुजराथवर स्वारी केली. हुमायूनने बहादुरच्या एका सरदाराच्या मदतीने गुजराथ प्रांत सर केला. तेव्हां बहादुरशहा मांडवगडास व तेथून चंपानेर आणि नंतर दीव बंदराकडे निघून गेला. हुमायूनने सर्व प्रांत घेऊन अहमदाबादेस आपला भाऊ हिंदाल यास ठेविले (सन १५३४). पुढे बहादुरशहाने फौज जमवून दिल्लीच्या फौजेचा पराजय करून नऊ महिन्यांच्या आंत आपले सर्व राज्य परत मिळविले.
इकडे दीव बंदरी पोतुगीज लोकांनी फारच पुंडाई माजविली. ते लोक कोकणपट्टीतील मुलूख भराभर काबीज करीत चालले. बहादुरहाने आपली फौज त्यांजवर पाठविली. बरेच दिवस युध्दप्रसंग होऊन उभयांताचा तह झाला. तेव्हां बहादुरशहास फिरंग्यानी आपल्या गलबतांवर भेटीस बोलाविले, सुलतान भेटीस आल्यास आपणहि परतभेटीस येण्याचे त्यांनी कबूल केले. बहादुरशहा त्यांजकडे गेला असता, त्यांनी कपट करून त्यास व त्याच्या लोकांस समुद्रांत लोटून ठार मारिले. (डफ, मुसुलमानी रियासत.)