विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बसरा – इराक. बसरा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे शाटेल अरब नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे. मुख्य शहर शाटेल-अरबच्या पश्चिमेला दीड दोन मैलांवर आहे. येथे महत्त्वाच्या सार्वजनिक इमारती नाहीत. घरे साधारण असून कांही विटांनी बांधलेली आहेत. रस्ते वांकडेतिकडे, अरुंद व दुरुस्त असे नाहीत. शहराचा बराचसा भाग बगीचे व मळे यांनी व्यापलेला आहे. बगीच्यांच्या व मळयांच्या मधून बरेच लहान कालवे आहेत व त्यांत होडया चालविता येतात. शहर घाणेरडे असून येथे नवीन येणा-या लोकांना तापापासून भय असते.
बसरा हे बगदादचें एक जलमार्गावरचे बंदर आहे. खजुराच्या व्यापाराचे हे जगांतील एक मोठे बंदर आहे. येथील खजूर जगांत अतिशय चांगला म्हणून समजला जातो. खजुराशिवाय लोकर, घोडे, गोंद, ज्येष्ठमध आणि गुलाबाचे अत्तर इत्यादी वस्तू परदेशांत जातात. परराष्ट्राशी होत असलेला व्यापार बहुतेक इंग्लिशांच्या ताब्यांत आहे. १८९८ सालापासून ब्रिटिश वकील येथे असतो. फ्रेंच व रशियन वकील देखील येथे आहेत. येथील कायमची लोकसंख्या ५०००० असून त्यांत तुर्क, अरब, इराणी, हिंदुस्थानी आर्मीनियन, खाल्डियन आणि यहुदी ह्या निरनिराळया देशांच्या व धर्मांच्या लोकांचे मिश्रण झाले आहे. तुर्क लोक सर्वांत कमी आहेत. शियापंथाच्या अरब लोकांचा सर्वात जास्त भरणा आहे. त्या सर्व प्रांतांत व शहरांत श्रीमंत व वजनदार असा महंमंद पैगबरांच्या वंशातला मनुष्य आहे, त्याला नकीब असे म्हणतात. त्याला हिरवें पागोटे घालण्याचा मान असतो.
इ ति हा स. - जुने बसरा शहर खलीप उमरने स. ६३६ त वसविले. तें सध्यांच्या बसरा शहराच्या नैर्ॠत्येस आठ मैलावर सध्या कोरडया पडलेल्या एका कालव्यावर होते. भरभराटीच्या वेळेस बसरा शहरानें कुफा व बसीर या शहरांनां संपत्तीच्या, आकारमानाच्या बाबतीत मागे टाकले होते. अब्बासी खलिफांच्या सत्तेबरोबर जुन्या बसरा शहराचा -हास झाला. जुने कालवे व दळणवळणाचे मार्ग ह्यांकडे दुर्लक्ष झाले व सरतेशेवटी त्यांनी ते शहर देखील सोडले. सांप्रतचे बसरा शहर तुर्कांनी १६६८ साली जिंकिले. त्यानंतर ह्या शहरांत बरेच दंगेधोपे होत असत. सादिकखानाच्या अधिपत्याखाली इराणी लोकांनी आठ महिने वेढा देऊन हे शहर १७७७ साली काबीज केले. एका वर्षानंतर ते पुन्हा तुर्कांच्या हाती आले. परंतु मान्टेफिक अरबांच्या शेखाने त्यांना हाकून दिले. सुलेमान पाशाने युफ्रेटीस नदीवर शेखांचा पराभव केला. तेव्हांपासून हे शहर तुर्कांच्या हाती होते. ते गेल्या महायुध्दांत मेसापोटेमिया प्रांताबरोबर इंग्रजांच्या हाती आले.