विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बसव - याची चरित्रपर माहिती, ज्ञानकोश, भाग १० 'कानडी वाड्.मय' पृ. २९९-३०० या ठिकाणी पहा.
ब स व पु रा ण. - बसवपुराण हे इ.स. १३६९ च्या सुमारास रचिले गेले असावे. हे भीमदेव नांवाच्या कवीने रचिले असे बसवपुराणांतील त्याच्या स्वतःच्या उल्लेखांवरून समजते. बसवपुराणांत इतर हिंदु पुराणांप्रमाणेच मंगलाचरण, असून नंतर शिवस्तुति व बसवस्तुति आली आहे. नंतर ज्यांच्या आश्रयाने ग्रंथकाराने हे पुराण लिहिण्यास हाती घेतले त्यांची स्तुति असून, तीनंतर गुरूची-राघवाची-प्रशंसा, भीमदेवाने केली आहे. याच भागांत, कानडीत ग्रंथ लिहिल्याबद्दल त्याकडे तुच्छतापूर्वक न पहाण्याबद्दल वाचकांची प्रार्थना ग्रंथकाराने केली आहे. पुढे बसव हा शिवस्वरूप असल्यामुळे शिवाशी तो एकरूप असला तरी त्याचे स्वतंत्र पुराण लिहिण्याची आवश्यकता ग्रंथकाराने प्रतिपादन केली आहे. शेवटी शैवधर्माला उतरती कळा लागल्याचे वर्तमान नारदाच्या तोंडून ऐकून शिवाने पार्वतीच्या सल्ल्याने नंदीला या धर्माचे पुरुज्जीवन करण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्याचे ठरविले असे सांगितले आहे. दुस-या भागांत बसवाच्या आईबापांविषयी माहिती, पुत्रसंतति नसल्यामुळे त्यांनी तत्प्राप्त्यर्थ केलेले नवससायास, व त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन त्याने पुत्रप्राप्तीचा दिलेला वर यांचा वृत्तांत आला आहे. तिस-या भागांत, बसवाचे जन्म, बाळपण, दीक्षा व विवाह यासंबंधीचे वर्णन आहे. बसवानें मुंज करून घेण्याचे नाकारले. त्यावेळी मी शिवोपासक आहे. ब्रह्मकुलाचा नाही, मी जातीचा मोड करण्याकरिता आलो आहे, असे शब्द उच्चारल्याचें ग्रंथकाराने लिहिले आहे. या तेजस्वी शब्दांमुळे बसव हा मोठा मनुष्य आहे अशी कल्पना होऊन कल्याणचा राजा बिज्जल यांचा प्रधान बलदेव याने आपली मुलगी गंगादेवी बसवाला दिली असे ग्रंथकारानें म्हटले आहे. चवथ्या भागांत, ब्राह्मणांनी बसवाचा छळ केल्यामुळे बसवाचे कप्पाडीला जाणे, संगमेश्वराच्या देवळांत शिवमूर्तीची प्रार्थना करीत असतांना शिवाचे घडलेले दर्शन व त्याचा बसवाला उपदेश या गोष्टी ग्रंथकाराने निवेदन केल्या आहेत. शिवाने बसवाला जो उपदेश केला त्यांत त्यानें लिंगायत धर्माची तत्त्वे बसवाला सांगितली असे ग्रंथकाराने दाखविले आहे. पांचव्या भागांत, बसवाने केलेल्या कांही दैवी कृत्यांची हकीकत आली असून, बलदेव मंत्रि वारल्यानंतर बसवाला प्रधानपद मिळाल्याची आणि तो कल्याण येथे येऊन राहिल्याची हकीकत आली आहे. सहाव्या भागांत बसवाच्या निष्कलंक आचाराचे व स्वभावाचे वर्णन आलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अनेक कथा सांगून त्यावरून बसवाचा धर्माच्या बाबतीतील उत्साह, त्याची परधर्मीयांसंबंधीची चांगली कल्पना, शिवोपासकांना वाटेल ते दान देण्याची त्याची प्रवृत्ति, सत्यभाषण, वेदाज्ञापालन, सज्जन-रक्षण, प्रामाणिकपणा, प्रतिज्ञापूर्ती, जैन ब्राह्मणांचा नाश, दमन, षड्रिपूंपासून दूर राहणे इत्यादी त्याच्या गुणांसंबंधीच्या कथा आलेल्या आहेत. तसेंच त्याने केले चमत्कारहि या भागांत सांगण्यात आले आहेत. कल्याणच्या राजाने अविचाराच्या भरांत दोन लिंगायत ठार मारल्यामुळे बसवाने कल्याण सोडले; त्यामुळे बिज्जलांच्या वैभवाला कशी ओहोटी लागली याचें सविस्तर वर्णन आले आहे. शेवटी मर्त्यलोकाचा वीट येऊन संगमेश्वराला आपल्याकडे नेण्याबद्दल बसवानें प्रार्थना केल्यामुळे संगमेश्वराने त्याला आपल्या उदरांत घेतले व अशा रीतीने बसव हा शिवस्वरूपी विलीन झाला असे सांगून ग्रंथकाराने पुराणाचा शेवट केला आहे. बसवपुराणांत ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत त्यापैकी मुख्य मुख्य गोष्टी ख-या असाव्यात असे वाटते. इतर गोष्टी, चमत्कार वगैरे बसवाचे महत्त्व वाढविण्यासाठी नंतर रचिल्या गेल्या असाव्यात असे दिसते.