विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बॅसुटोलंड - हे राज्य व ब्रिटिश क्रौनकॉलनी आग्नेय आफ्रिकेत असून दक्षिण अक्षांश २८०३५' ते ३००३०' व पूर्व रेखांश २७० ते २९०२५' यांत वसलेले आहे. यांचे क्षेत्रफळ १०२९३ चौरस मैल आहे. याच्याभोवती ब्रिटिश वसाहती आहेत. उत्तरेस ऑरेंजरिव्हर कॉलनी, नैर्ॠत्येस व दक्षिणेस केपकॉलनी व पूर्वेस नाताळ ह्या वसाहती आहेत. बॅसुटोलंड अथवा लेसुटो (स्थानिक नाव) हे दक्षिण आफ्रिकेतील मध्यपठाराचे आग्नेय टोक असून याची साधारण उंची ६००० फूट आहे. येथील हवा यूरोपीय व एतद्देशीय या दोघांनाहि चांगली मानवते. येथे साधारण उष्णमान ६०० असते. येथे चार ॠतू असून दरवर्षी सुमारे ३० इंच पाऊस पडतो. येथे अरण्ये नाहीत. युकॅलिप्टस व पाईन झाडे मुख्य वसाहतीभोवती लाविलेली आहेत. जंगली जनावरे अगदी अल्प असून त्यांत चित्ता, कोल्हा, काळवीट वगैरे मुख्य आहेत. बॅकन नावाचे माकड व बहिरीससपणा डोंगरांत सांपडतात. येथे मधूनमधून टोळधाड येते. बॅसुटो लोक टोळ खातात.

लो क सं ख्या व श ह रे. - ओसाड डोंगरी मुलूख सोडला तर येथील लोकसंख्या बरीच आहे. १९२१ साली ४९५९३७ एतद्देशीय, १६०३ यूरोपियन, १७२ आशियाटिक व १०६९ काळे लोक होते. स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा बरीच जास्त आहे. बॅसुटो लोक बांटु निग्रोईडांच्या बेकुआना या शाखेच्या एका उपशाखेचे आहेत. कॅलेडान नदीच्या डाव्या तीरावर मसेरू हे राजधानीचे शहर आहे. मॅकेटेंग, बुथाबुथे, मोरिजा (मिशनचे सर्वात जुने ठाणें) ही दुसरी गांवे असून मॅटस्यैग हे लेरोथोडी नांवाच्या मुख्य राजाची राजधानी आहे.

शे त की, व्या पा र व द ळ ण व ळ ण. - दक्षिण आफ्रिकेतील सर्व देशांपेक्षा बॅसुटोलंडांत जास्त धान्य पिकते. येथे मेंढया, शेळया, गुरेढोरे, व तट्टू यांचे कळप आहेत. येथील तट्टू काटक असतात. किरकोळ व्यापार हिंदी लोकांच्या ताब्यांत आहे. येथून मुख्यतः गहूं, काफीर धान्य, लोंकर, घोडे, गुरेढोरे वगैरे मालाची निर्गत होते. आयात मालांत कापड जास्त असते. येथे फक्त १६॥ मैल लांबीची रेल्वे असून ब्लोएम फोन्टेन व लेडी स्मिथशी जोडली आहे. येथे पोस्ट व तार यांची व्यवस्था आहे.

शा स न प ध्द ति व ज मा बं दी. - बॅसुटोलंड ही क्राऊन कॉलनी असून दक्षिण आफ्रिकेचा हायकमिशनर हा येथील गर्व्हनर असतो. याला कायदे करण्याचा अधिकार असतो. येथे एक रेसिडेन्ट कमिशनर असून त्याच्या हाताखाली सेक्रेटरी व असिस्टंट कमिशनर असतात. ब्रिटिश अधिका-यांच्या हाताखाली वंशपरंपरेने हक्क सांगणारे लहान राजे असून त्या सर्वांवर मुख्य राजा असतो. हे राजे एतद्देशीय खटले चालवितात. परंतु अपील व यूरोपियन लोकांचे खटले कमिशनरापुढे चालतात. पित्सो अथवा राष्ट्रीय कौन्सिलमध्ये सर्व जातीचे लोक असून तिच्या वार्षिक सभेंत सार्वजनिक प्रश्नांचा उहापोह फारच मोकळेपणाने होतो. १९२३-२४ साली २५२३०० पौंड वसूल व २४१५७० पौंड खर्च झाला.

शि क्ष ण व सा मा जि क स्थि ति. - येथे मिशनच्या ब-याच शाळा आहेत, ब-याच लोकांना सेसुतो (बॅसुटो लोकांची भाषा) व इंग्रजी लिहितावाचता येत असून डच भाषा बोलता येते. काही लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ होतो.

इ ति हा स. - १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत बॅसुटोलंडात बुशमेन नांवीचे भटके लोक होते. १८००च्या सुमारास बटाऊ, बॅसुटो, बापुली वगैरे बेचुआना जातींनी आपले ठाणे दिले. ह्या जाती मोनाहेंग नांवाच्या पुरुषाच्या घराण्याची सत्ता मान्य करीत. चका, मतिपन व मोसिलिफेत्झ या झुलु राजांच्या युध्दामुळे वरील जातींची दाणादाण उडाली व त्यांची सत्ता नामशेष झाली. मॅकटा पर्वतात राहणारी जात नरमांस भक्षण करू लागली. याच सुमारास मोनाहॅग घराण्यांतील मोशेश नांवाच्या तरुणाने फुटलेल्या जाती एकत्र केल्या व बॅसुटो राष्ट्राचा पाया घातला. १८२४ त त्याने थाबा बोसिगोचा डोंगरी किल्ला घेऊन १८३१ त मोसिलीकेत्झची मुऴीच डाऴ शिजू दिली नाही. १८३१ त त्याने पॅरीस येथील सोसायटी मिशन्स इव्हँजेलीकला बोलाविले. १८३६-३७ त मोशेश हक्क सांगत असलेल्या भागांत बोअर लोकांनी वस्ती केली. यांत व मोशेशमध्ये तंटा उत्पन्न झाला. यावेळी बॅसुटो लोकांनी गुरे पळविण्यास सुरवात करून बोअर लोकांना बराच त्रास दिला. परंतु बोअर लोकांस जमीन पाहिजे होती. त्यांची जमीन गिळंकृत करण्याची हांव पाहून १८४२ त केपकॉलनीच्या गव्हर्नरानें बॅसुटोलंडमधील जमीन न घेण्याचा जाहीरनामा लाविला. इ.स. १८४३ त मोशेशशी तह होऊन बॅसुटोलंड हे ब्रिटिशांच्या संरक्षणाखालचे संस्थान बनले.

ब्रिटिशांनी ऑरेंज नदीजवळचा प्रांत ताब्यांत घेतला (१८४८) तरी बोअर व दुस-या बेचुआना जाती यांच्याशी बॅसुटो लोकांचा लढा चालू होता. १८४९ त मोशेशचा कांही प्रांत घेतला. ब्रिटिशांची ही ढवळाढवळ चालू राहून १८५१ त त्यांनी बॅसुटो लोकांवर स्वारी केली. परंतु त्यांचा पराभव झाला. पुन्हा १८५२ त केपकॉलनीचा गव्हर्नर जनरल सर जार्ज कॅथकार्ट याने स्वारी केली. परंतु त्यालाहि अपयश आले. मोशेशने मुत्सद्दीगिरी लढवून जय झाला असतांना सुध्दा तहाच्या अटी पुढें केल्या व त्या दोहोंपक्षी मान्य झाल्या. ब्रिटनने स. १८५४त ऑरेंज नदीपलीकडच्या प्रांतावरील हक्क सोडून दिल्यामुळे फ्रीस्टेट उदयास आले. याचा व मोशेशचा नेहमी सरहद्दीबद्दल खटका उडे. १८६५ त युध्द सुरू होऊन त्यांत बोअर लोकांचा जय झाला व फ्रीस्टेटने चांगला सुपीक प्रांत आपल्या राज्यास जोडला. मोशेशने फ्रीस्टेटचे स्वामित्व कबूल केले. या युध्दांत बॅसुटो लोकांची बरीच प्राणहानी झाली व त्यामुळे आपण ब्रिटिश छत्राखाली राहण्यास तयार आहो असें त्याने बोलणे सुरू केले. त्यामुळे १८५८ त बॅसुटोलंड ब्रिटिशांनी घेतल्याचे जाहीर केले. परंतु याला फ्रीस्टेटने बराच निरोध केला म्हणून १८६९ त बोअर लोकांशी अलिपालनॉर्थ येथे तह करण्यांत आला. या तहान्वयें बॅसुटोलंड व फ्रीस्टेट यांमधील मर्यादा ठरून कॅलेडॉनदीच्या पश्चिमेकडील सुपीक प्रदेश फ्रीस्टेटने घेतला व ब्रसुटोलंड बिटिश साम्राज्याचा भाग समजण्यांत आला.

५० वर्षे राज्य करून मोशेश मरण पावला (१८७०). याला विशेष प्रकारची बुध्दिमत्ता असून दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासांत याने आपले नावं अजरामर करून ठेविले. मुत्सद्दी धोरणांत सुध्दां त्यानें आपली छाप सर्वांवर बसविली. तसेंच स्वतःउत्पन्न केलेल्या राष्ट्रावर त्यानें उत्तम प्रकारे राज्य चालविले.

बॅसुटोलंड स. १८७१ त केपकॉलनीला जोडण्यांत आले. १८७९ त मोईरोसी नांवाच्या राजाने वसाहतीची सत्ता झुगारली. परंतु युध्दांत त्याचा किल्ला पडून तो मारला गेला. यानंतर बॅसुटो लोकांचे आपसांत युध्द सुरू झाले. इ.स. १८४० त केपसरकारने स. १८७८ चा केपप्रीझर्वेशन कायदा लागू केला. या कायद्यान्वये सर्व एतद्देशीयांपासून हत्यारें काढून घ्यावयाची होती. परंतु यांत सरकारला यश आले नाही. स. १८८१ पर्यंत बॅसुटो व वसाहतीचे सैन्य यांत युध्द चालू होते. यावेळी हायकमिशनर सर हरक्युलीस रॉबिन्सन (नंतर लॉर्ड रोजमीड) यास मध्यस्थी करावी लागली. स. १८८२ त बॅसुटोलंडमध्ये शांतता स्थापन झाली. पुढील वर्षी एका त-हेचे स्वराज्य स्थापण्यांत आले.

केपसरकारचे शासन बॅसुटो लोक व केपकॉलनी या दोघांनाहि पसंत नव्हते. बॅसुटो लोकांनी साम्राज्यसरकारच्या अंमलाखाली जाण्यासाठी खटपट चालविली असता तिला केपकॉलनीचे साहाय्य मिळून दरवर्षी शासनखर्च म्हणून १८हजार पौंड देण्याचे कबूल केले. १८८४ त बॅसुटोलंड हे क्राऊनकॉलनी झाले. देशी लोकांचे कायदे, संस्था व त्याचप्रमाणे राजाची सत्ता यांत काहीच ढवळाढवळ झाली नव्हती. मोशेशनंतर त्याचा मुलगा लेत्सी हा मुख्य राजा झाला. त्याच्यानंतर १८९१ त लेरोथोडी (१८३७-१९०५) हा गादीवर बसला. या राजांनी ब्रिटिश प्रतिनिधी म्हणजे रेसिडेंन्ट कमिशनरला बरीच मदत दिली. पहिला कमिशनर सर मार्शल क्लार्क याने फारच उत्तम रीतीने राज्य चालविले. बॅसुटो लोकांनी शेतकीकडे आपले लक्ष वळविले. १८९१ त बॅसुटोलंड कस्टम्स यूनियनमध्ये सामील करण्यांत आले. बोअर युध्दाच्या वेळी (१८९९) बॅसुटो राजांनी आपली राजनिष्ठा प्रदर्शित केली. या युध्दात बॅसुटोलंड तटस्थ होते. बॅसुटोलंड क्राऊनकॉलनी झाल्याने एकंदरीत बराच फायदा झाला. येथे एक राष्ट्रीय कौन्सिल स्थापन करण्यांत येऊन त्याची पहिली बैठक जुलै स. १९०३ त झाली. १९०५ त लेरोथोडी हा मुख्य राजा मरण पावला व त्याच्या गादीवर त्याचा मुलगा लेत्सी याला बहुमताने निवडण्यांत आले. स. १९०५ त मेसेरुपर्यंत रेल्वे झाल्याने बराच फायदा झाला. नाताळ व झुलुलँडमध्ये स. १९०६ त झालेल्या युध्दाच्या वेळी बॅसुटो लोकांनी कांहीच गडबड केली नाही.