विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलिया, जिल्हा - संयुक्त प्रांतांत, बनारस विभागामधील एक जिल्हा. क्षेत्रफळ १२४५ चौरस मैल. गंगा व घोग्रा या दोन मुख्य व छोटी शरयु ह्या नद्या या जिल्ह्यांतून वहातात. नद्यांतील गाळ जमिनीवर सांचत गेल्याने या जिल्ह्यांतील सर्व जमीन फार सुपीक झालेली आहे.
इतिहासः - मगधाच्या प्राचीन हिंदु राज्यांत बलियाचा समावेश होत होता. अकबराच्या राज्यांत अलाहाबाद व बहार या सुभ्यांमध्ये तो मोडत असे. अठराव्या शतकांत हा जिल्हा बनारसाच्या राजांच्या ताब्यांत होता व परगण्याचा कांही भाग व १७७५ साली बाकीचा भाग ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. १९२१ साली या जिल्ह्याची लोकसंख्या ८३१००९ होती. या जिल्ह्यांतील जमिनीचे उंचवटयाची जमीन व सखल जमीन असे दोन भाग आहेत; पहिलींतील मुख्य पीक भात होय. सखल जमिनीत शरदॠतूंतील पिकांपेक्षा वसंतांतील पिके महत्वाची असतात. या जमिनीत गहूं, हरभरा, वाटाणे वगैरे पिके होतात. येथे तांदूळ फारच थोडा होतो. शरदॠतूंत मका व कडधान्ये होतात. संयुक्तप्रातांतील इतर जिल्ह्यांत चालू असलेली धा-याची पध्दती या जिल्ह्यांत चालू आहे. त्याशिवाय ''गनबाध'' म्हणजे जमीनदाराने एखाद्याला ठराविक भाडयाने कायमची जमीन देण्याची पध्दत फक्त याच जिल्ह्यांत सुरू आहे.
व्यापारामध्ये आयात माल तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, कापड व धातूचे जिन्नस असून निर्गत माल साखर, गाळिताची धान्ये, गहूं, हरभरा, सोरा वगैरे आहे.
बंगाल आणि नार्थ वेस्टर्न रेल्वेचा महूपासून निघणारा फांटा या जिल्ह्यांतून पूर्व-पश्चिम गेलेला आहे; दुसरा एक लहान फांटा जानपूर व गाझीपूरवरून फेफना येथे या फाटयांस मिळतो. त्याच रेल्वेचा बनारस-गोरखपूर फांटा वायव्य भागांतून गेलेला आहे. लोकसंख्येपैकी शे. ३.२ लोकांनां लिहितावाचता येते.
गांव - हे गंगेच्या उत्तर तीरावर असून बंगाल आणि नार्थ वेस्टर्न रेल्वेची स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारे सतरा हजार. वाल्मीकि ॠषींच्या नांवापासून बलिया हे नांव पडले असावे असा समज आहे. कार्तिकी पौर्णिमेस येथे मोठी जत्रा भरत असते. बलिया हे जिल्ह्यांतील व्यापाराचे मुख्य ठाणे असून येथे साखरेचे व कापडाचे कारखाने आहेत.