विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब-हाणपूर तालुका - मध्यप्रांताच्या नेमाड जिल्ह्यातील तापीथंडीतील तालुका. यांत तालुक्याच्या गांवाशिवाय कसब्याचे एकहि गांव नसून १९४ खेडी आहेत. यांत इतिहासप्रसिध्द असिरगड किल्ला आहे.
गां व - हे मजबूत तटबंदीचे गांव आहे. लोकसंख्या (१९११) सुमारे २३ हजार आहे. यांत मुसुलमानांची संख्या बहुतेक हिंदुंइतकीच आहे. हे गांव इ.स. १४०० त खानदेशाच्या फारुकी वंशांतील पहिला राजा नासीरखान याने दौलताबादचा प्रसिध्द शेखबुऱ्हान-उद्दीन याच्या नांवाने बसविले. ते २ शतकेपर्यंत त्या घराण्याच्या ताब्यांत राहून १६०० साली अकबराने खानदेशाबरोबरच हे खालसा केले. याबद्दल 'ऐने-ई-अकबरीत' विस्तृत उल्लेख केला असून त्यावेळेच्या गांवाचेहि वर्णन केले आहे. तेव्हापासून पुढे औरंगझेबाच्या वेळेपर्यंत व पुढेहि कांही काळ हे दक्षिणेतील प्रांताची राजधानी म्हणून प्रसिध्द होते. औरंगझेबानंतर कांही काळपर्यंत हे मराठयांच्या ताब्यांत होते. ते इंग्रजी राज्यास १८६० साली कायमचें जोडले गेले. येथे जरा मोडकळीस आलेली बिबि मशीद व अकबराच्या पूर्वीची जामा मशीद असून गांवाच्या बाहेर राजपुरुषांच्या कबरी आहेत.