विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलरामपूर, इस्टेट - अयोध्या प्रांतांतील सर्वांत मोठी जहागीर. ही गोंडा, बहरैच, प्रतापगड व लखनौ या जिल्ह्यांत आहे. क्षेत्रफळ १२६८ चौरस मैल. या इस्टेटीचा सरकार सारा वार्षिक ६.८ लक्ष रु आहे. इ.स १३७४ त फेरोझशहा तुघलखाने बहरैच जिल्ह्याच्या पूर्व भागांतील टोळयांचा बंदोबस्त करण्याकरिता पाठविलेला बरियरसा हा या इस्टेटीचा मूळपुरुष होता. त्याच्यापासून सतरावा पुरुष माधवसिंग याने राप्ती व कुवाना यांच्यामध्ये स्वतःकरिता नवीन इस्टेट मिऴविली. त्याचा मुलगा बलरामदास याने बलरामपूर वसविले. व बापाने मिऴविलेली इस्टेट पुष्कऴ वाढविली. याप्रमाणे इस्टेट वाढत गेली, व सादतखान हा अयोध्येचा नबाब असता त्याच्या सत्तेला विरोध करण्यांत बलरामपूरचा सरदार प्रमुख होता. स. १७७७ त नवलसिंग स्वतः राजा म्हणवून घेऊं लागला. नवाबाशी त्याचें नेहमी वैर सुरू असे, परंतु नबाबाच्या सैन्याकडून जरी त्याचा वारंवार पराभव होत होता तरी तो नवाबाचा अंकित झाला नाही. १८५७ सालच्या बंडांत येथील राजाने इंग्रजांना मदत केल्याबद्दल गोंडा व बहरैच जिल्ह्यांतील बरीच मोठी इस्टेट त्याला इंग्रजांकडून मिऴाली. त्याच्या वडिलार्जित इस्टेटीववरील कराचा १।१० दंड कमी करण्यांत आला व त्याची जमाबंदी कायमची करण्यांत आली. या इस्टेटातील मुख्य व्यापारी गांवे बलरामपूर व तुलसीपूर ही आहेत. देवीपाटण येथे मोठी जत्रा भरत असते.
गां व – हें बंगाल आणि नार्थ-वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारे १४ हजार. जहांगीरच्या कारकीर्दीत बलरामदासानें हे गांव वसविलेले आहे. पूर्वीच्या महाराजाने बांधिलेले सुंदर दगडी देऊळ, सर द्दगविजयी सिंगाचा पुतळा असलेली दगडी इमारत व राजवाडा ह्या येथील मोठया इमारती होत. हे गांव व्यवस्थित वसलेले आहे.