विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बसेन जिल्हा - खालच्या ब्रह्मदेशांत इरावती विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४१२७ चौरस मैल. आराकनयोना पर्वतांच्या योगाने या जिल्ह्याचे दोन भाग झाले आहेत. या जिल्ह्यांत एक इन्ये नावांचे सरोवर आहे उत्तर भागांतील जमीन चिकणमाती व चिखल मिळून बनलेली आहे. आराकानयोमामध्ये मुख्यत्वेकरून पश्चिमभागांत थोडया प्रमाणांत शंखजिरे सांपडते वाघ क्वचित आहेत, परंतु हत्ती, सांबर, गेंडा, चित्ता, अस्वले ही आराकान योमामधील पश्चिम भागांत बरीच सांपडतात. लहान हरणे व रानटी डुकरें काही ठिकाणी सांपडतात. कांसवे बहुतेक खाडयांत सांपडतात. समुद्रावरील वारे येत असल्यामुळे येथे उन्हाळा फारसा भासत नाही. उन्हाळयांत जास्तीत जास्त उष्णमान ९५० असते, व कमीत कमी ७५० असते. पाऊस फार पडतो.
जिल्ह्याचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नाही. याचें ब्रह्मी नांव पठीन असे आहे, परंतु याचे बसेन कसे व केव्हा झाले हे कळत नाही. जुन्या तलैग इतिहासांत बसेनमधील बत्तीस शहरे सन ६२५ मध्ये पेगूच्या नवीन स्थापिलेल्या राज्यांत होती, असा उल्लेख आला आहे. यानंतर पुष्कळ शतकेपावेतो येथे तलैंग व ब्रह्मी लोकांमध्ये भांडण चालू होते. पहिल्यापासून बसेन हे व्यापाराच्या द्दष्टीने महत्त्वाचे बंदर होते. स.१६८७ मध्ये बसेन नदीच्या काठी हैगजी येथे (यास पूर्वी तैग्रैस म्हणत) ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराकरिता वसाहत केली. पेगूंतील लोकांपासून स. १७५५ त आव्हा येथील आलोंगपया नांवाच्या राजाने बसेन शहर घेतले. व ब्रह्मी लोकांच्या शत्रूंविरुध्द मदत देण्याच्या अटीवर नेग्रैस व बसेनजवळ जमीन कंपनीने त्यापासून कायमची घेतली. ब्रह्मी अधिका-यांस यूरोपीयनांनी आलोंगपयाविरुध्द तलैंग (पेगूंतील लोक) यांना मदत केल्याचा संशय आल्यावरून त्यांनी ५ आक्टोबर १७५९ रोजी सर्वांस ठार केले. १८०१-२ मध्ये नेग्रैस परत मिळण्याविषयीचे प्रयत्न व्यर्थ झाले. १८२४ साली पहिल्या ब्रह्मी युध्दाच्या वेळेस संदाबोच्या तहाप्रमाणे पेगू सोडून देईपर्यंत ब्रिटिशांनी बसेन घेऊन ते आपल्या ताब्यांत ठेविले होते दुस-या ब्रह्मी युध्दाच्या वेळेस स. १८५२ त इंग्रजांनी हल्ला करून तें कायमचे हस्तगत करून घेतले बोगले बंडाच्या वेळेखेरीज स. १८५४ पासून या जिल्ह्यांत शांतता आहे.
या जिल्ह्यांत बरीच देवालये आहेत. लोकसंख्या (१९२१) ४८९४७३. बहुतेक लोक ब्रह्मी भाषा बोलतात. शें. ६६ शेतकरी आहेत. उत्तरेस व ईशान्येस जमीन सुपीक आहे. बसेन येथे सोनेचांदीचे काम थोडेसे होते. मातीची भांडी व छत्र्या हातांनी करण्याचे कारखाने प्रसिध्द आहेत. मातीच्या भांडयांस झिलई देण्याचे काम मुख्यतः बसेनजवळ सिनोबो व क्विन्ल्या येथे होते. शिकलेले लोक शे. २५ आहेत.
त ह शी ल. - हिचे क्षेत्रफळ ५६३ चौरस मैल आहे. बसेन शहर मुख्य असून शिवाय ५१९ खेडी आहेत.
श ह र. - हे बसेन नदीच्या तीरी वसले आहे. लोकसंख्या सुमारे ३७ हजार स १८२४ त पहिल्या ब्रह्मी युध्दांत हे इंग्रजांनी घेतले, पण तहांत परत देऊन पुन्हा १८५२ साली दुस-या युध्दांत कायमचें घेतले. या बंदरापर्यंत जहाजे येतात.