विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहाई पंथ - (बाबीसंप्रदाय) ह्या पंथाचा उदय सन १८४४-४५ त इराण देशांत झाला, याचा उत्पादक मिर्झा अलीमहंमद हा होय. हा सय्यदवंशीय असून यांचे वय त्यावेळेस पंचवीस वर्षांचे होते. हा उघडपणे पारमार्थिक उपदेशक आणि संप्रदायसंस्थापक बनण्याच्या अगोदर, राच् येथील काझीम सय्यद नांवाच्या इसमाचा शिष्य होता. काझीम सय्यद हा उत्कृष्ट शियाईत लोकांच्या एका शायकीज् नांवाच्या धर्मपंथाचा पुढारी होता. यांचे मत असे असे की, बारावा इमाम व त्याचे अनुयायी यांच्यात दुभाष्यासारखे काम करणारा कोणीतरी मध्यस्थ असला पाहिजे, व या मध्यस्थाच्या द्वारे इमाम आपल्या अनुयायाशी भाषण वगैरे करतो असे ते मानीत. या मध्यस्थाला ते लोक अतिश्रेष्ठ असा शियाईत मानीत. याचेच आदर्श (किंवा अवतार) जे चौघे 'बाब्' त्यांच्याद्वारे इमाम आपल्या अल्पकालीन अंतर्ध्यानांत आपल्या अनुयांयाशी व्यवहार करी, याच अर्थाने बाब् शब्द मिर्झाअली महंमद याने उपयोजिला आहे. मोक्षद्वार अशा अर्थी या शब्दाचा उपयोग करतात. पण तो अर्थ चूक आहे. बाब् ही पदवी प्रथमतः मिर्झाअली महंमद यानें घेतली. पण, पुढे त्याने नुक्त ही वरच्या दर्जाची पदवी स्वीकरल्यावर बाब् पदवी त्याचा एकांतिक भक्त मुल्ला हुसेन यास दिली. या लोकांत पुष्कळ काळपर्यंत भांडणे चालू होती. व खुद्द बाब् हा कांही काळपर्यंत तुंरुगात होता. मध्यंतरी त्याच्या अनुयायांनी पुष्कळ खटपटी केल्या. पुढे बाब् मरण पावल्यावर त्याची गादी मिर्झा याह्या यास देण्यांत आली व तोच त्या पंथाचा प्रमुख होऊन बसला. यानें स्वतः 'सुभिइझेल' असा किताब घेतला होता, परंतु याने सर्व कारभार आपल्या वडील भावावर सोपविला होता. याचे नावं मिर्झा हुसेन असे होते. याने स्वतःला बहाउल्ला असा किताब घेतला. यापुढे, या पंथाचे मूळ नावं बाजूला राहून या दोन भावांच्या दोन किताबांतूनच जवळजवळ दोन पंथ निर्माण झाले, एका पंथाचे नांव एझिलि व दुस-याचे बहईन. पैकी पहिला पंथ अगदी नामशेष होण्याच्या बेतास आला, व दुस-याचे अनुयायी वाढत गेले. शेवटी सन १९०८ सालांत अशी पाळी आली की, पहिल्या पंथाचे अनुयायी १०० किंवा २०० तर दुस-या पंथाचे अनुयायी १० लाख! बहाईपंथाचा प्रस्थापक वारल्यांनतर त्याची जागा त्याचा मुलगा 'अबदुल बाहा' यास दिली. परंतु त्यांतहि त्याच्या दुस-या मुलांनी भांडणे उपस्थित केलीच होती. यांच्या या भांडणांची हकीकत इंग्लिश भाषेंत सुध्दा बरीच आढळते, कारण, सन १९०० सालापासून या पंथाला अमेरिकेत बरेच अनुयायी मिळूं लागले होते.
'बाब्' लोकांचा व मुसुलमानी धर्मपंथाचा मुख्य विरोध हा दिसतो की, महंमद हा शेवटचाच पैगंबर व कुराण हा शेवटचाच धर्मग्रंथ असे बाब् लोक मानीत नाहीत. परमेश्वरी सत्तत्व हे अज्ञेय आहे व ते केवळ त्याच्या बाह्य नामरूपांवरूनच मनुष्याला गम्य होणार, तेव्हा, आपल्या पंथांतील, काळांतील अत्युच्च परमेश्वरी स्वरूप ओळखणे हेच मनुष्याचें इतिकर्तव्य होय अशी यांची मते होती. बाब् लोकांचा ग्रंथसमूह अवाढव्य व अव्यवस्थित असल्याने, व त्यांचा धर्मपंथ वगैरे नसल्याने, त्यांची मते काही काही बाबतीत अत्यंत अनिश्चित व संदिग्धस्वरूपाची आहेत.
'देहात्म्याचे पुनरुत्थान होते असे हे लोक मानीत नाहीत. तथापि 'वैयक्तिक अमरत्व' म्हणून कांही तरी आहे असा त्यांच्यांतील कांही जणांचा समज आहे. अक्षरे व अंक यांच्या सांकेतिक किमती फार महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. १८ व १९ या अंकाना जास्त महत्त्व दिले जात असे. १९२ = ३६१ म्हणजे 'सर्व वस्तूंची बेरीज दर्शविणारी संख्या’ असे ते मानीत.
बहाई लोकांच्या हाती हा पंथ गेल्यावर त्यांतील अध्यात्मिक व विश्वैक्याच्या कल्पना जाऊन त्याला व्यावहारिक रूप प्राप्त झाले. अलीकडील पुस्तकांमध्ये मायरन् पेल्प्सचे बहाल्लाजच्या मुलाखतीचे प्रश्नोत्तर रूप पुस्तक बरेच लोकप्रिय आहे.