विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बली - हे जावाच्या पूर्वेस डच ईस्ट इंडीजमधील एक बेट असून बली सामुद्रधुनीमुळे जावाबेटापासून अलग झाले आहे. बली बेटाच्या लांबी ९३ मैल व सर्वात जास्त रुंदी ५० मैल असून क्षेत्रफळ २०९५ चौरस मैल आहे. राज्यव्यवस्थेकरिता १८८२ साली बली हे जावापासून काढून लाँम्बाक बेटाशी जोडण्यांत आले असून लाँम्बाक आणि बलीची डच रेसिडेन्सी बनविण्यांत आली. बुलेलेंग हे मुख्य शहर आहे. सर्व रेसिडेन्सीच्या डच विभागाची लोकसंख्या (१९०५) ५२३५२५ होती. येथे बरीच सरोवरे व नद्या असून या नद्यांचे येथील लोकांनी कालवे काढिले आहेत. येथील सर्वात उंच ज्वालामुखी टाबानत, वाटूर व गुनंग अनंग हे आहेत. येथील रहिवाशी उत्तम शेतकरी व कुशल कारागीर असून विणकाम व हत्यारे करतात. येथील राज्यकारभार अनियमित व बेबंदशाहीचा आहे. दिवाणी व फौजदारी कायद्याच्या लेखी ग्रंथावरून न्याय मिळतो. गुलामगिरी बंद पडली आहे. बली व लॉम्बाक बेंटात अद्याप हिंदुधर्माचा लोप झाला नसून सती जाण्याची चाल आहे. हिंदूधर्मातील चार वर्ण व पांचवी अस्पृश्य (चांडाळ) जात येथे आहे. या धर्मात बौध्द धर्माचे मिश्रण होऊन व थोडयाअधिक प्रमाणाने भूतपिशाच यांवरील श्रध्देमुळे या धर्मांत थोडा फरक झाला आहे. भुतानां शांत करण्याकरिता देवांच्या मार्फत किंवा प्रत्यक्ष भुतांचीच पूजा किंवा मन्येपी (महा बलिदान) करतात.
समुद्रकि-याकडील लोकवस्तीत मुसुलमानी धर्म आहे. बली, जावा, सूदन या भाषा मलाया भाषेचे पोटभेद आहेत. हे लोक ताडपत्रावर लिहितात. धर्मग्रंथ प्राचीन जावा (कवी) भाषेंत लिहिले आहेत. येथील लोकांस प्राचीन इतिहासाची कांही माहिती नाही. परंतु पहिल्या शतकाच्या पूर्वार्धात येथे हिंदु वसाहत असावी व यांनीच 'बलि' ही संज्ञा दिली असावी. स.१६३३ च्या नंतर येथे डच लोक येऊन येथील राजांशी सलोखा करूं लागले. स.१८४५ मध्ये त्यांनी पोर्ट बर्दोग येथे स्थानिक वसाहत केली. स.१७४७-४९ च्या युध्दाने ह्यांचे वर्चस्व वाढत गेले.
येथील नद्या नाव्य नाहीत. शेतकी हे पोट भरण्याचे मुख्य साधन असून तांदळाची लागवड मुख्यत्वेंकरून होते यशिवाय कॉफी, तम्बाखू, कोको व नीळ या मालाची लागवड करतात. सोने गाळणे, हत्यारे व वाद्ये करणे, लाकडाचे कोरीव काम, कलावत् व जरतारी काम येथे होते. येथे चिनी व अरबी व्यापारी बरेच आहेत. ज्ञानकोश विभाग पहिला, ‘हिंदुस्थान आणि जग’ यांतील यावद्वीपसंस्कृति या प्रकरणांत येथील संस्कृतीची माहिती विस्तृतपणे दिली आहे.